विविध अनुभूतींच्या माध्यमातून उपाध्ये कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा !

पू. (सौ.) मंगला उपाध्ये

अमृतवाणी भाग – ४ या ग्रंथातील निवडक लिखाण

१७ ऑगस्ट या दिवशी पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांनी लिहिलेल्या अमृतवाणी भाग – ३ मधील अध्यात्मात नुसत्या शंका विचारणार्‍या व्यक्तीची स्तिथी आणि अन्य लिखाण पाहिले. आज त्या पुढील लिखाण पाहूया.

१. गुरुजींचे सर्व ठिकाणी लक्ष असल्याचे जाणवणे आणि तेच मार्गदर्शक, तारणारे अन् सर्वकाही असल्याने प्रत्येक गोष्ट त्यांना विचारूनच करायची, अशी सवयच जडणे

गुरुजी प्रथम वर्ष १९७६ मध्ये बोलले. यजमानांच्या वाणीतून प्रथम बेटा, अशी त्यांनी हाक मारली आणि यजमान (राजाभाऊ) ५ – ६ वाक्ये बोलले. प्रथम मला कळेना, हा काय प्रकार आहे ? सकाळी साडे सहा वाजण्याच्या वेळी गुरुजी बोलायला लागायचे. मी लिहून घ्यायला आरंभ केला. विचार करतांना मला आढळले, कालच्या वाक्यांच्या पुढची वाक्ये ते बोलत आहेत. अशा प्रकारे ते बोलत रहायचे आणि मी लिहित रहायचे. हळूहळू आमचे मागील जन्म सांगून झाले, अगदी वर्तमानकाळापर्यंत ! आमचा विश्‍वास दिवसेंदिवस वाढू लागला. आमचे पूज्य गुरुजी आम्हास मार्गदर्शन करत आहेत, असा विश्‍वास वाटू लागला. आमच्याकडे देवीचा वास आहे, हे समजले. त्यामुळे आम्ही श्री दुर्गादेवीची भक्ती अधिकाधिक करू लागलो. श्री दुर्गामातेची भक्ती केल्यानंतर आमची देवी आणि गुरु यांवरील श्रद्धा अपार वाढली आणि आम्हाला प्रत्येक ठिकाणी यशाचा मार्ग दिसू लागला. पुढे पुढे गुरुजी मलाच मांगल्ये अशी हाक मारू लागले. मी लिहून घेऊ लागले. गुरुजी मला येणार्‍या अडचणी सांगू लागले. त्यासाठी काय करायचे ?, हेही सांगू लागले. आयुष्य सुखकर करण्यासाठी ते पदोपदी मार्गदर्शन करू लागले. अशीच आजवर आम्हाला ते साथ देत आहेत. खरेच, गुरुजींचे सर्व ठिकाणी लक्ष असते. तेच मार्गदर्शक, तेच तारणारे आहेत. आमच्यासाठी तेच सर्वकाही आहेत. आता प्रत्येक गोष्ट त्यांना विचारूनच करायची, अशी सवयच आम्हाला जडली आहे. अशा या गुरुजींना शतशः प्रणाम ! (पृष्ठ २४)

२. प्रामाणिक आणि स्वच्छ असणार्‍या माणसाचा गुरूंनी माध्यम म्हणून उपयोग करणे

पहिल्या गुरुभेटीनंतर मांगल्येने गुरुजींना प्रश्‍न केला, गुरुजी दुसरी भेट कधी ? त्यावर ते मला म्हणाले, मांगल्ये, यापुढे प्रत्यक्ष गुरुभेट होईल, याची निश्‍चिती मी देत नाही आणि माध्यम घेऊन भेट देणे, यासाठी हरिद्वारला माध्यम मिळणे कठीण आहे. त्यातल्या त्यात जो प्रामाणिक आणि खरोखरच भुकेलेला असेल, ज्याचे अंतरंग स्वच्छ आहे, अशाच माणसाचे मी माध्यम घेऊ शकतो; कारण तुम्ही दिलेले पैसे, खाऊ, अन्न त्या माणसाला (माध्यमाला) मिळणारे असतात. मग त्यासाठी योग्य असलेले माध्यमच निवडावे लागते. (पृष्ठ ३)

