१४ ऑगस्ट या दिवशी असलेल्या श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने… रामनाथी आश्रमातील कु. मानसी कुलकर्णी यांना आलेल्या अनुभूती

१. रामनाथी आश्रमात असतांना आलेल्या अनुभूती

१ अ. स्वागतकक्ष पुसण्याची सेवा करतांना अनुसंधानात खंड पडल्यावर श्रीकृष्णाने हाक मारून आठवण करून देणे आणि त्या वेळी देवाप्रती कृतज्ञता वाटून भावजागृती होणे : एक दिवस मी रामनाथी आश्रमाच्या स्वागतकक्षातील लादी पुसण्याची सेवा करतांना मध्येच अनुसंधानात खंड पडला. त्या वेळी माझ्या मनात काहीच विचार नव्हते. तेव्हा मागून कुणीतरी मला हाक मारली, असे वाटले. मागे वळून बघितले, तर तेथे कुणीच नव्हते. श्रीकृष्णानेच हाक मारली असावी, असे मला वाटले. श्रीकृष्ण मला म्हणाला, हो. मीच तुला हाक मारली. तू माझे नाव घ्यायला विसरलीस ना ! माझ्याशी बोलायला विसरलीस ना ! माझ्याशी बोललीपण नाही ना ! बघ मलाच तुला आठवण करून द्यावी लागते. तेव्हा मला श्रीकृष्णाच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. देव आपल्यासाठी किती करतो, याची जाणीव झाली. माझी भावजागृती होऊन मला पुष्कळ आनंद जाणवत होता.

१ आ. सेवा करतांना किंवा स्वतःचे आवरतांना कुणीतरी हाक मारत असल्याचे जाणवणे : कधी कधी सेवा करतांना किंवा स्वतःचे आवरतांना मला कुणीतरी हाक मारत आहे. मला बोलावत आहे, असे वाटते. कधी अनुसंधानात खंड पडला की, हाक ऐकू येते, असे मी अनेक वेळा अनुभवले आहे. त्या वेळी कधी प.पू. गुरुमाऊली, तर कधी श्रीकृष्ण बोलावत आहे, असे वाटते, तर कधी कळत नाही. असे का होते ?, हे कळत नाही.

१ इ. झोपण्यापूर्वी भीती वाटतांना श्रीकृष्णाशी बोलू लागल्यावर लगेच झोप लागणे, मध्यरात्री जाग आल्यावर श्रीकृष्ण शेजारी झोपलेला असून माझ्याकडे पाहून हसत असल्याचे दिसणे : एकदा खोलीत झोपायला माझ्याबरोबर केवळ एक छोटी मुलगी होती. त्यामुळे मला थोडी भीती वाटत होती. माझी देवावर श्रद्धा अल्प पडत आहे, असे वाटले. मी कृष्णाला विचारले, कृष्णा, मला भीती वाटत आहे. काय करू ? मग कृष्णाशी बोलत बोलत मी झोपले. एरव्ही मला लगेच झोप लागत नाही; पण त्या दिवशी देवाच्या कृपेने लवकर झोप लागली. अचानक मध्यरात्री जाग आली. तेव्हा श्रीकृष्ण माझ्या बाजूला झोपला आहे, असे दृश्य दिसले. तो माझ्याकडे पाहून हसत होता. तो म्हणाला, मी आहे. काळजी करू नकोस ! मी मध्यरात्री अर्धवट झोपेत असतांनाही देव किती काळजी घेतो, अशी लीला दाखवून किती आनंद देतो, याबद्दल देवाच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटून भावजागृती झाली. तेव्हापासून अनेक वेळा झोपेतून उठल्या उठल्या मला श्रीकृष्णाची आठवण येते. एरव्ही सकाळी उठल्यावर झोपेत असल्यामुळे मला काहीच सुचत नसे. माझी चिडचिड व्हायची.

१ ई. देवच सेवा करायला साहाय्य करत असल्याचे वाटल्याने सेवेचा ताण न येता ती आपोआप होणे : आश्रमात नवीन असल्यामुळे मला वेगवेगळ्या सेवा शिकायला मिळाल्या. कधी न केलेल्या सेवाही इकडे देवाने करायला शिकवल्या. तेव्हा ताण न येता सर्व सेवा व्यवस्थित आणि आपोआप व्हायच्या. देवच येऊन मला साहाय्य करत आहे. मी काहीच करत नाही, असे प्रकर्षाने वाटायचे. देवाच्या अनुसंधानात असल्यामुळे देव किती साहाय्य करतो, हे शिकायला मिळाले.

१ उ. एकटेपणा जाणवत असतांना किंवा अनुसंधानात खंड पडल्यावर देवाने प्रसंग घडवून अनुसंधानात रहाण्याची आठवण करून देणे : काही दिवस मला पुष्कळ एकटेपणा जाणवत होता. त्या दिवसांमध्ये एकदा मी प्रसाधनगृहात गेले असतांना कपड्यांवरचा एक धागा खाली पडला. त्याकडे लक्ष गेल्यावर लक्षात आले, त्या धाग्याचा आकार ॐ सारखा झाला आहे. तेव्हा देव म्हणाला, मी आहे तुझ्यासोबत. तू काळजी करू नको. तेव्हा पुष्कळ भावजागृती होऊन डोळ्यांत भावाश्रू आले. जेव्हा अनुसंधानात खंड पडतो, तेव्हा देव कुणाच्या तरी माध्यमातून किंवा काहीतरी प्रसंग घडवून अनुसंधानात रहाण्याची आठवण करवून देतो. देवाला माझ्यासाठी काय काय करावे लागते, याची जाणीव होऊन पुष्कळ रडू येते.

२. काही दिवसांसाठी आश्रमातून घरी गेल्यावर आलेल्या अनुभूती

२ अ. घरी गेल्यावर स्वप्नात एका साधिकेने प.पू. गुरुमाऊलीने प्रसाद दिल्याचे सांगितल्यावर जाग येणे आणि गुरुमाऊलीची तीव्रतेने आठवण येऊन भावजागृती होणे : आश्रमातून काही दिवसांसाठी घरी गेले होते. एके रात्री झोपले असतांना मला एक स्वप्न पडले, प.पू. गुरुमाऊली सत्संग घेत होती. सत्संग झाल्यावर एक साधिका आल्या आणि मला म्हणाल्या, तुला गुरुमाऊलीने प्रसाद दिला आहे. तेव्हा मला अचानक जाग आली आणि गुरुमाऊलींची तीव्रतेने आठवण येऊन भावाश्रू आले. देवाला किती काळजी असते एका जिवाची ! देव विविध पद्धतींनी कसे साहाय्य करतो, या जाणीवेने मला भावाश्रूू येत होते.

२ आ. चित्र काढतांना श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यानंतर भावाची स्थिती अनुभवायला येणे आणि चित्रे श्रीकृष्णानेच काढून घेतल्याचे विविध गोष्टींतून जाणवणे : घरी असतांना श्रीकृष्णाने माझ्याकडून चित्रे काढून घेतली. प्रत्येक चित्र काढतांना मी श्रीकृष्णाला सांगायचे, तूच चित्र काढ. मला तर काहीच येत नाही. तेव्हा चित्र काढायला प्रारंभ केल्यापासून ते संपेपर्यंत मी भावाच्या स्थितीत असायचे. चित्र काढून झाल्यानंतर त्याच्याकडे बघितल्यावर हे चित्र मी काढले आहे, असे वाटायचेच नाही. मीच काढले आहे, हेही आठवायचे नाही. एखादी नक्षी किंवा चित्राचा भाग बघितल्यावर नवीन वाटायचे. चित्र काढायला आरंभ केल्यावर एखादी नक्षी किंवा चित्राचा भाग काढल्यावर कधी कधी मनाला वाटायचे, हे चांगले आलेले नाही. मग मी ते खोडून परत काढायला घ्यायचे. तेव्हा पुष्कळ वेळा प्रयत्न करूनही ते व्यवस्थित यायचे नाही. नंतर थोेड्या वेळाने प्रयत्न केल्यावर वाटायचे, आधीचेच योग्य होते. मी माझ्या मनाचे ऐकून उगाच खोडले. श्रीकृष्णाची क्षमा मागून परत प्रारंभ केल्यावर लगेच पहिल्याच प्रयत्नात चांगले यायचे. तेव्हा स्वतः श्रीकृष्ण ते चित्र काढायला यायचा, याची निश्‍चिती झाली. देवाच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटून भावजागृती झाली.

