महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संकेतस्थळावर साहित्यिकांच्या जन्म-मृत्यू दिनांकांच्या चुकीच्या नोंदी

साहित्य परिषदेकडे अशा नोंदी पडताळण्याची यंत्रणा नाही का ? साहित्य विश्‍वातील अग्रणी असलेल्या संस्थेकडून अशी चूक होणे, हे अशोभनीय !

मुंबई – वर्षभरात काही साहित्यिकांची जयंती आणि पुण्यतिथी यांच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यांची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संकेतस्थळावर ‘कार्यक्रम’ या शीर्षकाखाली दिली आहे. त्यामध्ये काही साहित्यिकांच्या जन्म-मृत्यू यांच्या दिनांकाच्या नोंदी चुकीच्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्या चुकांकडे साहित्यप्रेमी अमेय गुप्ते यांनी संबंधित साहित्यिकांच्या जन्म आणि मृत्यूची नोंदणी असलेले दाखले परिषदेकडे सादर केले; परंतु अद्यापही ती चूक सुधारलेली नाही. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी सांगितले की, जन्म-मृत्यू नोंदणीविषयी अनवधानाने ज्या काही चुका झाल्या असतील, त्या दुरुस्त केल्या जातील. (परिषदेने या चुकांविषयी लेखी क्षमायाचना करणे अपेक्षित असून पुन्हा अशा चुका न होण्यासाठी कोणती उपाययोजना करणार आहे, ते स्पष्ट करायला हवे. – संपादक)

‘मसाप’च्या संकेतस्थळावर दर्शवलेल्या चुकीच्या नोंदी

१ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन १४ एप्रिलला असल्याचे दाखवले आहे. प्रत्यक्षात ६ डिसेंबर हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन किंवा पुण्यतिथी दिवस असून तो दिवस ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो, हे सर्वश्रुत आहे.

२. ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर यांचा २ सप्टेंबरला मृत्यू झाला; पण मसापने ११ जानेवारी या दिवशी खांडेकर यांचा ‘स्मृतिदिन’ आहे, अशी नोंद केली आहे. वास्तविक ११ जानेवारी हा दिवस त्यांचा ‘जयंती’ दिन आहे.

३. साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन १७ जुलैला दाखवला आहे. प्रत्यक्षात अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यूदिन १८ जुलै, तर त्यांचा जन्मदिन १ ऑगस्ट असा आहे.


Multi Language |Offline reading | PDF