३. यजमानांच्या मुखातून सद्गुरु सदानंद गुरुजींनी पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांची प्रथम विचारपूस करणे आणि त्यानंतर पुढचे बोलणे चालू करणे

राजाभाऊंच्या (यजमानांच्या) मुखातून सद्गुरु सदानंद गुरुजी आमच्याशी बोलत असतात. राजाभाऊंच्या शरिरात सूक्ष्म रूपाने प्रवेश करून ते आमच्याशी संवाद साधतच असतात. वर्ष १९७७ पासून पूज्य सदानंद गुरुजी आमच्याशी संवाद साधतात. ज्या वेळी गुुरुजी बोलायला लागतात, त्या वेळी प्रथम ते मला हाक मारतात. तेच केवळ मला मांगल्ये म्हणतात. मग मी त्यांना नमस्कार करते आणि मग गुरुजी मला विचारतात, मांगल्ये, कशी आहेस ? हात काय म्हणतोय ? डोळा कसा आहे ? पाय कसे आहेत ? शक्ती आहे का ? अशा प्रकारे प्रश्‍न विचारून ते प्रथम चौकशी करतात. माझी सगळी विचारपूस झाल्यानंतर ते पुढचे बोलू लागतात. (पृष्ठ ४०)

४. स्वप्नात पाहिलेली गंगा प्रत्यक्षात घरातच अवतरली असल्याचे जाणवणे

एकदा रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास मी उठले. मी यजमानांना म्हणाले, ‘‘अहो, मी आता केवढा मोठा गंगेचा स्रोत वरून पडतांना पाहिला. मला पुष्कळ आनंद झाला.’’ मी यजमानांना स्वप्न सांगितले आणि पुन्हा जाऊन निजले. तेवढ्यात यजमान आले आणि म्हणाले, ‘‘अगं, गंगा आली. पाहिलीस का ? आपले गंगेचे पात्र वाहून जात आहे.’’ खरंच गंगामाता त्या पात्रात आली. त्यामध्ये बर्फाचे खडेही होते. (पृष्ठ ४१)

५. घरात आपोआप गंगा, पिंजर आणि शिवभस्म येणे

आमच्या घरात गंगामाता येते. आमच्याकडे पिंजर येते. शिवभस्म येते. ही पुण्याई आहे. (पृष्ठ ५१)

६. भिंतीवर लावलेल्या चित्रात देवीचे दर्शन घडणे

एकदा मी अंथरुणावर बसले होते. समोरच आई मातेचे वाघावर बसलेले चित्र आहे. तिकडे नमस्कारासाठी माझे लक्ष गेले. काय आश्‍चर्य ! ते चित्र आणि बाजूची सर्व जागा एकदम लखलखीत दिसू लागली. एकदम सुंदर, वेगळीच ! ‘खरंच का मी स्वर्गातली देवी पाहिली ?’, पुनःपुन्हा मला हाच प्रश्‍न पडत होता. साधारण ५ मिनिटांनी हळूहळू सर्व मावळत गेले. (पृष्ठ ५२)

७. गुरुजींनी राजाभाऊंच्या माध्यमातून गंगोत्री गाडगीळला गाणे शिकवणे

राजाभाऊंनी गंगोत्री गाडगीळला विचारले, ‘‘तू फारच छान गाणे म्हणून दाखवलेस. मला पुष्कळ आवडले. तुला हे गाणे कुणी शिकवले ?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘अहो, तुम्हीच तर शिकवलंत ना !’ हे ऐकून आम्ही सारे जण थक्कच झालो. (पृष्ठ ५६)

८. देवीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

८ अ. देवीने घरात प्रवेश करणे

८ अ १. राजाभाऊंना संध्याकाळी सात वाजता देवी घरी येईल, असे वाटणे आणि त्यामुळे आम्ही देवीच्या येण्याची वाट पहाणे : एकदा नवरात्रात राजाभाऊंना सकाळपासूनच आमच्या घरी देवी येणार, असे वाटत होते; म्हणून राजाभाऊंनी मला सांगितले, आज संध्याकाळी सात वाजता देवी आपल्या घरी येईल. आम्ही देवीच्या येण्याची वाट पहात होतो. कधी एकदा देवी घरी येते, असे आम्हाला झाले होते. इतक्यात सात वाजले. राजाभाऊ जपाला बसले होते.

८ अ २. अकस्मात् घरातील दिवे जाणे आणि राजाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे देवीने अंधारातच घरात प्रवेश करणे : सात वाजता एकाएकी आमच्याच घरातील दिवे गेले होते. त्यावर माझ्या मनात शंका आली, दिवे गेल्याने सगळीकडे अंधार झाला. मग देवी अंधारात कशी येणार ? त्यावर राजाभाऊंनी लगेचच उत्तर दिले, देवी अंधारातच आत येईल; कारण देवी प्रकाशात आली, तर तिचा तेजस्वी प्रकाश आपल्याला सहन होणार नाही. त्या वेळी सगळीकडे दिवे गेलेले असतांना केवळ देवघरात देवीच्या वर जो छोटा दिवा होता, तेवढाच चालू होता. तितक्यात अंधारातच देवीचा घरात प्रवेश झाला. नंतर लगेचच दिवे आले. खरोखरच देवीचा प्रवेश अंधारातच झाला.

८ अ ३. देवीसाठी मांडलेल्या पाटाखाली देवीची पिंजरने भरलेली पावले उमटलेली दिसणे आणि त्याचे छायाचित्र काढण्याची इच्छाही पूर्ण होणे : तेव्हा माझ्या मनात नैवेद्य काय करावा ? हा प्रश्‍न आला. मी राजाभाऊंना न विचारताच त्यांनी देवीला दूध-साखरेचा नैवेद्य दाखवायला सांगितला. थोड्या वेळाने आम्ही देवीसाठी मांडलेला पाट उचलून पाहिला. तेव्हा त्या पाटाखाली देवीची पिंजरने भरलेली पावले उमटली होती. पिंंजरने भरलेल्या देवीच्या पावलांचे छायाचित्र काढायचे माझ्या मनात होते. मी राजाभाऊंना विचारले. ते म्हणाले, तिच्या मनात छायाचित्र काढायचे असेल, तर फोटोग्राफर फोटो काढायला येतील. त्या वेळी आमच्या इमारतीमध्ये श्री. पटवर्धन म्हणून फोटोग्राफर रहात होते. ते घरी आहेत का ?, हे पहाण्यासाठी गेलो, तर ते घरी होते आणि त्यांच्या कॅमेर्‍यात दोनच छायाचित्रे काढता येतील, एवढीच जागा शेष राहिली होती. आमच्या सांगण्यावरून त्यांनी देवीच्या पावलांची दोन छायाचित्रे काढून दिली.

८ आ. घरातील देवी अदृश्य होणे आणि पुष्कळ शोधल्यानंतर ती घरी आलेल्या गंगेमध्येच डुंबतांना दिसणे : चैत्र मासात (महिन्यात) आम्ही चैत्र तृतीयेला देवीला (मूर्तीला) एकदाच झोका देऊन पाळण्यात बसवतो. एके वर्षी चैत्र तृतीयेला सकाळी देवीला पाळण्यात बसवण्यासाठी आम्ही सर्व सिद्धता केली. देवीला पाळण्यात बसवायला जाणार, इतक्यात पाहिले, तर देवीच अदृश्य ! सगळीकडे शोधले. देवी काही केल्या सापडेना. शेवटी अमरेंद्र म्हणाला, आई (तो मला आई म्हणतो.), देवी कुठेतरी शिवाच्या जवळ बसली असेल बघ. त्यावर आम्ही पुन्हा एकदा देवीला शोधायला लागलो. शोधता शोधता पाहिले, तर देवी आम्हाला आमच्याकडे आलेल्या गंगेमध्येच डुंबतांना दिसली, म्हणजे अमरेंद्रच्या म्हणण्यानुसार देवी शेवटी शिवाजवळच होती.

