विविध अनुभूतींच्या माध्यमातून उपाध्ये कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा !

अमृतवाणी भाग – ४ या ग्रंथातील निवडक लिखाण

२३ ऑगस्ट या दिवशी पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांनी लिहिलेल्या अमृतवाणी भाग – ४ मधील सौ. राजश्री फणसळकर यांची जन्मकथा पाहिली आज त्यापुढील भाग पाहूया.

पू. (सौ.) मंगला उपाध्ये

१. करणीचा प्रयोग झाल्यावर त्यापासून रक्षण करणे

१ अ. भानामतीने स्वयंपाकघरातील भांडी आपोआप खाली पडणे आणि गुरूंचे नामस्मरण केल्यावर भांडी खाली पडणे बंद होणे : एकदा आमच्यावर भानामतीचा प्रयोग झाला होता. त्या वेळी रात्री आम्ही सर्व जण झोपलो असतांना स्वयंपाकघरातून फार मोठा आवाज ऐकू येत होता. त्या वेळी सगळी भांडी खाली पडत होती. एवढा मोठा आवाज ऐकून आम्ही सर्व जण खडबडून जागे झालो. उठून स्वयंपाकघरात जाऊन पहातो, तर काय ! स्वयंपाकघरातील सारी भांडी आपोआप खाली पडत होती. आम्ही कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता केवळ गुरुजींचे नाव घेत होतो; कारण भित्यापाठी ब्रह्मराक्षस ! त्याप्रमाणे भीती न बाळगता आम्ही गुरुजींचे नामस्मरण करत होतो. त्यानंतरच हळूहळू भांडी खाली पडण्याचा आवाज न्यून होत जाऊन एकाएकी बंदच झाला. नंतर पुन्हा असा प्रकार कधीच घडला नाही. (पृष्ठ ३९)

१ आ. करणीचे संकट आल्यावर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे उपाय केल्याने त्याचे निवारण होणेे : एके दिवशी बेट्याच्या (राजाभाऊंच्या) माध्यमातून गुरुजी बोलत होते. त्या वेळी गुरुजींनी आम्हाला एक गोष्ट सांगितली. गुरुजी म्हणाले, अलिबागच्या स्मशानभूमीत चट्टे पट्टे असलेला शर्ट घातलेली दोन माणसे तुमच्यावर करणी करत आहेत. त्यामुळे रात्री दोन-अडीच वाजण्याच्या वेळी तुमच्या दारात लिंबे येतील. चक्र येईल. त्या वेळी घाबरून न जाता आलेली सर्व लिंबे पाण्यात विसर्जन करा. जे चक्र येईल, ते तेथेच ठेवा, म्हणजे इतर काही गोष्टी येतील, त्या चक्रालाच चिकटतील.

गुरुजींनी आधीच कल्पना दिलेली असल्याने आम्ही निवांत होतो. खरोखरच त्या रात्री साधारण दोन-अडीच वाजता चक्र आणि लिंबे आली. ती लिंबे चक्रालाच चिकटून राहिली. गुरुजी खंबीरपणे पाठीशी उभे असल्याने आम्ही जराही घाबरलो नाही. गुरुजींच्या आज्ञेनुसार आम्ही न घाबरता ते चक्र तसेच ठेवून ती आलेली सर्व लिंबे उचलून पाण्यात विसर्जित केली. विसर्जित केल्याने त्या वाईट शक्तींचा र्‍हास झाला आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता. आम्हाला काहीही झाले नाही. (पृष्ठ ५८)

१ इ. गुरुजींनी मंगला काणेला करणीच्या संकटापासून वाचवणे : मंगला काणे हिच्यावर कुणीतरी करणीचा प्रयोग केला होता. गुरुजींनी सांगितले, करणी करणार्‍या माणसाने १० रुपयांची नोट मंत्रून टाकली आहे. तिचा क्रमांक अमुक-अमुक असा आहे. या नोटेवर लक्ष ठेवावे. ती नोट मंगलकडे येणारच. जर तिच्या हातून ती नोट व्यय झाली, तर मंगल वेडी होईल. एवढे सगळे सांगून नोट कुणाकडून कशी येईल ?, याचा मार्गसुद्धा त्यांनी सांगितला.

शेवटी सात दिवसांनंतर गुरुजींनी सांगितलेल्या माणसाकडून मंगलकडे ती दहा रुपयांची नोट आलीच; परंतु गुरुजींनी सांगितलेली आज्ञा शिरसावंद्य मानून मंगलने ती नोट व्यय न करता स्वतःकडे जपून ठेवली आहे. आजही तिच्याकडे ती नोट आहे. (पृष्ठ ६२)

१ ई. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे राजाभाऊंनी विद्याला लगेचच घरी बोलावून घेणे, गुरुजींनी तिच्यावर केलेली करणी उतरवणे आणि त्यामुळे येणारे संकट टळणे : पूज्य गुरुजींनी राजाभाऊंच्या (आबांच्या) मुखातून सांगितले, विद्याला लगेचच घरी बोलावून घे. त्याप्रमाणे राजाभाऊंनी विद्याला रात्रीच घरी बोलावले. तेव्हा विद्यावर कुणीतरी करणीचा प्रयोग करत होते. आम्ही जेथे रहात होतो, तेथे एक लिंबू आले होते. गुरुजींनी ते विद्याला कापायला सांगितले. त्यातून त्यांना लिंबातील शक्ती काढायची होती.

गुरुजींच्या सांगण्यानुसार विद्याने ते लिंबू कापले आणि त्यातून त्यातील शक्ती काढली. त्या लिंबामध्ये अठरा टाचण्या होत्या. त्या टाचण्या गुरुजींनी काढून टाकल्या आणि त्यामुळे येणारे संकट टळले. (पृष्ठ ६३)                      (क्रमश:)


Multi Language |Offline reading | PDF