केशरी शिधापत्रिका पालटून दारिद्य्ररेषेखालील पिवळ्या रंगाच्या शिधापत्रिका पालटल्या !

भ्रष्टाचाराची ही बजबजपुरी संपण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

सरकारी योजना लाटण्यासाठी काळाबाजार !

श्रीगोंदे, (जिल्हा नगर) – कुटुंबाचे आर्थिक निकष ठरवून शिधापत्रिका दिल्या जातात; मात्र श्रीगोंदे येथे केशरी शिधापत्रिका पिवळ्या शिधापत्रिकांमध्ये पालटल्या जात आहेत. अशा शेकडो शिधापत्रिका पालटण्यात आल्या असून तहसीलदार मात्र अनभिज्ञ आहेत, अशी माहिती पुढे येत आहे.

नोकरदारांना पांढरी, मध्यमवर्गियांना केशरी आणि त्याखालच्या आर्थिक स्तरातील कुटुंबाला पिवळी शिधापत्रिका मिळते. पिवळी शिधापत्रिका असणार्‍यांना धान्य, केरोसिन यांचा लाभ अधिक मिळतो. रेशन दुकानदार, तलाठी आणि पुरवठा विभाग यांच्याकडे तशा नोंदवह्या असतात. शिधापत्रिका पालटण्यासाठी त्यानुसार पडताळणी करूनच नवीन अथवा दुबार शिधापत्रिका दिली जाते.

श्रीगोंदा येथे महसुली यंत्रणा आणि दलाल यांच्या माध्यमातून आणि तहसीलदारांच्या स्वाक्षरीने पिवळ्या शिधापत्रिकांची संख्या वाढल्याचे लक्षात येत आहे. येथे दुबार शिधापत्रिका देण्यासाठी असणार्‍या शिधावाटप दुकान, तलाठी आणि पुरवठा विभाग या तिन्ही ठिकाणचे नोंदीचे तिन्ही रजिस्टर एकाच ठिकाणी असल्याची माहिती पुढे येत आहे. तहसील कार्यालयात दोन वर्षांत किती दुबार शिधापत्रिका दिल्या गेल्या याची कुठेही नोंद आढळली नाही. तलाठी त्या नोंदवह्या मागणी करूनही देत नाहीत, असेही समजते. रजिस्टर तपासणारी यंत्रणाच यात गुंतल्याने याविषयी गोपनियता राखली जाते.

अशा बोगस शेकडो शिधापत्रिका वाटल्या गेल्याचेही पुढे येत आहे. शिधापत्रिकांविषयी तहसीलच्या पुरवठा विभागात काहीच आकडेवारी मिळत नसल्याने तेथील काही कर्मचारीही त्यात सहभागी असल्याची चर्चा आहे. तहसीलदार, पुरवठा विभागच जर बोगस शिधापत्रिकांपासून अनभिज्ञ असेल, तर त्यावर नेमके कोणाचे नियंत्रण आहे, याविषयी शंका आहे.


Multi Language |Offline reading | PDF