गणेशोत्सवाच्या कालावधीतील गोव्यातील पोटनिवडणूक पुढे ढकलण्यास निवडणूक आयोगाचा स्पष्ट नकार !

हिंदूंच्या प्रमुख सणाच्या कालावधीत अडचणी निर्माण करणारा निवडणूक आयोग हिंदूंना गृहित धरत आहे ! याच ठिकाणी अल्पसंख्यांकांचा एखादा सण आला असता, तर आयोगाने हीच भूमिका घेतली असती का ?

पणजी, १२ ऑगस्ट (वार्ता.) – गणेशोत्सव हा हिंदूंचा प्रमुख सण आहे, त्यातही गोव्यात तो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गोव्यातील हिंदू या सणाची सिद्धता श्री गणेशचतुर्थीच्या आधी १५ दिवसांपासून करतात. या उत्सवातून होणारे लोकसंघटन, प्रबोधन आणि या उत्सवास असलेली परंपरा लक्षात घ्यावी, तसेच समस्त गणेशभक्तांच्या भावना लक्षात घेऊन ऐन गणेशोत्सव काळातील पणजी आणि वाळपई येथील पोटनिवडणूक पुढे ढकलवी, अशी मागणी गणेशभक्त आणि हिंदु जनजागृती समिती यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.

समस्त हिंदूंच्या धार्मिक भावनांकडे दुर्लक्ष करत मतदान २३ ऑगस्टला आणि मतमोजणी २८ ऑगस्टला आहे. त्यामुळे २५ ऑगस्टला असलेल्या श्री गणेशचतुर्थीला कोणतीही अडचण येणार नाही, असे असंवेदनशील उत्तर गोवा निवडणूक आयोगाच्या वतीने हिंदु जनजागृती समितीला पाठवण्यात आले आहे. याविषयी गोवा निवडणूक आयोगाचे संयुक्त निवडणूक अधिकारी देवीदास गावकर यांची स्वाक्षरी असलेले पत्र हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.

हिंदूंच्या धार्मिक भावनांविषयी असंवेदनशील असलेल्या याच निवडणूक आयोगाने ख्रिस्त्यांच्या आक्षेपामुळे २४ जून २०१६ या दिवशी म्हणजे ख्रिस्त्यांच्या सांजाव या उत्सवाच्या आदल्या दिवशी असलेली पंचायत निवडणूक पुढे ढकलली होती, हेही लक्षात घेण्यासारखे आहे. याशिवाय पश्‍चिम बंगालमध्ये मुसलमानांच्या रमझान सणाच्याकाळात जाहीर केलेल्या निवडणुकांच्या दिनांकांमध्ये पालट केल्याचीही उदाहरणे आहेत. भारतीय संविधान हे धर्मनिरपेक्ष असल्याने सर्व धर्मियांना समभावाची वागणूक मिळावी, अशी हिंदूंची अपेक्षा होती; मात्र आयोगाने निवडणुकीचा दिनांक कायम ठेवल्याने आयोगाची ही कृती एक देश, एक संविधान या तत्त्वाला धरून आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.