समादेशांवर (सल्ल्यांवर) उधळपट्टी अन् कामात काटकसर

‘नाव सोनूबाई हाथी कथलाचा वाळा’ या म्हणीचा अर्थ नेमका जाणून घ्यायचा असेल, तर पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्पांसाठी सल्लागार नेमण्याच्या कार्यपद्धतीकडे पहावे. महानगरपालिकेचे विविध प्रकल्प, योजना यांची यशस्वी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने म्हणे सल्लागार नेमण्यात येतात. गेल्या १० वर्षांत ४८ प्रकल्पांसाठी महानगरपालिकेने सल्लागार आस्थापनांवर ४२ कोटी रुपयांची उधळपट्टी केली. या खर्चिक सल्ल्यांच्या बदल्यात कुणी शहरात सुंदर प्रकल्प सक्षमपणे कार्यान्वित झाल्याची अपेक्षा करत असेल, तर त्याच्या पदरी अपेक्षाभंगाशिवाय दुसरे काही पडणार नाही; कारण या प्रकल्पांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे जवळपास २५ प्रकल्प अद्याप कागदावरच असल्याची माहिती समोर आली आहे. अशा गोष्टींमुळेच मग सल्लागार समिती, स्मार्ट सिटी अशा भुलवणार्‍या नावांच्या आड खिळखिळेपणा तर नाही ना, असा प्रश्‍न पडतो.

आर्थिक लागेबंधे ?

उड्डाणपूल, भुयारी मार्ग, नदी सुधार योजना, पाणीपुरवठा, तसेच ग्रेडसेपरेटर यांसारख्या प्रकल्पांसाठी पुणे महानगरपालिकेने सल्लागारांची नेमणूक केली होती. खरे तर (मागितले नसतांनाही फुकट) सल्ले देण्यात शहरवासीय निष्णात आहेत. यातील गमतीचा भाग सोडला तरी तज्ञ व्यक्तींची शहरात, राज्यात अथवा देशात कमतरता नाही. नागरिकांच्या चांगुलपणाला साद घातली, तर अनेक व्यक्ती अल्प दरात प्रसंगी विनामूल्यही सरकारला साहाय्य करू शकतात; मात्र त्यासाठी कष्ट न घेता, संपर्कांचे जाळे न वापरता, कुणाचेही साहाय्य न घेता सरळ सल्लागार आस्थापनाला कंत्राट देणे, हा दायित्वशून्यपणा नव्हे का ? सल्ले घेऊनही काम पूर्ण न होण्यामागे काही ‘अर्थ’ आहे का, अशी शंका येते, ती याचमुळे !

सुटसुटीतपणा आणि काटकसरीचे वावडे

एकंदरितच किचकट कायदेप्रक्रिया, गुंतागुंतीची कार्यपद्धती, तसेच चालढकलपणा यांमुळे बर्‍याच वेळा प्रकल्पांचे तीनतेरा वाजत असल्याचे अनुभवायला येते. अनेक वेळा एखाद्या गोष्टीच्या पूर्ततेसाठी लागणारे मनुष्यबळ, पैसा, प्रकल्पाचा उद्देश आणि फलनिष्पत्ती याचाही ताळमेळ जुळत नसल्याचे दिसून येते. सुटसुटीतपणा आणि काटकसर यांचे वावडे असल्याने अनेक ठिकाणी पैशांची, तसेच वस्तूंची उधळपट्टी होत असल्याचे पहायला मिळते. हे सर्व टाळणे हा खरा ‘स्मार्ट’पणा आहे. स्मार्टपणाची कल्पना ही भौतिक सोयीसुविधांशी निगडित नसून एखादी गोष्ट बनवण्याच्या, वापरण्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. त्याची वानवा असल्यानेच ‘समादेशांवर उधळपट्टी आणि कामात काटकसर’ असे चित्र पहायला मिळते. असे होऊ नये म्हणून प्रामाणिक, तत्पर, कर्तव्यदक्ष, संवेदनशील, राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी अन् सत्त्वगुणी लोकांची आवश्यकता आहे.

– प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे, पुणे


Multi Language |Offline reading | PDF