श्री गणेशचतुर्थीचा सण आनंदाचा । जाणूनी धर्मशास्त्र कृपाशीर्वाद मिळवू श्री गणेशाचा ॥

१. श्री गणेशचतुर्थीचे महत्त्व

विनाशकारक, तमप्रधान यमलहरी पृथ्वीवर आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या १२० दिवसांत अधिक प्रमाणात येतात. या काळात त्यांची तीव्रता अधिक असते. त्या तीव्रतेच्या काळात, म्हणजे भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशलहरी पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने यमलहरींची तीव्रता न्यून (कमी) व्हायला साहाय्य होते.

श्री गणेशचतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटीने कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो.

केळीच्या खोडापासून बनवलेले सात्त्विक मखर

२. शास्त्रोक्त विधी आणि रूढी यांचा अवधी

भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीस मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची सिद्धीविनायक या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे, असा शास्त्रविधी आहे; पण मनुष्य हा उत्सवप्रिय असल्याने एवढ्याने त्याचे समाधान होईना; म्हणून दीड, पाच, सात किंवा दहा दिवस श्री गणपति ठेवून त्याचा उत्सव करू लागले. बरेच जण (ज्येष्ठा) गौरीसह गणपतीचे विसर्जन करतात. एखाद्याच्या कुलाचारात गणपति पाच दिवस असेल आणि तो त्याला दीड किंवा सात दिवसांचा करावयाचा असला, तर तो तसे करू शकतो. यासाठी अधिकारी व्यक्तीस विचारण्याची आवश्यकता नाही. रूढीप्रमाणे पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या, सहाव्या, सातव्या किंवा दहाव्या दिवशी श्री गणेशविसर्जन करावे.

३. मूर्तीची आसनावर स्थापना करण्यापूर्वी तेथे थोडे तांदूळ का ठेवतात ?

पूजेपूर्वी ज्या पाटावर मूर्तीची स्थापना करायची असते, त्यावर तांदूळ (धान्य) ठेवून त्यावर मूर्ती ठेवतात. आपापल्या प्रथेप्रमाणे थोडे तांदूळ किंवा तांदळाचा लहानसा ढिग करतात. तांदळावर मूर्ती ठेवण्याचा लाभ पुढीलप्रमाणे होतो.

मूर्तीत गणपतीचे आवाहन करून तिची पूजा केल्याने मूर्तीत शक्ती निर्माण होते. त्या शक्तीमुळे तांदूळ भारित होतात. सारख्या कंपनसंख्येच्या दोन तंबोर्‍यांच्या दोन तारा असल्या, तर एकीतून नाद काढल्यास तसा नाद दुसर्‍या तारेतूनही येतो. त्याचप्रमाणे मूर्तीखालील तांदळात शक्तीमुळे स्पंदने निर्माण झाली की, घरातील तांदळाच्या साठ्यातही शक्तीची स्पंदने निर्माण होतात. अशा प्रकारे शक्तीने भारित झालेले तांदूळ वर्षभर प्रसाद म्हणून खाता येतात.

(अधिक माहितीसाठी वाचा सनातनचा ग्रंथ गणपति)

श्री गणेशचतुर्थीसाठी पुजावयाची मूर्ती घरी कशी आणावी ?

अ. श्री गणेशाची मूर्ती घरी आणण्यासाठी घरातील कर्त्या पुुरुषाने इतरांसह जावे.

आ. मूर्ती हातात घेणार्‍याने हिंदू वेशभूषा करावी, म्हणजे अंगरखा (सदरा)-धोतर किंवा अंगरखा-पायजमा परिधान करावा. त्याने डोक्यावर टोपीही घालावी.

इ. मूर्ती आणतांना तिच्यावर रेशमी, सुती किंवा खादीचे स्वच्छ वस्त्र घालावे. मूर्ती घरी आणतांना मूर्तीचे मुख आणणार्‍याकडे आणि पाठ समोरच्या दिशेस असावी. मूर्तीच्या समोरच्या भागातून सगुण तत्त्व, तर पाठच्या भागातून निर्गुण तत्त्व प्रक्षेपित होत असते. मूर्ती हातात धरणारा हा पूजक असतो. तो सगुणातील कार्याचे प्रतीक आहे. मूर्तीचे मुख त्याच्याकडे केल्यामुळे त्याला सगुण तत्त्वाचा लाभ होतो, तर इतरांना निर्गुण तत्त्वाचा लाभ होतो.

ई. श्री गणेशाचा जयजयकार आणि भावपूर्ण नामजप करत मूर्ती घरी आणावी.

उ. घराच्या उंबरठ्याबाहेर उभे रहावे. घरातील सुवासिनीने मूर्ती आणणार्‍याच्या पायांवर दूध आणि नंतर पाणी घालावे.

ऊ. घरात प्रवेश करण्यापूर्वी मूर्तीचे मुख समोरील दिशेस करावे. यानंतर मूर्तीचे औक्षण करून ती घरात आणावी.


Multi Language |Offline reading | PDF