परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी चॉकलेट दिल्यावर देवाच्या हातून प्रसाद मिळाला, असा भाव असणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. नंदन कुदरवळ्ळी (वय ५ वर्षे) !

चि. नंदन कुदरवळ्ळी

भाद्रपद शुक्ल पक्ष अष्टमी, २९.८.२०१७ या दिवशी रामनाथी आश्रमातील चि. नंदन कुदरवळ्ळी याचा वाढदिवस झाला. या निमित्ताने त्याची आई सौ. सौम्या कुदरवळ्ळी यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पाहूया.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नंदनला २ चॉकलेट दिल्यावर त्याने त्यांतील १ चॉकलेट लगेचच आईला देणे

एकदा मी आणि माझा मुलगा चि. नंदन सेवेनिमित्त प्रसाद ठेवण्यात येणार्‍या खोलीजवळ गेलो असतांना तेथे प.पू. डॉक्टर होते. त्यांनी नंदनच्या हातावर २ चॉकलेट ठेवून कोणते चॉकलेट चांगले वाटते ?, असे विचारले. तेव्हा नंदनने त्यांतील एक चॉकलेट निवडले. नंतर गुरुदेवांनी ते दुसरे चॉकलेटही त्याला दिले. नंदनने ते चॉकलेट लगेचच मला दिले. तेव्हा गुरुदेव म्हणाले, सर्व जण चॉकलेट स्वतःसाठीच ठेवतात ना; पण याने ते लगेच तुला दिले.

२. नंदनने प्रत्यक्ष देवाने चॉकलेट दिले, असे सांगणे आणि चॉकलेट खाण्यापूर्वी यातून आम्हाला पुष्कळ चैतन्य मिळू दे, अशी प्रार्थना करणे

त्यानंतर आम्ही खोलीत आलो. तेव्हा नंदन अतिशय प्रेमाने मला म्हणाला, आई, तू केवढी भाग्यवान आहेस ना ? तुला प्रत्यक्ष देवानेच चॉकलेट दिले. तू आता चॉकलेट खा. मी चॉकलेटचे वेष्टन काढत असतांना तो म्हणाला, आई, आधी प्रार्थना करूया. मग तो प्रार्थना करू लागला, हे श्रीकृष्णा, प्रत्यक्ष देवाच्या हातून आम्हाला हा प्रसाद मिळाला आहे. यातून आम्हाला पुष्कळ चैतन्य मिळू दे. प्रार्थना केल्यानंतर त्याने मला चॉकलेट चघळून खायला सांगितले.

नंदनचा गुरुदेवांप्रतीचा भाव पाहून मला कृतज्ञता वाटली आणि माझ्याही गुरुदेवांप्रतीच्या भावात वृद्धी झाली.

सौ. सौम्या कुदरवळ्ळी

आश्रमातील अन्नाप्रतीचा कृतज्ञताभाव !

एकदा नंदनने ताटातले सगळे अन्नपदार्थ संपवले नव्हते; म्हणून मी ते टाकून दिले. नंदनला हे सांगितल्यावर तो मला म्हणाला, आई, तू ते खाऊ शकत होतीस ना ! तेव्हा मी त्याला सांगितले, मी तुझ्या ताटातले अन्नपदार्थ खाऊ शकत नाही. त्यावर तो लगेच मला म्हणाला, तू माझ्यासाठी आणलेले मेदूवडे मी खाल्ले नव्हते. तेव्हा तू ते खाल्लेस ना ? (त्या दिवशी मी त्याच्यासाठी बाहेरून मेदूवडे आणले होते. त्याने ते खाल्ले नाहीत; म्हणून मी ते खाल्ले.) हे अन्न आश्रमातील आहे. तू ते टाकून न देता खायला हवे होतेस. त्याच्या मनात आश्रमातील अन्नाविषयी कृतज्ञताभाव आहे. ते अन्न टाकून दिल्यानंतर त्याला वाईट वाटले. मला माझी लाज वाटली.

– सौ. सौम्या कुदरवळ्ळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१२.२०१६)


Multi Language |Offline reading | PDF