जीवघेणे गॅसफुगे !

गॅसफुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या सिलिंडरचा स्फोट होऊन फुगेवाल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मुंबईतील भांडुप परिसरात घडली. या स्फोटात फुगेविक्रेत्याचे दोन सहकारीही घायाळ झाले. मागच्या वर्षी जानेवारी मासात अशाच प्रकारची घटना कल्याण येथील एका शाळेजवळ घडली होती. यामध्येही फुगेविक्रेत्याचा मृत्यू होऊन पाच विद्यार्थी आणि सात पालक गंभीररित्या घायाळ झाले होते. यातील एका विद्यार्थ्याला कायमस्वरूपी दृष्टी गमवावी लागली होती.

वरील दोन्ही प्रकरणांत फुगेविक्रेते हायड्रोजनयुक्त गॅस सिलिंडर अवैधरित्या वापरत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. अत्यंत ज्वलनशील हायड्रोजनवायूने भरलेले गॅस सिलिंडर वैध आहेत कि अवैध, हे पडताळण्याचे काम नक्कीकोणाचे ? महापालिकेचे कि पोलिसांचे ? महापालिका गॅसफुगे विकणार्‍यांना गॅस सिलिंडर वापरण्याचा परवाना देते कि सारेच विक्रेते अवैधरित्या ते वापरत आहेत ? लोकांच्या जिवाशी खेळणार्‍या अशा गॅसफुगे विक्रेत्यांवर महापालिका कारवाई का करत नाही ? स्थानिक पोलीस प्रशासनाला या गोष्टी लक्षात येत नाहीत का ? कि महापालिका अधिकारी, पोलीस आणि गॅसफुगे विक्रेते यांच्यामध्ये काही आर्थिक हितसंबंध असतात ? असे एक ना अनेक प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत.

असे अवैध सिलिंडर वापरून गॅसफुगे विकणारे फुगेविक्रेते ठाणे आणि मुंबई येथील अनेक शाळांच्या जवळ पहायला मिळतात. लहान मुलांना गॅसफुग्यांचे अधिक आकर्षण असल्याने या गॅसफुगेवाल्यांच्या भोवताली शालेय विद्यार्थ्यांचा कायम गराडा असतो. अशा अवैध गॅस सिलिंडरचा केव्हाही स्फोट होऊ शकतो, याची त्या निष्पाप जिवांना पुसटशी कल्पनाही नसते. या गॅसफुगे विक्रेत्यांना त्यांच्या सिलिंडरमधील गॅस संपल्यावर तो सहजरित्या भरूनही मिळतो. त्यामुळे हे सिलिंडर आणि गॅस उपलब्ध करून देणारे तरी वैध आहेत कि तेसुद्धा या साखळीतील एक भाग आहेत, याविषयीची पडताळणीसुद्धा यानिमित्ताने करणे आवश्यक आहे. वरील दोन्ही घटना अत्यंत संवेदनशील असून अशा स्वरूपाची आणखी एक घटना घडण्याआधी हायड्रोजन गॅस सिलिंडर प्रकरणात महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक आहे.

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now