८ इ. दुसर्‍यांदा अदृश्य झालेली देवी शिवपिंडी असलेल्या डब्यात सापडणे : एका वर्षी परत देवी अदृश्य झाली. आम्ही सगळीकडे शोधली, तरी देवी काही सापडेना. तेव्हाही अमरेंद्र म्हणाला, आई, देवी शिवपिंडीच्या डब्यात असेल बघ. तो शिवपिंडीचा डबा आम्ही केवळ सोमवारीच उघडत असतो. देवी त्या डब्यात जाण्याचा प्रश्‍नच येत नाही; कारण बंद डब्यात देवी जाणार कशी ? पण त्याच्या बोलण्यानुसार आम्ही शिवपिंडीच्या डब्यात पाहिले, तर देवी खरेच त्या डब्यात सापडली.

८ ई. तिसर्‍यांदा अदृश्य झालेली देवी पूज्य सद्गुरु सदानंद गुुरुजींच्या हातावर सापडणे : ३.४.२०१४ या दिवशी चैत्र तृतीयेला पाळण्यात बसवतांना देवी पुन्हा अदृश्य झाली. तितक्यात चि. चैतन्य याने सांगितले, या वेळी देवीला मी शोधणार आहे. तेव्हा त्याला देवी आमच्या पूज्य सद्गुरु सदानंद गुुरुजींच्या हातावर सापडली. (पृष्ठ ६५ ते ६९)

८ उ. चैत्रगौरी बसवल्यावर सवाष्णीची ओटी भरण्याचा विचार मनात येणे आणि त्याच दिवशी एक सवाष्ण घरी आल्यावर तिची ओटी भरणे : प्रतीवर्षी आम्ही चैत्रगौरी बसवल्यानंतर सवाष्ण बाईंची ओटी भरत असतो. असेच एका वर्षी मी आता कुणाची ओटी भरायची ? आपल्याकडे कोण सवाष्ण येईल ?, असा विचार करत होते.

त्याच दिवशी अकस्मात् आमच्याकडे ताडेबाई आल्या. त्या कलावतीआईंच्या भक्त आहेत. त्या म्हणाल्या, अगं, तुला ओटी भरायचीय ना ? मग भर ना माझी ! मी आले तुझ्याकडे ओटी भरून घ्यायला. मग लगेचच ओटीची सिद्धता करून मी त्यांची ओटी भरली. (पृष्ठ ७०)

८ ऊ. हाराच्या पुडीत पिंजर येणे, देवीने अपर्णासाठी ती पाठवली असल्याचे जाणवणे आणि पिंजरीच्या रूपात साक्षात् दुर्गादेवीच सतत समवेत असणे : हाराची पुडी समोरच फळीवर ठेवलेली असल्याने तिच्या आईने ती पुडी उघडली. पहातो तर काय, त्या हाराच्या पुडीत पिंजर ! पुडी हारवाल्याने बांधली होती. मग पिंजर कशी आली पुडीत ? हेच आश्‍चर्य ! आपली अढळ श्रद्धा असली की, परमेश्‍वर आपल्या पाठीशी असतोच आणि म्हणूनच अपर्णासाठी देवीने पिंजर पाठवली. काय ती किमया !

आज ही पिंजर तिच्या घरी आहे. तिचा आजही उपयोग होतो. काहीतरी अडचणी आल्या, कुणी आजारी असेल, तर तसेच प्रवासाला जातांना ती पिंजर लावली जाते. या पिंजरीच्या रूपाने साक्षात् दुर्गादेवीच सतत समवेत असते, असा भाव असतो. (पृष्ठ ७१, ७२)

८ ए. देवीची आरती झाल्यावर अमितच्या पाळण्यात पिंजरीचा डोंगर दिसणे आणि ती पिंजर आईने त्याला लावण्यासाठी देवीने दिलेली असणे : अमित जन्मल्यानंतर अकराव्या दिवशी त्याला नमस्कार करण्यासाठी त्याची आई आमच्या घरी घेऊन आली होती. त्या वेळी राजाभाऊंनी तिला सांगितले, तीन मासांंनी येणार्‍या पहिल्या मंगळवारी त्याला देवीच्या दर्शनासाठी घेऊन ये.

