(म्हणे) ‘हिटलरविषयी प्रेम असणारे लोक ज्यू लोकांना भेटत आहेत !’

संघद्वेषाची कावीळ झालेले डॉ. बाबा आढाव यांची गरळओक !

डॉ. बाबा आढाव

पुणे, ३० ऑगस्ट (वार्ता.)  आताच्या शासनातील एकाही मंत्र्याने संविधानावर हात ठेवून शपथ घेतली नाही. सर्वांनी ईश्‍वराला साक्षी मानून शपथ घेतली. (नास्तिकवादी आढाव ! मुसलमान मंत्र्यांनी ‘अल्लाह’ला मानत शपथ घेतल्यावर त्याविरोधात बाबा आढाव कधी बोलल्याचे ऐकिवात नाही. – संपादक) गेल्या ५० वर्षांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पोसला गेला आणि आपण लक्ष दिले नाही. आता त्यांचे राज्य आले असून सध्या धर्मनिरपेक्षतावाद धोक्यात आहे. त्यामुळे हिटलरविषयी प्रेम असणारे ज्यूंना भेटायला जात आहेत, अशी टीका डॉ. बाबा आढाव यांनी केली. शमसूल इस्लामलिखित ‘गोळवलकरवाद एक अभ्यास’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि त्या विषयावरील परिसंवाद असा कार्यक्रम येथील एस्.एम्. जोशी सभागृहात २७ ऑगस्टला झाला. त्या परिसंवादात ते बोलत होते. या कार्यक्रमात डॉ. नितीश नवसागरे, विचारवंत विनय हर्डीकर, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे डॉ. शमशुद्दीन तांबोळी, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ आदी उपस्थित होते. या वेळी सर्वच वक्त्यांनी संघ, द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकरगुरुजी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

ते पुढे म्हणाले,

१. शरद पवार मंत्री असतांना त्यांनी ‘ईश्‍वर’ हा शब्द पाठ्यपुस्तकातून काढायला लावला. आताच्या शासनाने पुन्हा तो अंतर्भूत केला. (शासनाने चुकीचे काय केले ? महाराष्ट्रातील संत परंपरेने ‘ईश्‍वराची भक्ती करा’, असा अमूल्य संदेश दिला. डॉ. आढावांचा हा आक्षेप म्हणजे सर्व संतांच्या संदेशाची कुचेष्टा नव्हे का ? – संपादक)

२. संपूर्ण भारतभरात गीतेला डोक्यावर घेतले जात आहे. त्याच गीतेमध्ये ‘ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः । ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत’ या श्‍लोकांविषयी काय म्हणायचे ? (हा श्‍लोक गीतेतील नसून ऋग्वेदातील आहे, हे ही न जाणणारे म्हणे विचारवंत ! कोणत्याही श्‍लोकाचा स्वतःला हवा तसा सोयीस्करपणे अर्थ लावणारे तथाकथित पुरोगामी ! – संपादक) या श्‍लोकाद्वारे जो हक्क ब्राह्मण्यांना मिळाला, तो हक्क ते सहजरित्या सोडतील का ? (ब्राह्मणद्वेषी आढाव ! – संपादक)

(म्हणे) ‘देशात माजी उपराष्ट्रपतींनी खंत (?) व्यक्त केली, तर त्यांना देशद्रोही म्हटले जाते, हा असहिष्णुपणा ! – शमशुद्दीन तांबोळी

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांच्या मनातील खंत व्यक्त केली, तर लगेच त्यांना देशद्रोही संबोधले जाते. यावरून देशातील असहिष्णु वातावरण लक्षात येते. ‘हिंदु उदारमतवादी आहेत’, या विचाराचे खंडन करणारे गोळवलकरांचे लिखाण आहे. ‘घरवापसी’च्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे हिंदुत्वकरण करणे, वंशवादाचा बचाव, गुजरातमधील वर्ष २००२ च्या दंगलींप्रमाणे वांशिक हत्या करणे, या सगळ्याचा पुरस्कार गोळवलकर त्यांच्या लिखाणातून करतात. आजही रा.स्व. संघाकडून त्याच विचारांचे पालन करत असून फक्त धोरणे पालटली आहेत. (असे असते तर केरळमध्ये साम्यवाद्यांकडून संघ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या नसत्या आणि तांबोळीही एवढे संघविरोधी बोलू शकले नसते. – संपादक) १५ ऑगस्टच्या भाषणात पंतप्रधान संविधानात असलेल्या ‘इंडिया किंवा भारत’ या शब्दांचा उल्लेख न करता ‘हिंदुस्थान’ असे म्हणतात. या मागची मानसिकता आपण लक्षात घ्यायला हवी. (स्वातंत्र्याच्या आधी देशाला हिंदुस्थानच म्हटले जात असतांना आणि देशामध्ये बहुसंख्य हिंदू असतांना हिंदुस्थान म्हटल्यावर शमशुद्दीन तांबोळी यांना पोटशूळ का ? – संपादक) ‘इसिस’, ‘जमात-ए-इस्लाम’, ‘बोको हराम’ यांसारख्या विखारी प्रवृत्तीही मानवतेला विघातक आहेत.

