रक्ताच्या संसर्गामुळे १ सहस्र १३२ रुग्णांना ‘एच्आयव्ही’ची बाधा

वैद्यकीय तपासणीतील निष्काळजीपणा चव्हाट्यावर !

जनतेच्या जिवाशी खेळणार्‍या आरोग्यसेवांचा काय उपयोग ?

मुंबई – एड्स नियंत्रण कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यातील ‘एच्आयव्ही’ आजाराचे प्रमाण नियंत्रणात आणण्यात यश आले असले, तरी रक्ताच्या संसर्गामुळे आणि वैद्यकीय उपचारातील निष्काळजीपणामुळे (एका रुग्णासाठी वापरलेली सुई किंवा इंजेक्शनचा वापर अन्य रुग्णासाठी करणे) राज्यभरात अनेकांना ‘एच्आयव्ही’ची बाधा होत आहे.

२०११-१२ या साली राज्यभरात ५४,२८९ ‘एच्आयव्ही’ बाधित रुग्णसंख्या २०१६-१७ पर्यंत २५,१२० नी घटली आहे. गेल्या पाच वर्षांत रक्ताच्या संसर्गामुळे १ सहस्र १३२ रुग्णांना ‘एच्आयव्ही’ची बाधा झाली. माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत चेतन कोठारी यांनी ही माहिती समोर आणली आहे. गेल्या पाच वर्षांत संसर्गिक सुई आणि इंजेक्शन यांच्या वापरामुळे ५८१ जणांना ‘एच्आयव्ही’ची बाधा झाली आहे. तर गर्भवती मातेपासून ११ सहस्र ८४१ मुलांना ‘एच्आयव्ही’ची लागण झाली आहे.

सध्या रक्त तपासणीसाठी वापरण्यात येणार्‍या एलायझा पद्धतीत रक्तदानानंतर ‘एच्आयव्ही’च्या विषाणूंचे तीन महिन्यानंतर निदान होते. यासंदर्भात आपण राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडे तक्रार केली असून नियमांचे पालन न करणार्‍या रक्तपेढ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, असेे कोठारी यांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF