पोलिसांचा मंदिरे आणि चर्च यांना सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना आखण्याचा सल्ला

धार्मिक स्थळांच्या तोडफोडीचे प्रकरण

मडगाव, १७ ऑगस्ट (वार्ता.) – दक्षिण गोव्यात विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी तोडफोडीच्या आणि चोरीच्या घटना घडल्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी दक्षिण गोवा जिल्ह्यातील सर्व मंदिर आणि चर्च यांच्या व्यवस्थापनाला धार्मिक स्थळाच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्याचा सल्ला एका पत्राद्वारे (एडवायझरी) दिला आहे. पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली आहे.

पोलीस अधीक्षक गावस यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील ५९१ धार्मिक स्थळांना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक धार्मिक स्थळे फोंडा तालुक्यात (७७) आहेत, तर सर्वांत अल्प कुळे भागात (१७) आहेत. पोलिसांनी सुरक्षेच्या अनुषंगाने पुढील उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

१. धार्मिक स्थळाच्या परिसरात ‘अलार्म’ योजना आणि ‘सीसीटीव्ही’ (किमान ३० दिवस माहिती साठवून ठेवण्याची क्षमता असलेली) बसवणे

२. ‘सीसीटीव्ही’द्वारे संपूर्ण परिसरावर कायम लक्ष ठेवणे आणि त्याचे चित्रीकरण पोलिसांनाही आवश्यकतेनुसार उपलब्ध करणे

३. सुरक्षेसाठी आवश्यक सुरक्षारक्षक नेमणे

४. सुरक्षारक्षकाकडे काठी, दिवा (टॉर्च) आणि नोंदवही (गस्तीवर असलेल्या पोलिसांना स्वाक्षरी करण्यासाठी) पुरवणे.

५. सुरक्षारक्षक हे नोंदणीकृत सुरक्षा संस्थेकडूनच घेणे आणि सुरक्षा रक्षकांसंदर्भात सर्व माहिती पोलिसांना देणे

६. धार्मिक स्थळांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांचीही सर्व माहिती पोलिसांना देणे

७. धार्मिक स्थळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘मेटल डिटेक्टर’ बसवणे आणि धार्मिक स्थळामध्ये प्रवेश करणार्‍या प्रत्येकाने या ‘मेटल डिटेक्टर’मधून जाणे बंधनकारक करणे

८. येणार्‍या भाविकांच्या हातातील बॅगा तपासणे

९. धार्मिक स्थळाच्या ठिकाणी असलेल्या अर्पण पेटीतील निधी प्रतिदिन काढणे आणि हे शक्य नसल्यास अर्पण पेटी (सुरक्षेसंदर्भात आवश्यक सुविधा असलेली पेटी) भूमीत सिमेंटच्या माध्यमातून बसवणे.

१०. धार्मिक स्थळाच्या ठिकाणी असलेल्या मौल्यवान वस्तू अधिकोषाच्या तिजोरीत (लॉकर) ठेवणे

११. धार्मिक स्थळाचा पूर्ण परिसर आणि वाहनतळ या ठिकाणी प्रकाशव्यवस्था पुरेशा प्रमाणात उपलब्ध करणे

१२. धार्मिक स्थळाच्या ठिकाणी निवासासाठी येणार्‍यांची आवश्यक माहिती सोबत बाळगणे

१३. वाहने धार्मिक स्थळापासून दूर असलेल्या वाहनतळाच्या जागेतच उभी करणे

१४. धार्मिक स्थळात प्रवेश करणार्‍या भाविकांसाठी रांगेत दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करणे

१५. धार्मिक स्थळाचे मानचित्र (नकाशा) जवळच्या पोलीस ठाण्यात देणे.

(रस्त्याच्या बाजूने असलेल्या घुमट्या, क्रॉस या ठिकाणी या उपाययोजना करणे शक्य होणार आहे का ? तसेच छोट्या धार्मिक स्थळांना सीसीटीव्ही लावणे, मेटल डिटेक्टर लावणे, यासाठी येणारा खर्च झेपणार आहे का ? शासनाने या गोष्टींचा विचार करावा. – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF