आजार परवडला; पण उपचार नको !

गुडघे पालटण्याच्या शस्त्रक्रियांमध्ये वापरल्या जाणार्‍या रोपणाच्या सामग्रीकरिता ३०० टक्क्यांपर्यंत नफेखोरी होत असल्याचे सत्य राष्ट्रीय औषध दर नियामक प्राधिकरणाने (एन्पीपीएने) अलीकडेच घोषित केले होते. आता एन्पीपीएने गुडघे पालटण्याच्या शस्त्रक्रियांमध्ये वापरल्या जाणार्‍या सामग्रीच्या कमाल किमती निश्‍चित केल्या आहेत. त्याप्रमाणे रुग्णांना खर्‍या अर्थी लाभ मिळतो का, यावर लक्ष ठेवावे लागणार आहे. असे केले तरच रुग्णांना दिलासा मिळू शकेल; अन्यथा काही कालावधीनंतर पूर्वीप्रमाणेच स्थिती निर्माण होऊन त्यामध्ये रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत राहील.

गुडघ्याच्या शस्त्रक्रियांमधील लाभाची टक्केवारी पहाता या शस्त्रक्रिया खरंच आवश्यक असतात, कि डॉक्टर आर्थिक मलिद्यासाठी यांत गुंतलेले आहेत, असा प्रश्‍न पडल्यास नवल वाटू नये. औषधे आणि प्रसाधने कायद्यानुसारही औषधविक्री व्यवहारात कमाल १६ टक्के लाभ कमावण्याचीच मुभा दिली असतांना या व्यवहारात मात्र ३०० टक्क्यांपर्यंत नफा कमावण्याची मुभा कशी दिली जाते, असा प्रश्‍न निर्माण होतो. खरे तर एन्पीपीएला या गोष्टींचा उलगडा होण्यासाठी पुष्कळ वेळ लागला आहे. अशा प्रकारांविषयी त्वरित माहिती देऊन दोषींवर कारवाई होणे अपेक्षित होते; मात्र आपल्या देशात अशा कारणांसाठी शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही, हे आपले दुर्भाग्य आहे.

गुडघेदुखीची समस्या बहुतांशपणे उतारवयात तीव्रपणे जाणवते. साधारणपणे तेव्हा माणूस सेवानिवृत झालेला असतो. अशा वेळी आयुष्यभराचे कमावलेले धन अशाप्रकारे खोर्‍याने लुटून संपणार असेल, तर माणसाला पुढील आयुष्य कसे बरे आनंदात घालवता येईल ? त्यातच देशात फार मोठा वर्ग असाही आहे, ज्यांना निवृत्तीनंतर काहीच आर्थिक लाभ मिळत नाही. अशांना हा आजार जडल्यास त्यांनी याचा सामना कसा करावा ? या सर्वांचा परिणाम म्हणजे माणूस नकारात्मकतेने ग्रासला जातो.

आरोग्यसेवा ही व्यवसाय झाला आहे. औषध आस्थापने, तंत्रज्ञान पुरवणारी आस्थापने आदींच्या खाजगी हितसंबंधांना बांधील असलेली सरकारे यांमुळे आरोग्यसेवेला झपाट्याने व्यावसायिकतेचे रूप येत आहे. विमा आस्थापनांना आरोग्य विमा ही मोठी संधी असल्यामुळे त्यांचाही वैद्यकीय क्षेत्राच्या खाजगीकरणासाठीचा दबाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हा व्यवहार जागतिक पातळीवर सर्वत्र दिसून येत आहे. आरोग्यसेवा महाग होणे, सामान्य लोकांना ती न परवडणे, लाभासाठी अयोग्य पद्धतीने व्यवहार होणे, फसवणूक होणे हे प्रकार वाढत आहेत. या सर्व गोष्टींमुळेच सर्वसामान्य रुग्ण अगदी मेटाकुटीस येऊन आजार परवडला; पण (महागडे) उपचार नको, असे म्हणत दिवस काढत असतो. ही व्यवस्था पालटण्यासाठी नैतिकता आणि निःस्वार्थ वृत्ती यांचे अधिष्ठान असलेल्या हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे !

– श्री. संदीप काते, दहिसर, मुंबई.


Multi Language |Offline reading | PDF