भक्तांची चिंता हरण करणारा कळंब (जि. यवतमाळ) येथील चिंतामणी गणेश !

श्री गणेशोत्सव : दर्शन, शास्त्र अन् इतिहास

भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी अर्थात् श्री गणेश चतुर्थीपासून चालू होत असलेल्या गणेशोत्सवानिमित्त…

केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे आराध्यदैवत श्री गणेश ! गणेशोत्सवाच्या कालावधीत ब्रह्मांडातील श्री गणेशाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी अधिक प्रमाणात पृथ्वीतलावर येत असते. गणेशोत्सवासंदर्भात एक विशेष सूत्र असेही आहे की, हा उत्सव जागतिक स्तरावर सर्वांत मोठा उत्सव म्हणून सुविख्यात आहे. यंदा २५ ऑगस्ट या दिवशी श्री गणेशचतुर्थी असून बुद्धीदात्या अन् विघ्नहर्त्या अशा गणरायाचे स्वागत करण्यासाठी सर्वच गणेशभक्त आतुर झाले आहेत.

गणेशभक्तांची श्री गणेशाप्रती भाव-भक्ती वृद्धिंगत व्हावी, या हेतुने आणि श्री गणेशाच्या कृपेने आजपासून ‘श्री गणेशोत्सव : दर्शन, शास्त्र अन् इतिहास’ या विशेष सदरास आरंभ करण्यात आम्हाला आनंद होत आहे. या सदरात आपण प्रतिदिन श्री गणेशाशी संबंधित विशेष माहिती, उपासनाशास्त्र, विविध प्रसिद्ध गणपती मंदिरांतील गणरायाच्या मूर्तींची छायाचित्रे, ऐतिहासिक माहिती, तसेच हरितालिका, ऋषिपंचमी इत्यादींविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रातील २१ गणेश क्षेत्रांपैकी एक आणि विदर्भातील अष्ट गणेशांपैकी एक म्हणजे कळंब, जिल्हा यवतमाळ येथील श्री चिंतामणी ! चिंतामणीची ही मूर्ती साक्षात् इंद्रदेवाने स्थापिली आहे. चिंतामणी गणेश मंदिर गावाच्या भू-पातळीपासून ३३ फूट खोल आहे. गाभार्‍यात उतरण्यासाठी चिरेंबदी दगडाच्या २९ पायर्‍या आहेत. खाली उतरल्यावर पाण्याचे एक चिरेबंदी अष्टकोनाकृती कुंड आहे. मुख्य गाभार्‍यात चिंतामणी गणेशाची साडेचार फूट उंचीची विलोभनीय आणि नयनरम्य मूर्ती विराजमान आहे. ती मूर्ती दक्षिणाभिमुखी आहे.

श्रीगणेशपुराण आणि श्रीमद् मुद्गलपुराण यांत उल्लेखित असा हा चिंतामणी आहे. महर्षि गौतम ऋषींनी इंद्रदेवास शापमुक्त होण्यासाठी विदर्भातील कदंबक्षेत्री जाऊन श्री गणेशाची तपश्‍चर्या करण्यास सांगितलेले ते हेच कळंब, तथा इंद्राच्या घोर तपश्‍चर्येने प्रकट झालेले श्री गणेश येथेच ! इंद्रास शापमुक्त करणारा चिंतामणी गणेश भक्तांना चिंतामुक्त करणारा होय. देवराज इंद्रानेश्री गणेश पूजनास्तव पृथ्वीजल न वापरता प्रत्यक्ष स्वर्गातून श्री गंगेला आवाहन करून त्या पाण्याने श्री पूजन केले आणि प्रत्येक १२ वर्षांनी श्री गंगेस श्रीचरण धुत रहाण्यास सांगितले. त्यानुसार प्रत्येक १२ वर्षांनी येथील कुंडातील पाण्याची पातळी वाढते आणि श्री चिंतामणीचा पदस्पर्श झाला, की पाण्याची पातळी आपोआप न्यून होऊ लागते. अशा घटना वर्ष १९१८, १९३३, १९४८, १९५८, १९७०, १९८३, १९९५ या वेळी अनुभवास आल्या.

कदंब ऋषींचा आश्रम येथे होता. श्री मूर्तीची स्थापना कदंब ऋषींनी केली, असे गणेश आणि मुद्गलपुराणात उल्लेखित आहे. रामायण पूर्व काळापासून कदंब हे शहर प्रसिद्ध आहे.

सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ गेल्या ४ वर्षांहून अधिक काळ भारतभर भ्रमण करून प्राचीन मंदिरे, वास्तू, गड आणि संग्राह्य वस्तू यांच्या छायाचित्रांचा संग्रह करत आहेत. त्यामुळेच आपल्याला या प्राचीन मंदिरे, वास्तू यांचे घरबसल्या दर्शन मिळते. त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया !

 कळंबचा चिंतामणी । चिंतीता चिंता हरोनि ।

पावतो भक्ता निर्वाणी । ऐसे माहात्म्य देवाचे ॥

कदंब (जि. यवतमाळ) येथील चिंतामणी गणेशाची ही नयनमनोहारी मूर्ती

याच अष्टकोनी कुंडात प्रत्येक १२ वर्षांनी गंगा येते. कुंडातील पाण्याची पातळी वाढते आणि समोर असलेल्या गाभार्‍यातील श्रीचरणांचा स्पर्श झाला, की कुंडातील पाणी आपोआप ओसरू लागते.

भू-पातळीपेक्षा ३३ फूट खाली कळंबच्या चिंतामणी गणेशाची मूर्ती विराजमान आहे. वर्तुळात अष्टकोनी कुंड दाखवला आहे.


Multi Language |Offline reading | PDF