ममता नव्हे क्रूरता !

संपादकीय

माया आणि ममता केवळ राज्यातील मुसलमानांसाठीच आहे, हे कृतीतून सातत्याने दर्शवणार्‍या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा हिंदूंचे दमन करण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदूंचा विजयादशमी हा सण आणि मुसलमानांचा मोहरम् हे सण यंदाच्या वर्षीही लागोपाठ आले आहेत. मुसलमानांचा मोहरम् निर्विघ्नपणे पार पडावा; म्हणून ममता(बानो) यांनी हिंदूंनी ३० सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजल्यापासून १ ऑक्टोबरपर्यंत दुर्गामूर्तींचे विसर्जन करू नये, असा सरकारी फतवा काढला. मोहरम् हा शियापंथीय मुसलमानांचा शोक व्यक्त करण्याचा दिवस ! या दिवशी काढण्यात येणार्‍या मिरवणुकीत स्वतःला अमानुष दुखापत करत शिया मुसलमान हुसेन आणि त्याच्या अनुयायांच्या मृत्यूचा शोक व्यक्त करतात. मुसलमानांना शोक करता यावा; म्हणून हिंदूंच्या विजयोत्सवावर निर्बंध घालणार्‍या ममता(बानो) यांचा हा निर्णय केवळ पक्षपातीच नव्हे, तर अक्षरशः रझाकारी आहे.

न्याययंत्रणेच्या विरोधातील उद्दामपणा !

विशेष म्हणजे गेल्या वर्षी सरकारच्या अशाच निर्णयाच्या विरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. तेव्हा न्यायालयाने सरकारला फटकारत एका धर्मियांना खुश करण्याचा हा प्रयत्न आहे. यापूर्वी कधीही दसर्‍याच्या दिवशी मूर्ती विसर्जनावर बंदी घालण्यात आलेली नाही, असे म्हटले होते. न्यायालयाने स्पष्ट शब्दांत कानउघाडणी करूनही ममता यांनी पुन्हा तसा तसाच निर्णय घेणे, हा त्यांचा उद्दामपणा नव्हे तर दुसरे काय ? न्यायालयाचा हा अवमानच आहे. हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणार्‍या या फतव्याच्या विरोधात देवीभक्त बंगाली बांधव पुन्हा न्यायालयीन लढा देतीलही; मात्र आता त्याच्या जोडीला हिंदुद्रोही राज्यकर्ते पदच्युत करण्यासाठी जनतेनेही लढा उभारणे आवश्यक आहे.

पश्‍चिम बंगालमधील इस्लामशाही !

पश्‍चिम बंगालमध्ये होणारा हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व यांचा कोंडमारा पाहिला की, राज्यात लोकशाही आहे कि इस्लामशाही ? असाच प्रश्‍न पडतो. ममता (बानो) सरकारच्या काळात यावर्षी रामनवमी आणि हनुमानजयंती या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुका धर्मांध आणि पोलीस यांच्याकडून लक्ष्य करण्यात आल्या. यावर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील सीओडी येथे हनुमानभक्तांनी काढलेल्या मिरवणुकीला अनुमती नसल्याचे सांगत पोलिसांनी अमानुष लाठीमार केला, तर हुगळी येथे एप्रिल २०१७ मध्ये मुसलमानबहुल भागात श्रीरामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक केली. त्या वेळी गावठी बॉम्बचा वापर करण्यात आला होता, तसेच काही दुकानांची जाळपोळ करण्यात आली होती. मुसलमानांविषयी ममतेने वागणार्‍या ममता हिंदूंच्या संदर्भात मात्र क्रूर होतात, हेही अनेक उदाहरणांवरून स्पष्ट होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी काही हिंदू गोमांस खातात. प्रत्येकाच्या खाण्याच्या आवडीनिवडी असतात, हे विसरायला नको, असे सांगत गोमांसभक्षणाचे समर्थन केले होते. इफ्तार मेजवानीत सहभागी होणे हिंदु धर्माच्या विरुद्ध असेल, तर मी त्या ठिकाणी नेहमी जाईन, असे वक्तव्यही केले होते. शिजवलेले मांस घरोघरी पोहोचवण्यासाठी मीट ऑन व्हील्स ही योजना प्रायोगिक स्तरावर चालू करण्याची घोषणा केली होती. याच सरकारने बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील प्रसिद्ध तारकेश्‍वर मंदिर बोर्डाच्या अध्यक्षपदी फिरहाद हकीम या मुसलमान मंत्र्याची नियुक्ती केली होती. १३ डिसेंबर २०१६ ला हावडा जिल्ह्यातील धुलगडमध्ये धर्मांधांनी केलेल्या दंगलीच्या संदर्भातही तो धार्मिक हिंसाचार नाही. ती लहान घटना आहे, अशी प्रतिक्रिया देऊन धर्मांधांना चुचकारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी वस्तूनिष्ठ वार्तांकन केल्याविषयी झी न्यूजचे संपादक श्री. सुधीर चौधरी यांच्या विरोधात तक्रार करायलाही सरकारने मागेपुढे पाहिले नाही. ११ जानेवारी २०१७ या दिवशी या सरकारने एका आदेशाद्वारे राज्यातील सर्व शासकीय ग्रंथालयांमध्ये ईद-उद-मिलादच्या दिवशी नबी दिवस (महंमद पैगंबर यांच्या जन्मदिन) साजरा करण्याचा आदेश काढला होता. ममता यांच्या तृणमूल काँग्रेसने पाकिस्तानच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या डॉ. तारेक फतेह यांच्या कार्यक्रमाला अनुमती नाकारली होती; मात्र पाकिस्तानी गायक गुलाम अली याच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रप्रेमींच्या विरोधाला न जुमानता पायघड्या घातल्या होत्या. यावरून धर्म आणि राष्ट्र विरोधकांना मोकळे रान, असेच ममता (बानो) यांच्या कारभाराचे वर्णन करता येईल. सरकारकडून केले जाणारे बांगलादेशी मुसलमानांच्या घुसखोरीकडे दुर्लक्ष, गोतस्करीकडे दुर्लक्ष, शारदा चिटफंड प्रकरणासारखे भ्रष्टाचार, कार्यकर्त्यांचे जिहाद्यांशी असलेले संबंध, बॉम्ब बनवणारे कार्यकर्ते या गोष्टी पाहिल्या, तर ममता यांच्या साध्या राहणीमानाच्या आड किती राष्ट्रद्रोही आणि हिंदुद्वेषी आचार अन् विचार लपले आहेत, याची कल्पना येईल. पश्‍चिम बंगालमधील या इस्लामशाहीला हिंदु राष्ट्रवाद हेच अंतिम उत्तर आहे.

दुर्गादेवीची आराधना करणार्‍या बंगाली बांधवांना हिंदु राष्ट्रवादाचा वसा घेणे कठीण नाही. आता देवीच्या मूर्तीची पूजा करण्याबरोबरच काळानुसार ब्राह्म आणि क्षात्र तेजाची उपासना करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने आताच सजग झालो नाही, तर आज विसर्जन मिरवणुकीवर असणारी बंदी उद्या दुर्गापूजा करण्यावरही येऊ शकेल. असे होऊ नये म्हणून धर्म आणि राष्ट्र यांच्यावर होणार्‍या आघातांच्या विरोधात वज्रमूठ बांधायलाच हवी.


Multi Language |Offline reading | PDF