वर्ष २०१७ च्या चातुर्मासातील काही शुभ आणि अशुभ योग, त्यांचे परिणाम अन् या काळातील साधनेचे महत्त्व

सौ. प्राजक्ता जोशी

१. चातुर्मास म्हणजे काय ?

आषाढ शुक्ल पक्ष एकादशी (देवशयनी एकादशी) ते कार्तिक शुक्ल पक्ष एकादशी (प्रबोधिनी एकादशी) या चार मासांना चातुर्मास, असे म्हणतात. या वर्षी ४.७.२०१७ ते १.११.२०१७ या कालावधीत चातुर्मास आहे. या काळात श्रीविष्णु शेषशय्येवर योगनिद्रा घेतात. मनुष्याचे एक वर्ष म्हणजे देवांची एक अहोरात्र ! अहोरात्र याचा अर्थ मनुष्याच्या एका वर्षातील पहिले सहा मास म्हणजे देवांचा एक दिवस आणि मनुष्याचे उर्वरित सहा मास म्हणजे देवांची एक रात्र असते; परंतु देवता चातुर्मासात केवळ चार मासच निद्रा घेतात अन् एक तृतीयांश रात्र शिल्लक असतांनाच जागे होतात.

२. चातुर्मासाचे मुख्य दोन उद्देश

परमार्थासाठी पोषक असणार्‍या आणि ईश्‍वराचे गुण अंगी आणणार्‍या नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती इत्यादी सर्व गोष्टी करणे, तसेच प्रपंच आणि परमार्थ यांना मारक असणार्‍या गोष्टींचा, म्हणजेच षड्रिपूंचा निषेध करणे, हे चातुर्मासाचे मुख्य दोन उद्देश आहेत.

३. चातुर्मासात व्रतस्थ रहाण्याचे आरोग्यदृष्ट्या महत्त्व

चातुर्मासात देवता योगनिद्रेत असल्याने वातावरणातील रज-तम वाढते. त्यामुळे सात्त्विकता वाढवण्यासाठी चातुर्मासात व्रतस्थ रहावे, असे शास्त्रात म्हटले आहे. चातुर्मासात पचनशक्ती मंदावलेली असल्याने या काळात व्रतस्थ राहिल्याने लाभ होतो. एकभुक्त रहाणे (एकच वेळ जेवणे), दिवसभर उपवास करणे, सूर्यास्तापूर्वी जेवणे, विशिष्ट दिवशी विशिष्ट आहार घेणे, या सर्व गोष्टी शरिराच्या दृष्टीने लाभदायक असल्याने हिंदु संस्कृतीत चातुर्मासात व्रतस्थ रहाण्याचे महत्त्व आहे.

४. चातुर्मासाचे ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्व

ईश्‍वरप्राप्ती करण्यासाठी मनुष्य जन्माचे महत्त्व अधिक आहे. आषाढ शुक्ल पक्ष एकादशीला सूर्य मिथुन राशीत असतो आणि कार्तिक शुक्ल पक्ष एकादशीला सूर्य तुळ राशीत असतो. चातुर्मासातील काळात मिथुन, सिंह आणि कन्या या राशींतील रवि शुभकारक असतो. तुळ राशीतील रवि अशुभ मानला जातो. रवि ग्रह आत्म्याचा कारक आहे. आत्मोद्धारासाठी, म्हणजेच आत्म्याच्या शुद्धीसाठी हा काळ पूरक आहे.

५. चातुर्मासात तीर्थस्नान करण्याचे महत्त्व

चातुर्मासात श्रीविष्णु क्षीरसागरात शयन करतात. त्यामुळे तीर्थस्नानाला विशेष महत्त्व आहे. तीर्थस्नान केल्याने ईश्‍वरी शक्ती आणि चैतन्य मिळते. ज्यांना तीर्थस्नान करणे शक्य नसेल, त्यांनी स्नानाच्या पाण्यात बेलपत्र घालून किमान ११ वेळा ॐ नम: शिवाय ।, हा नामजप करत स्नान करावे.

६. चातुर्मासात वातावरणातील अनिष्ट शक्तींपासून होणार्‍या त्रासांचे प्रमाण उणावण्यासाठी साधना वाढवणे महत्त्वाचे !

चातुर्मासात जीवसृष्टीचा पालनकर्ता श्रीविष्णु शयन करत असल्याने वातावरणातील अनिष्ट शक्तींचे त्रास देण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे साधना करतांना या काळात असंख्य शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांना सामोरे जावे लागते. या वर्षीच्या चातुर्मासाच्या आरंभापासून, म्हणजेच ४.७.२०१७ या दिवसापासून अनेक साधकांना होणार्‍या त्रासांत वाढ झाली आहे. हे टाळण्यासाठी चातुर्मासात अनेक व्रतवैकल्ये करण्यात येतात. त्यामुळे साधनेत वृद्धी होऊन वातावरणातील अनिष्ट शक्तींपासून होणार्‍या त्रासांचे प्रमाण उणावते.

७. या वर्षीच्या चातुर्मासातील अशुभ ग्रहमान आणि त्यांचे परिणाम

या वर्षीच्या चातुर्मासात मंगळ, शुक्र, शनि आणि रवि हे ग्रह प्रतिकूल आहेत. (केवळ रवि या ग्रहाचा १६.८.२०१७ ते १६.९.२०१७ हा कालावधी अनुकूल आहे. या कालावधीतील ग्रहस्थिती आणि त्याची माहिती सूत्र ८ अ. मध्ये दिली आहे.) श्रावण पौर्णिमेला (७.८.२०१७ या दिवशी) चंद्रग्रहण झाले. अमावास्या, पौर्णिमा, चंद्रग्रहण आणि प्रतिकूल ग्रह यांमुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक अन् आध्यात्मिक त्रासांच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता अधिक असते. त्याचे सविस्तर वर्णन पुढे दिले आहे.

७ अ. ग्रहस्थिती – मंगळ ग्रह कर्क या नीच राशीत असणे

७ अ १. कालावधी : ११.७.२०१७ ते २७.८.२०१७

७ अ २. परिणाम : मंगळ ग्रह कर्क या नीच राशीत पुढील प्रकारची अशुभ फळे देतो.

७ अ २ अ. शारीरिक त्रास : मंगळ हा ग्रह स्फोटक आणि दाहक असल्याने भाजणे, कापणे अशा प्रकारच्या घटना होण्याची शक्यता असते, तसेच प्राणशक्ती न्यून होते अन् उष्णतेचे विकार होतात, उदा. ताप येणे, फोड येणे, तोंड येणे, डोकेदुखी, पित्त इत्यादी.

७ अ २ आ. मानसिक त्रास : आपापसांत मतभेद आणि संघर्ष होण्याची शक्यता असते. स्वभावदोषांचे प्रमाण वाढते, उदा. राग येणे, साधना सोडून घरी जावेसे वाटणे, तीव्र स्वरूपाचे नकारात्मक आणि निराशेचे विचार येणे, उतावीळपणा, विसराळूपणा, स्वतःच्या मतावर ठाम रहाणे इत्यादी. (रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील अनेक साधकांना असे त्रास होत आहेत. – संकलक)

७ आ. ग्रहस्थिती – शुक्र ग्रह कन्या या नीच राशीत असणे

७ आ १. कालावधी : ९.१०.२०१७ ते २.११.२०१७

७ आ २. परिणाम : शुक्र ग्रह प्रतिकूल असून तो कन्या या नीच राशीत अशुभ फळे देतो. त्यामुळे त्वचाविकार, मानसिक आधाराची गरज वाटणे, भावना उफाळून येणे इत्यादी मानसिक त्रास होतात.

७ इ. ग्रहस्थिती – शनि ग्रह वृश्‍चिक या शत्रू राशीत असणे

७ इ १. कालावधी : २०.६.२०१७ ते २६.१०.२०१७

७ इ २. परिणाम

अ. अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, उदा. पूर, वादळे, भूकंप इत्यादी होण्याचा संभव आहे. (प्रत्यक्षातही भारतात अनेक ठिकाणी असे होत आहे. – संकलक)

आ. अपघात आणि स्फोट होण्याची शक्यता आहे.

इ. मन आणि बुद्धी यांवर आवरण आल्याने वैचारिक द्वंद्व संभवते. नियोजनात अडथळे येण्याचे प्रमाण वाढते.

७ ई. ग्रहस्थिती – रवि ग्रह तुळ या नीच राशीत असणे

७ ई १. कालावधी : १७.१०.२०१७ ते १६.११.२०१७

७ ई २. परिणाम : रवि ग्रह तुळ राशीत पुढील प्रकारची अशुभ फळे देतो.

७ ई २ अ. शारीरिक त्रास : रोगप्रतिकारशक्ती न्यून होणे, डोळ्यांचे विकार, रक्तदाब वाढणे अथवा न्यून होणे इत्यादी.

७ ई २ आ. मानसिक त्रास : अहं वाढणे, वरिष्ठांशी मतभेद होणे इत्यादी.

८. काही शुभ योग

चातुर्मासाच्या काळात वरील योग अशुभ असले, तरी काही योग शुभही आहेत. काळ प्रतिकूल असल्याने व्यवहार आणि साधना यांमध्ये अडथळे येतील, असे समजणे अयोग्य आहे; कारण या काळात काही ग्रहांचे योग शुभ असल्याने देवाने आपल्यावर कृपेचा वर्षाव केला आहे. ईश्‍वराने दिलेली ही सुवर्णसंधी आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

८ अ. ग्रहस्थिती – रवि ग्रह सिंह या स्वराशीत असणे

८ अ १. कालावधी : १६.८.२०१७ ते १६.९.२०१७

८ अ २. परिणाम : मनोबल वाढवणे, मनाचा निश्‍चय करणे, आत्मचिंतन करणे, यांसाठी पूरक असणे

८ आ. ग्रहस्थिती – बुध ग्रह कन्या या उच्च राशीत असणे

८ आ १. कालावधी : २६.९.२०१७ ते १३.१०.२०१७

८ आ २. परिणाम : सद्सद्विवेकबुद्धीने विचार करणे, बुद्धीचे अडथळे दूर होणे, यांसाठी पूरक असणे

८ इ. ग्रहस्थिती – श्रीगणेशाचे आगमन होणे

८ इ १. कालावधी : २५.८.२०१७ ते ५.९.२०१७

८ इ २. परिणाम : श्रीगणेशाचे आगमन झाल्याने गणेशलहरींचे प्रमाण वाढून सर्वांच्या आनंदात वाढ होईल आणि प्राणशक्ती वाढेल.

९. उपाय

प्रतिकूल प्रसंग आणि ग्रहमान असतांना साधना वाढवणे आवश्यक आहे. यासाठी गुरु आणि देव यांना अनन्यभावे शरण जाऊन त्यांच्याप्रती श्रद्धा वाढवून प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास प्रतिकूलतेचा त्रास न होता आनंद अनुभवता येईल.

परात्पर गुरुदेवांच्या कृपेने लक्षात आलेली सूत्रे लिहिता आली. यासाठी त्यांच्या चरणी भावपूर्ण नमस्कार !

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद), महर्षी अध्यात्म विश्‍वविद्यालय ज्योतिष विभाग, सनातन आश्रम, गोवा.


Multi Language |Offline reading | PDF