२ इ. घरी असलेले श्रीकृष्णाचे चित्र आणि प.पू. भक्तराज महाराजांचे छायाचित्र यांत पुष्कळ जिवंतपणा जाणवणे : आश्रमातून घरी गेल्यावर माझे प्रयत्न चांगले होणार नाहीत, असे वाटायचे. मी आश्रमात येण्यापूर्वी घरी असलेले श्रीकृष्णाचे चित्र आणि प.पू. भक्तराज महाराजांचे छायाचित्र यांच्याशी बोलायचे. या वेळी घरी गेल्यावर मला ते श्रीकृष्णाचे चित्र आणि

प.पू. भक्तराज महाराजांचे छायाचित्र यांत पुष्कळ जिवंतपणा जाणवत होता. असे वाटले, ते स्वतः त्या चित्रांत अवतरले आहेत. ती चित्रे बघितल्यावर नेहमी भावजागृती होते.

२ ई. भांडी घासतांना श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर अल्प कालावधीत भांडी घासून पूर्ण होणे आणि सर्व भांडी नवीन असल्यासारखी वाटून ती स्वतः घासली नसल्याची जाणीव होणे : एक दिवस आई सेवेला गेेली होती. तेव्हा आईने मला भांडी घासायला सांगितली. भांडी पुष्कळ होती. मी श्रीकृष्णाला सांगितले, श्रीकृष्णा, बघ किती भांडी आहेत. तू ये ना ! मी नामजप करत त्याच्याशी बोलत भांडी घासत होते. १० ते १५ मिनिटांतच सगळी भांडी घासली गेली. नंतर लक्षात आले की, सगळी भांडी नवीन वाटत आहेत. मी ती भांडी पहिल्यांदाच बघत आहे, असे वाटले. मी ती भांडी घासल्याचे मला आठवतच नव्हते. तेव्हा केवळ माझ्यासाठी देव आला आणि त्याने साहाय्य केले, अशी जाणीव होऊन भावजागृती झाली.

२ उ. मित्र-मैत्रिणींना भेटायला जायचे नसल्याचे देवाला सांगितल्यावर भेटीचे नियोजन रहित होणे : मी घरी गेले असतांना माझे मित्र-मैत्रिणी मला भेटायला बोलावत होते; पण मला जायचे नव्हते. मी देवालाच सांगितले, देवा, बघ तूच आता काय करायचे ते ! मला तर जायचे नाही. तेव्हा मैत्रिणींनी बाहेर जाण्याचे केलेले नियोजन रहित व्हायचे. त्या वेळी देवाच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटली. देव मला सत्मध्ये रहाण्यासाठी किती साहाय्य करतो, याची मला जाणीव झाली.

– कु. मानसी कुलकर्णी (वय १७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.११.२०१६)

कृष्णा, माझ्याबरोबर सतत असेच बोलत रहा आणि सोबतच रहा

आमच्याकडून तुम्हीच प्रयत्न करून घ्या !

श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णरूपी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करतांना

गायीचे रक्षण आणि प्रतिपाळ करणारा गोपाळकृष्ण

मधुराभक्तीची आदर्श राधा आणि मूरलीधर श्रीकृष्ण

श्रीकृष्ण आणि सुदामा यांची भावस्पर्शी भेट