डॉल्बीच्या आवाजामुळे नागरिकाचा मृत्यू झाल्यास सदोष मनुष्यवध ३०२ कलमानुसार गुन्हा प्रविष्ट करणार ! – विश्‍वास नांगरे-पाटील यांची गणेशोत्सव मंडळांना चेतावणी ! 

कोल्हापूर, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – डॉल्बीच्या आवाजामुळे अथवा डॉल्बीसमोर नाचताना चेंगराचेंगरीत एखाद्याचा मृत्यू झाल्यास संबंधित मंडळावर सदोष मनुष्यवधाचे भारतीय दंड विधान संहिता ३०२ कलमान्वये गुन्हा प्रविष्ट करण्यात येईल. मंडळांनी कारवाई ओढून घेऊ नये, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी ३० ऑगस्टला पत्रकार परिषदेत सांगितले.

नांगरे-पाटील पुढे म्हणाले की, कोणावरही हेतूपुरस्सर कारवाई करण्याचा आमचा हेतू नाही. गणेशोत्सव मंडळांचे एक मासापासून प्रबोधन करत आहोत. त्यातूनही जी मंडळे डॉल्बी लावतील, त्यांची गय केली जाणार नाही. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई केली जाईल. पोलिसांनी डॉल्बीला विरोध केला आहे. त्यामुळे काही लोक सामाजिक संकेतस्थळावरून पोलिसांच्या विरोधात लिखाण करत आहेत. याशिवाय मंडळांची दिशाभूल करणारेही काही संदेश फिरत आहेत. मंडळांना त्रास देण्याचा आमचा हेतू नाही. आम्हाला कुणाचे सत्कार आणि पुरस्कारही नकोत. आम्ही कायदेशीर काम करत आहोत. अशा प्रकारे अपर्कीती करणार्‍यांवर सायबर विभागाचे लक्ष आहे, यामुळे त्यांनी सावधानता बाळगावी.

स्टेरिओ लावण्यास विरोध नाही !

स्टेरिओ बॉक्स, स्पिकरला आमचा विरोध नाही, ते लावले तर चालतील; मात्र कंपन निर्माण होणारे मोठ्या क्षमतेचे ध्वनीक्षेपक, डॉल्बी, मॉन्स्टर (राक्षस) जनरेटरवर चालतात. या वाद्यांचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. हवेत कंपनही सिद्ध होते. या वाद्यांमुळे पर्यावरण संरक्षण कायद्याचा भंग होतो. याउलट ढोल, ताशे, बॅण्ड, बेंजो, झांज पथक ही वाद्ये वाजवण्यास आमचा काहीच विरोध नाही.

विसर्जन मिरवणुकीतही डॉल्बीमुक्तीचा निर्धार पोलिसांनी केला आहे. डॉल्बीच्या भिंती उभ्या राहू नयेत, यासाठी मंडळांची महाद्वार रस्त्यावर पडताळणी केली जाईल. पोलिसांची दृष्टी चुकवून ऐनवेळी डॉल्बी लावल्यास मंडळांवर ध्वनीप्रदूषण नियमानुसार कारवाई करून डॉल्बी सिस्टीम तातडीने जप्त केली जाईल.

गणेशोत्सव मंडळांच्या हालचालींवर करडी दृष्टी  !

डॉल्बी लावण्याची शक्यता असणार्‍या गणेशोत्सव मंडळांची पोलिसांनी सूची सिद्ध केली आहे. या मंडळांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी करडी दृष्टी ठेवली आहे. हे कार्यकर्ते डॉल्बी ठरवण्यासाठी कोठे जातात, कोणाच्या संपर्कात आहेत, याची माहिती मिळवली जात आहे. काही मंडळात खबरेही पेरले आहेत. पोलिसांनी बारकाईने डॉल्बीवर लक्ष ठेवले आहे.


Multi Language |Offline reading | PDF