त्यामुळे सांगितल्याप्रमाणे मंगळवारी त्याची आई त्याला देवीच्या दर्शनासाठी घेऊन आली. त्या वेळी आमच्या घरी प्रत्येक मंगळवारी आणि रविवारी संध्याकाळी ठीक ७ वाजता देवीची आरती व्हायची. राजाभाऊंनी अमितला पाळण्यातून देवीच्या आरतीला घेऊन येण्यास सांगितले. त्याची आई त्याला घेऊन आली. आरतीच्या वेळी अमित पुष्कळच तेजस्वी दिसत होता. आरती झाली. सर्वांना देण्यासाठी आरती आतमध्ये नेल्यावर पहातो तो काय ! अमितच्या पाळण्यात मोठा पिंजरीचा डोंगर ! ती पिंजर देवीने मुलाला लावण्यासाठी दिली होती. (पृष्ठ ७४)

सदानंद गुरुजींनी सांगितलेल्या काही जन्मकथा

१. मांगल्येची (पू. मंगला उपाध्ये यांची) कथा : ‘एकदा रावणाने शिव-पार्वतीला बोलावून यज्ञ करण्याचे ठरवले. दीड मास यज्ञ चालणार होता. रामाने शिवधनुष्य मोडून रावणाचा अपमान केला होता. याचा सूड म्हणून रावणालाही सीतेचे अपहरण करून रामाचा अपमान करायचा होता. रावण हा ब्राह्मण आणि शिवभक्त होता. पार्वतीला असा संकल्प सहन होण्यासारखा नव्हता; म्हणून तिने यज्ञाला येण्यास नकार दिला; परंतु दोघांनाही म्हणजेच शिव-पार्वतीला तेथे जाणे भाग पडले. ‘दीड मास शिव-पार्वती शिवलोकात रहाणार नसल्यामुळे आता आपला पाठीराखा कोण असणार ?’, याची सर्व देवांना चिंता वाटू लागली.

शिव-पार्वती शिवलोकात नाही, याचा लाभ घेऊन असुरांनी देवांवर आक्रमण केले. त्याच वेळी देवांनी शिव-पार्वतीची आराधना केली. पार्वतीने आपले प्रतीरूप देवांकडे पाठवून असुरांचा नाश केला. त्या वेळी ते रूप ‘मांगल्ये’चेच होते. तेव्हापासून पार्वतीचे प्रतीरूप मांगल्या आणि शिवाचे प्रतीरूप शिवांशु ही जोडी भूतलावर आली. पुढे जन्मोजन्मीची साथ राहिली.

सर्व देवांनी हाक मारलेली ती ‘मांगल्ये !’ म्हणून गुरुजी ‘मांगल्ये’ अशी हाक मारतात. (दुसरे कोणीही मला ‘मांगल्ये’ म्हणत नाही.) (पृष्ठ ८४)

२. सौ. राजश्री फणसळकर यांच्या गतजन्माची कहाणी

सौ. राजश्री ही प्रसिद्ध गुजराथी लेखिका होती. त्या वेळी तिचे नाव मैनावती होते. गुजरात साहित्य संमेलनाच्या वेळी चारचाकी गाडीच्या अपघातात तिचे निधन झाले. त्यानंतरच काही वर्षांनी तिचा जन्म उपाध्ये कुटुंबियांमध्ये झाला.

गुरुजींनी सांगितलेल्या गतजन्मानुसार आम्ही मैनावती नावाच्या लेखिकेचा शोध घेतला. तेव्हा आढळून आले, ‘त्या नावाने गुजरातमध्ये एक लेखिका होऊन गेल्या. त्या लेखिकेच्या नावे आजही पुस्तके प्रसिद्ध आहेत.’ तसे पहायला गेले, तर सौ. राजश्रीला आजही गुजराथी लोकांच्या गोष्टी फार आवडतात. तिला ढोकळा अतिशय प्रिय असून गुजराथी लोकांचा गरबा खेळायला आवडतो.’ (पृष्ठ ८४ आणि ८६)

– पू. (सौ.) मंगला उपाध्ये, पुणे (आनंदयात्रा, अमृतवाणी भाग ४)  (क्रमशः)


Multi Language |Offline reading | PDF