विनाशाकडे नेणारा ‘स्वैराचार’ !

नोंद

नुकतीच एक बातमी वाचनात आली. त्यानुसार महिलेचा पुरुष झालेल्या व्यक्तीने लिंग पालट करून पुरुषाची महिला झालेल्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ वर्षीय सुकन्या कृष्णन् यांच्याशी ४६ वर्षीय आरव अप्पूकुट्टन् यांनी विवाह करण्याचे ठरवले आहे. केरळमध्ये जन्माला आलेल्या युवतीला ‘आपण स्त्रीच्या शरीरात अडकलेला पुरुष आहोत’, याची जाणीव झाली. तिने शस्त्रक्रिया करून लिंग पालटायचे ठरवले, तर दुसरीकडे पुरुष म्हणून जन्माला आलेल्या तरुणाला ‘स्वतःचे शरीर पुरुषाचे असले, तरी महिला असल्याची’ भावना बळावली होती. याच जाणिवेतून त्यानेही लिंग पालटण्याची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या दोघांनी मुंबई येथील रुग्णालयात ३ वर्षांपूर्वी एकाच वेळी लिंग पालटाची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर ते दोघे मूळ गावी परतल्यानंतर आता पुढच्या मासांत एका मंदिरात विधीवत् विवाह करणार आहेत. आरव आणि सुकन्या यांच्या कुटुंबियांचा त्यांना पाठिंबा आहे.

यापूर्वीही समलैंगिक विवाह, केरळमध्ये युवक-युवती यांनी रस्त्यावर उतरून सामूहिक कार्यक्रमाचे आयोजन करत एकमेकांना चुंबन देणे, असे अनेक अश्‍लाघ्य आणि पाश्‍चात्त्य संस्कृती यांना प्रोत्साहन देणारे प्रकार सर्रास चालू आहेत. महिला आणि पुरुष यांनी लिंग पालटण्याचा हा प्रकार म्हणजे निसर्गाच्या देणगीमध्ये ढवळाढवळ केल्यासारखेच आहे. महिला आणि पुरुष यांना अचानक ‘आपण पुरुष वा महिला आहोत’, असे विचार येऊन लिंग पालटणे, म्हणजे स्वतःची बौद्धिक दिवाळखोरी घोषित करणे आणि स्वतःची मानसिकता किती खालच्या स्तराला गेली आहे, हेच दर्शवते.

अध्यात्मदृष्ट्या पाहिल्यास असे विचार येणे, हे चुकीचे तर आहेतच; त्याहीपेक्षा हा विचार स्वतःचा आहे कि अनिष्ट शक्तींचा आहे, हे आधी स्वतःला कळले पाहिजे. कारण प्रारब्धाने आणि दैवयोगाने स्वतःला जो जन्म मिळाला आहे, त्या जीवनशैलीत पालट करण्याचा अधिकार कोणालाही नाही. सध्या मानवाची बुद्धी ही विज्ञानाच्या आधारे चुकीचे अधिकार स्वतःकडे घेऊ पहात आहे. विज्ञानाचा अतिरेकी वापर आणि संशोधन यांमुळे मानव स्वतःचा विनाश ओढवून घेत आहे.

पाश्‍चात्त्य संस्कृतीचे आक्रमण, हा आतंकवादच !

वरील प्रकारचे विचार येणे, हा तथाकथित समानता, स्वैराचार आणि पाश्‍चात्त्य संस्कृती यांच्या अंधानुकरणाच्या नावाखाली बोकाळत असलेला अन् भारतीय संस्कृतीवर आघात करणारा आतंकवादच आहे. हा आतंकवाद रोखण्यासाठी शासनाने योग्य ती पावले उचलायला हवीत. असे विचार टाळण्यासाठी नैतिकता आणि चारित्र्य शिकवणारे धर्मशिक्षण द्यायला हवे, तरच अशा विचारांना कठोर पायबंद घातला जाऊ शकतो. अन्यथा आगामी पिढी आणि राष्ट्र यांचे भवितव्य धोक्यात आहे, हे निश्‍चित !

– श्री. भूषण कुलकर्णी, पुणे

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now