लुटारू खाजगी वाहतूकदार !

सण-उत्सव पाहून खाजगी (ट्रॅव्हल्स) वाहतूकदार असंख्य प्रवाशांची अक्षरशः लूटमार करतात; तरीही राज्य परिवहन मंडळाचा सावळा गोंधळ काही संपत नाही. ऐन सणाच्या वेळी खाजगी प्रवासी वाहतूकदार मनमानी कारभार करून बसभाड्यात अचानक वाढ करतात.

महाराष्ट्रात प्रत्येक घरातील सरासरी एक व्यक्ती कोणतेही काम, नोकरी, धंदा, शिक्षण अथवा अन्य कारणे यांमुळे घराबाहेर असते अन् अशा वेळेस शनिवार, रविवार जोडून सणवार आले की, घरी जाण्यासाठी बरीच मोठी संख्या होते. रेल्वेचा पर्याय संपल्यावर बस हाच शेवटचा उपाय ठरतो; मात्र या काळास संधिकाळ मानून खाजगी वाहतूकदार, बसचे एजंट, तत्काल आरक्षण करणारे दलाल, ज्या भावाने तिकीट विक्री करतात, ते पाहून सर्वसामान्यांना अक्षरशः घेरी येते ! कुटुंबाच्या भेटीसाठी मात्र नाइलाज म्हणून सर्वजण दुप्पट मूल्य देऊन घरी जातात. खाजगी वाहतूकवाल्यांकडून ही लूट उघडपणे चालू असतांना सरकार काय करत आहे ? एवढ्या मोठ्या घोटाळ्यात कोणावर वचक बसवावा आणि एकूणच घडी नीट बसावी जेणेकरून लाखो लोकांची लूट होऊ नये, याविषयी सरकार काहीही भूमिका घेत नाही. सरकारला यात रस नाही का ?

या गणेशोत्सवाचेच उदाहारण घेतले, तर कोकणात जाण्यासाठी दुप्पट मूल्य आकारण्यात येत होते. शंका अशी निर्माण होते की, सरकारी आशीर्वादानेच तर ही लुटमार चालू नाही ना ? की सर्वांनाच हप्ते येतात ? या व्यवसायात अनेक राजकारण्यांनीच आपली मालमत्ता गुंतवली आहे. महाराष्ट्रातील परिवहन खाते तर पुढील काही वर्षांनी नियोजितपणे जणू बंदच पाडायचे आहे, अशाच थाटात आतापर्यंतच्या सरकारांनी त्याचा कारभार चालवला. एस्.टी. सुधारावी आणि जनतेच्या लाभात आणावी, असे दुर्दैवाने एकाही मोठ्या नेत्यास वाटले नाही. खाजगी दलाल दिवसाढवळ्या बसस्थानकात येऊन प्रवासी पळवतात. अशी एस्.टी. नफ्यात येईल, असे बोलणारे कोणत्या नंदनवनात आहेत !

दोन मोठ्या शहरांत रात्री निघून सकाळी पोचण्याचा प्रवास एस्.टी. देत नाही. एवढे प्रवासी ती वार्‍यावर सोडत आहे. काही खाबूगिरी करणारे अधिकारी आणि राजकारणी यांचे खाजगी वाहतूकदारांसोबतचे हे आर्थिक साटेलोटे आहे का ?प्रसारमाध्यमे या व्यवसायाविषयी तोंडही उघडत नाहीत वा एखादे स्टिंग ऑपरेशनही करत नाहीत. हिंदुस्थानातील लाखो प्रवाशांना याचा त्रास होतो, हे वास्तव अजून प्रसारमाध्यमे समोर का मांडत नाहीत ? या सर्वांतच एक मोठे अभिनेते विक्रम गोखले यांना एस्.टी.साठीचा चेहरा म्हणून निवडण्यात आला. या सजग अभिनेत्याने एस्.टी.तील असंख्य अपप्रकार पाहून आणि सांगूनही शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी गोखले यांनी राजीनामा दिला. या सर्व परिस्थितीला काय म्हणावे ?

– श्री. निलेश देशमुख, सानपाडा, नवी मुंबई.


Multi Language |Offline reading | PDF