विनय हर्डीकर यांनी केलेली गणेशोत्सवाविषयीची उपहासात्मक टीका

(म्हणे) ‘गणपतीचा सण एकसूत्रीपणाने होत नाही, तिथे ‘एक धर्म-एक भाषा’ कशी टिकेल ?’

गोळवलकर आणि संपूर्ण संघ यांचे ध्येय म्हणजे ‘एक धर्म, एक विचार, एक भाषा’ असे होते. आता गणेशोत्सव चालू आहे. लेले वगैरे मंडळींचा अर्ध्या दिवसाचा गणपती विसर्जितही झाला. अनेक लोक दीड, पाच, सात आणि दहाव्या दिवशी विसर्जन करतील. जिथे गणेशोत्सवामध्ये एकसूत्रीपणा नाही, तिथे ‘एक धर्म-एक भाषा’ कशी टिकेल ? (धर्मशास्त्र माहिती नसतांना हर्डीकर यांनी त्याविषयी बोलणे कितपत योग्य ? अल्पसंख्यांक असलेल्या मुसलमान समाजामध्येही काही सूत्रांमध्ये भिन्नता आहे. त्यामुळे त्यांच्यावरही हर्डीकर टीका करतील का ? – संपादक) स्वतः संघ ‘गोळवलकरांचे विचार त्यागले आहेत’, असे म्हणतो. त्यामुळे गोळवलकरांचा ‘वाद’ राहिला नसून ते तर्कट झाले आणि आता त्याचेही खरकटे झाले आहे. (सुसंस्कृत म्हणवणार्‍या हर्डीकर यांना ही भाषा शोभते का ? – संपादक)

(म्हणे) ‘हिटलरप्रमाणेच नरसंहार केला पाहिजे, असे गोळवलकर म्हणत !’ – डॉ. नितीश नवसागरे

गोळवलकर यांनी हिटलर आणि मुसोलिनी यांच्याप्रमाणेच वंशवाद मांडला. संघ पालटणारा असता, तर ते कधीच मूलतत्त्ववादी राहिले नसते. ज्या प्रकारे हिटलरने नरसंहार केला, त्याप्रमाणेच आपणही नरसंहार करायला हवा, असे गोळवलकर म्हणत.

(पू. गोळवलकरगुरुजी यांनी असे कधीही म्हटलेले नसतांना त्याविषयी कांगावा करणारे डॉ. नवसागरे ! – संपादक) ‘आधी ३ हा अपशकुनी आकडा आहे’, असे म्हणून तिरंग्याला नाकारणारे आता मशिदींवर तिरंगा फडकावण्याच्या गोष्टी करतात. (असे आहे तर मशिदीवरही तिरंगा फडकावला जात नाही, त्याविषयी डॉ. नवसागरे काही बोलतील का ? – संपादक) प्रधानसेवक मोदी हेदेखील ‘गोळवलकर माझी प्रेरणा आहेत’, असे सांगत त्यांच्यावर पुस्तक लिहितात. महाराष्ट्रात असलेला शांततेचा संस्कार हा फुले, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी या सर्व विचारवंतांमुळेच झाला आहे. (छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य निर्माण केले आणि रयतेवर योग्य संस्कार केले. यांसमवेतच संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्‍वर, संत रामदासस्वामी आणि अनेक संतांनीही समाजाला ज्ञानाचे भांडार उपलब्ध करून दिले. सुरक्षित राज्य आणि संतांनी दिलेली साधना यामुळे महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत शांत आहे. ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF