आकर्षक व्यक्तीमत्त्व आणि चांगली निरीक्षणक्षमता असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सातारा येथील चि. अन्वी मंदार मेणकर (वय १ वर्ष) !

श्रावण कृष्ण पक्ष षष्ठी (१३.८.२०१७) या दिवशी सातारा येथील चि. अन्वी मंदार मेणकर हिचा प्रथम वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आत्याच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.

चि. अन्वी मंदार मेणकर हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. आकर्षक व्यक्तीमत्त्व

‘अन्वीचे डोळे पाणीदार असून ती तेजस्वी दिसते. पहाताक्षणी तिला घ्यावेसे वाटते.

२. चपळ

ती पुष्कळ चपळ आहे. रांगणे, बसणे, उभे रहाणे आणि बोट धरून चालणे, या गोष्टी ती लवकर शिकली.

३. चांगली निरीक्षणक्षमता

तिच्यासमोर कोणी बरणीचे झाकण उघडत असल्यास ‘ते कसे उघडतात’, याचे ती निरीक्षण करते. तिच्याकडे बरणी दिल्यावर ती त्याच पद्धतीने झाकण उघडते आणि ते लावण्याचा प्रयत्न करते.

४. हुबेहुब नक्कल करणे

एकदा मी तिला ‘आपण कबुतराला बोलवूया’, असे म्हणून विशिष्ट आवाज काढला. नंतर तिनेही अगदी माझ्यासारखाच आवाज काढला.

५. सात्त्विकतेची आवड

५ अ. दैनिक सनातन प्रभातचा अंक एकटक पहाणे : ती २ – ३ मासांची असतांना तिच्यासमोर दैनिक सनातन प्रभातचा अंक धरला की, ती हाता-पायाच्या हालचाली बंद करून अंकाकडेच एकटक पहात असे. ‘तिला अंकातील चैतन्य जाणवत होते’, असे वाटते.

५ आ. उजव्या हाताची मूठ वर करून घोषणा देणे : ती ३ मासांची असतांना आम्ही घोषणा दिल्यावर ती उजव्या हाताची मूठ करून हात वर करायची. तेव्हा तिला बोलता येत नसले, तरी तिच्या हाताच्या आणि तोंडवळ्यावरील हालचालीवरून ‘तीही ‘जयतु जयतु हिन्दुुराष्ट्रम् ।’, असे म्हणत आहे’, असे जाणवायचे.

५ इ. शिवाजी महाराजांची मालिका आवडणे : घरात दूरचित्रवाणीवर काही कार्यक्रम चालू असल्यास ती त्याकडे विशेष पहात नाही; मात्र शिवाजी महाराजांची मालिका लागल्यावर ती आरंभीचे गीत लक्षपूर्वक ऐकते आणि त्या वेळची दृश्येही एकटक पहाते.

६. देवाची ओढ

६ अ. देवतांची चित्रे आणि संतांची छायाचित्रे पहाण्याची आवड असणे : तिला देवतांची चित्रे आणि संतांची छायाचित्रे दाखवल्यास पुष्कळ आनंद होतो. ती लगेच छायाचित्रावरून हात फिरवून माया करते. एकदा ती प.पू. बाबांचे (संत भक्तराज महाराज यांचे) छायाचित्र बघत असतांना तिला आईने झोपायला नेले. तेव्हा ती रडू लागली. आईने तिला पुन्हा छायाचित्राजवळ आणल्यावर ती शांत झाली. ती रडत असल्यास तिला देवतांची चित्रे आणि संत भक्तराज महाराज अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची छायचित्रे दाखवल्यास ती लगेच शांत होते. तिला घरातील श्रीकृष्णार्जुन रथाची फ्रेम दाखवल्यावर ती त्या चित्राकडे एकटक पहाते. तिला ते चित्र पुष्कळ आवडते.

६ आ. खेळण्यांपेक्षा बासरी, डमरू आणि घंटा आवडणे : तिला ‘बाहुली, चेंडू, खुळखुळा’ आदी खेळण्यांपेक्षा बासरी, डमरू आणि घंटा हे साहित्य पुष्कळ आवडते. ती रडत असल्यास तिला घंटा दिल्यावर ती लगेच शांत होते.

६ इ. देवळात जाण्याची ओढ : तिचे आजोबा तिला देवीच्या मंदिरात घेऊन जात असल्याने तिला प्रतिदिन मंदिरात जाण्याची ओढ असते.

७. अन्वीचे स्वभावदोष

७ अ. हट्टीपणा : तिला हवी असलेली एखादी वस्तू न दिल्यास, तसेच तिला झोप आली असल्यास ती ओरडून नाराजी व्यक्त करते. तिच्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट न झाल्यास ती तिची खेळणी विस्कटून टाकते.’

– कु. गौरी मेणकर (चि. अन्वीची आत्या), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.७.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF