संगीताच्या माध्यमातून साधना करणार्‍या सौ. भक्ती कुलकर्णी यांना जाणवलेली सूत्रे

सौ. भक्ती कुलकर्णी

१. संगीताच्या माध्यमातून साधना कशी करावी ?, हे आश्रमात आल्यावर संगीतविषयक ज्ञानाच्या धारिका वाचल्यावरच खर्‍या अर्थाने लक्षात येणे

सनातनच्या रामनाथी आश्रमात येण्यापूर्वी संगीत म्हणजे एखादे गाणे अथवा काव्य चालीत म्हणणे (गायन करणे), एवढेच मला ठाऊक होते. त्यामुळे संगीत साधना म्हणजे गाणेच शिकणे, असे मला वाटत होते. मी रामनाथी आश्रमात आल्यावर शास्त्रीय संगीताविषयीच्या धारिका वाचल्या, तेव्हा साधनेचा पाया चांगला असेल, तरच संगीताच्या माध्यमातून साधना करू शकतो, असे लक्षात आलेे. तसेच ईश्‍वराला आळवणे म्हणजे संगीत, हेही माझ्या लक्षात आले.

२. सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांचे विविध स्वर ऐकतांना आलेले अनुभव

अ. मी आश्रमात आल्यावर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी म्हटलेले विविध स्वर ऐकले. मला त्यांनी गायलेले खालच्या पट्टीतील स्वर (खर्जातले स्वर) ऐकतांना पुष्कळ चांगले वाटले; परंतु वरच्या पट्टीतील स्वर ऐकतांना माझे डोके दुखायला लागले.

आ. मी पुन्हा खर्जातले स्वर ऐकले, तेव्हा माझे डोके दुखायचे थांबले. मला शांत वाटले. रे, ग हे स्वर ऐकतांना मला अनाहतचक्राच्या ठिकाणी थंडावा जाणवला.

इ. मी ईश्‍वराला आळवत आहे, असे वाटले.

३. राग ब्रह्मभैरवी ऐकतांना वाईट शक्तींचा त्रास होणे

२३.२.२०१७ या दिवशी मी अमरावती येथील शास्त्रीय संगीताचे गायक श्री. रमाकांत देवपुजारी यांनी गायलेला ब्रह्मभैरवी हा राग ऐकत होते. त्या वेळी मला विविध त्रास जाणवले.

मी जेमतेम ५ ते १० मिनिटेच राग ऐकल्यावर मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला त्रास होऊ लागला. मला जोरात ठसका लागल्यासारखा खोकला आला. त्यानंतर मला अनाहतचक्राच्या ठिकाणी त्रास होऊन उलटी झाली. राग ऐकतांना अनावश्यक भीती वाटत होती. साधारण १५ ते २० मिनिटांनी थोडे बरे वाटायला लागले. त्यानंतर मी अनाहतचक्रावर न्यास आणि मुद्रा करून पुन्हा तो राग थोडा वेळ ऐकला. त्या वेळी मला पूर्वीएवढा त्रास जाणवला नाही.

४. दक्षिणामुखी स्तोत्र आणि तोटकाष्टकम् ऐकतांना झालेला त्रास आणि आलेल्या अनुभूती

४.२.२०१७ या दिवशी मी दक्षिणामुखी स्तोत्र आणि तोटकाष्टकम् ही २ स्तोत्रे ऐकली. त्या वेळी मला विविध अनुभूती आल्या.

मला आदल्या दिवसाप्रमाणे आज ऐकतांना त्रास न जाणवता शांत वाटले. मला अनाहतचक्राच्या ठिकाणी थंड संवेदना जाणवल्या. मला स्तोत्रे ऐकतच रहावे, असे वाटलेे. माझे मन एकाग्र झाले होते. तोटकाष्टम् ऐकतांना देवाला संगीतकला अर्पण करण्यासाठी त्याला शरण जायला पाहिजे, असा माझ्या मनात विचार येत होता. मला चैतन्य आणि शक्ती जाणवत होती. वरील २ स्तोत्रे ऐकून झाल्यावर पुन्हा कालचा ब्रह्मभैरवी राग ऐकला; परंतु आज काही त्रास न जाणवता मी तो ऐकू शकले. मी ते ऐकत असतांना शंकराला आळवत आहे आणि जे गात आहे ते ईश्‍वरापर्यंत पोहोेचत आहे, असे मला जाणवले.

५. महाशिवरात्रीला आलेल्या अनुभूती

५ अ. महाशिवरात्रीला शिवाला सामूहिक प्रार्थना करतांना साक्षात् शिव येऊन सर्वांना आशीर्वाद देत आहे, असे जाणवणे आणि गुरुदेवांच्या माध्यमातून तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचणार आहात, असे भगवान शिवाने सांगणे : २४.२.२०१७ ला महाशिवरात्रीच्या दिवशी संगीत, नृत्य, नाट्य इत्यादी कलांच्या माध्यमातून साधना करणारे आम्ही सर्व साधक एकत्रित सेवेचा आढावा घेण्यासाठी बसलो होतो. कु. तेजल पात्रीकर यांनी आमच्याकडून भगवान शिवाला प्रार्थना करवून घेतली. त्यानंतर आम्ही सर्व साधक २ मिनिटे भगवान शिवाचे स्मरण करत होतो. तेव्हा साक्षात् भगवान शिव तिथे प्रकट झाला आहे आणि आम्हा सर्व साधकांना आशीर्वाद देत आहे, असे मला जाणवले. माझे मन काही क्षण निर्विचार झाले होते. त्या वेळी गुरुदेवांच्या माध्यमातून तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचणार आहात, असे शिवाने सांगितले.

भगवान शिवाने मला कलेच्या माध्यमातून साधना करण्याची संधी दिल्यामुळे पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

६. भगवान शिव ही सर्व कलांची देवता असल्याचे कळल्यावर साधनेत येण्याच्या आधीपासूनच मला भगवान शिव अधिक प्रिय का होता ?, याचा उलगडा होणे

साधनेत येण्यापूर्वी मी ॐ नम: शिवाय । हा नामजप करत होते. पूर्वी शंकर मला का आवडतो ? त्याच्याविषयी मला जवळीक का वाटते ?, असा प्रश्‍न पडायचा. संगीताच्या संदर्भातील विविध धारिका वाचल्या, तेव्हा ६४ कलांचा निर्माता भगवान शिव आहे, असे माझ्या लक्षात आले आणि मला माझ्या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले.

७. कलेच्या माध्यमातून साधना करण्यासाठी संत मीराबाईप्रमाणे भक्ती करायला हवी, असे देवाने सुचवणे

तेजलताईने आपला अहं जपायला नको आणि देवाला आळवून आळवूनच साधना केली पाहिजे, हे सूत्र सांगितले. तेव्हा मी देवाला प्रार्थना केली, देवा, तुला कसे आळवायचे, हे तूच मला शिकव. त्या वेळी देवाने मला संत मीराबाईचे उदाहरण सुचवले. संत मीराबाईने जशी भक्ती केली, तशी भक्ती करण्यास देवाने मला सुचवले. त्या वेळी मला प.पू. भक्तराज महाराज यांचे कसे आळवू मी तुजला रे गुरुनाथा ? हे भजन आठवले.

८. कलेच्या माध्यमातून साधना करतांना स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया राबवणे किती महत्त्वाचे आहे, हे मला शिकायला मिळाले.

– सौ. भक्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.३.२०१७)

सौ. भक्ती कुलकर्णी

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयातील ईश्‍वरप्राप्तीसाठी संगीतकलेचा अभ्यास अन् त्याविषयीचे संशोधनकार्य यांत सहभागी होऊन साधनेच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या !

हिंदु धर्मात सांगितलेल्या १४ विद्या आणि ६४ कला ही हिंदु धर्माने विश्‍वाला दिलेली अनमोल देणगी आहे. या विद्या आणि कला मनुष्यास आंतरिक सुख, समाधान, ऐहिक उत्कर्ष तर प्राप्त करून देतातच; परंतु त्यांचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या माध्यमातून साधना करून व्यक्तीला ईश्‍वरप्राप्ती करून घेता येते; मात्र सद्यस्थितीत या विद्या अन् कला यांपैकी बहुतांश लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत आणि ज्या काही प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यांची जीवनाभिमुखता अन् ईश्‍वरप्राप्ती हा त्यांचा मूळ उद्देश यांपासून त्या पुष्कळ दूर गेल्याचे आढळत आहे. या पार्श्‍वभूमीवर परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी स्थापन केलेल्या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयात या विद्या आणि कला यांचा अधिकाधिक अभ्यास अन् संपूर्ण मानवजातीस उपयुक्त होण्याच्या दृष्टीने त्यांविषयी संशोधन करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे या शाखांचे आपोआप जतन होईल. त्याचसह ज्यांना विविध कलांच्या, उदा. चित्रकला, शिल्पकला, अक्षरयोग इत्यादींच्या माध्यमांतून साधना करावयाची असेल, त्यांना ते विषय शिकवले जातील.

६४ कलांपैकी संगीत ही एक कला आहे. या कलेचा उपरोल्लेखित उद्देशांनी अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी त्यासंबंधीची आवड असणार्‍या अन् संगीतकलेचे रीतसर शिक्षण घेतलेल्या व्यक्ती; स्वतः शिक्षण न घेतलेल्या; पण या कलेतील अधिकारी व्यक्तींचे साहाय्य मिळवून देऊ शकणार्‍या व्यक्ती; तसेच संगीत क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक माहिती देणारी पुस्तके, कात्रणे, लिखाण; यांसमवेत शास्त्रीय गायन आणि वादन यांच्या ध्वनीफिती, ध्वनीचित्रचकत्या, रेकॉर्ड डिस्क आपल्याकडे उपलब्ध असल्यास, तसेच संगीताच्या माध्यमातून रोगांवर उपचार (म्युझिक थेरपी) याविषयीही काही तात्त्विक आणि प्रायोगिक माहिती असल्यास कु. तेजल पात्रीकर यांना पुढील पत्त्यावर संपर्क साधावा.

भगवतीकृपा अपार्टमेंट्स, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा ४०३ ४०१.

भ्र.क्र.: ९५६१५७४८२४, ७९७२४४८९०२  ई-मेल : sangitsadhana.mav@gmail.com

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या विश्‍वकल्याणार्थ चालू असलेल्या ज्ञानयज्ञात साहाय्य करणार्‍यांची त्या साहाय्यातून एक प्रकारे साधनाच होणार आहे. आपण केलेल्या साहाय्याविषयी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय आपले नेहमीच कृतज्ञ राहील.