‘कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती’, ‘शाडू मातीची सर्वसाधारण गणेशमूर्ती’, ‘सनातन-निर्मित रंगीत गणेशमूर्ती’ आणि ‘सनातन-निर्मित धूम्रवर्णाची गणेशमूर्ती’ यांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

सर्व संप्रदायांना पूज्य आणि संतांनी गौरवलेले दैवत, म्हणजे श्री गणेश ! प्रत्येक संप्रदायात गणेशपूजा आहे. अनेकांच्या नित्य पूजनातही गणेशमूर्ती असते. श्री गणेशाची मूर्ती सात्त्विक असेल, तरच उपासकाला गणेशतत्त्वाचा लाभ मोठ्या प्रमाणावर होतो. स्वयंभू मूर्ती, संतांनी स्थापन केलेली मूर्ती आणि अध्यात्मशास्त्रानुसार बनवलेली मूर्ती यांमध्ये देवतेचे तत्त्व आकृष्ट अन् प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असते, म्हणजे अशा मूर्ती सात्त्विक असतात. कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती, शाडू मातीची सर्वसाधारण गणेशमूर्ती, सनातन-निर्मित रंगीत गणेशमूर्ती आणि सनातन-निर्मित धूम्रवर्णाची गणेशमूर्ती यांचा त्यांच्या भोवतीच्या वायूमंडलावर काय परिणाम होतो, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्याच्या उद्देशाने यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाचा वापर करण्यात आला. १.८.२००८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीचे स्वरूप, निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती, शाडू मातीची सर्वसाधारण गणेशमूर्ती, सनातन-निर्मित रंगीत गणेशमूर्ती आणि सनातन-निर्मित धूम्रवर्णाची गणेशमूर्ती यांची यू.टी.एस्. उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

२. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

२ अ. कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती

२ आ. शाडू मातीची सर्वसाधारण गणेशमूर्ती : ही पेठेत (बाजारात) मिळणारी शाडू मातीची सर्वसाधारण गणेशमूर्ती आहे.

२ इ. सनातन-निर्मित (अध्यात्मशास्त्रानुसार बनवलेली आणि सात्त्विक असलेली) रंगीत गणेशमूर्ती : ही मूर्ती साधक-मूर्तीकारांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीभावाने बनवली आहे.

२ ई. सनातन-निर्मित (अध्यात्मशास्त्रानुसार बनवलेली आणि सात्त्विक असलेली) धूम्रवर्णाची गणेशमूर्ती : ही मूर्तीसुद्धा साधक-मूर्तीकारांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीभावाने बनवली आहे.

३. यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) उपकरणाद्वारे प्रभावळ मोजणे

३ अ. चाचणीतील घटकांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारे अभ्यासण्याचा हेतू : एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत ?, तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही ?, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. उच्च पातळीचे संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक, संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारेे सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.

३ आ. यू.टी.एस् उपकरणाची ओळख : या उपकरणाला ऑरा स्कॅनर असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगणा येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम् मूर्ती यांनी वर्ष २००३ मध्ये विकसित केले. वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्‍या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे, असे ते सांगतात.

३ इ. उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण

३ इ १. नकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा हानीकारक असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा -Ve हा नमुना ठेवतात. याअंतर्गत पुढील २ प्रकार येतात.

अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी इन्फ्रारेड ऊर्जा मोजतात.

आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा मोजतात.

३ इ २. सकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.

३ इ ३. यू.टी.एस् उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे : प्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना (सॅम्पल) वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र, वस्तूच्या संदर्भात त्याचे छायाचित्र, वनस्पतीच्या संदर्भात तिचे पान, प्राण्याच्या संदर्भात त्याचे केस, वास्तूच्या संदर्भात तेथील माती किंवा धूळ आणि देवतेच्या मूर्तीच्या संदर्भात मूर्तीला लावलेले चंदन, शेंदूर आदी.

या चाचणीतील गणेशमूर्तींची प्रभावळ मोजण्यासाठी गणेशमूर्तींवर कापसाचा बोळा फिरवून तो नमुना म्हणून वापरला आहे.

३ ई. यू.टी.एस् उपकरणाद्वारे करायच्या परीक्षणाची पद्धत : चाचणीत वस्तूतील अनुक्रमे इन्फ्रारेड ऊर्जा, अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा मोजतात. त्या मोजण्यासाठी लागणारे नमुने (सॅम्पल्स) यू.टी.एस् या स्कॅनरसमवेत दिलेले असतात. वरील तीन परीक्षणांनंतर शेवटी वस्तूची प्रभावळ मोजतात आणि त्यासाठी सूत्र ३ इ ३ मध्ये दिल्याप्रमाणे नमुने वापरतात.

वस्तूतील किंवा वास्तूतील इन्फ्रारेड ऊर्जा मोजण्यासाठी यू.टी.एस् या स्कॅनरमध्ये प्रथम इन्फ्रारेड ऊर्जा मोजण्यासाठी लागणारा नमुना ठेवतात. त्यानंतर परीक्षण करणारी व्यक्ती स्कॅनर विशिष्ट पद्धतीने हातात घेऊन ज्या वस्तूचे परीक्षण करायचे आहे, त्या वस्तूच्या समोर साधारण एक फुटावर उभी रहाते. त्या वेळी स्कॅनरच्या दोन भुजांमध्ये होणारा कोन त्या वस्तूतील इन्फ्रारेड ऊर्जेचे प्रमाण दर्शवतो, उदा. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास त्या वस्तूत इन्फ्रारेड ऊर्जा पूर्णपणे आहे आणि स्कॅनरच्या भुजा मुळीच न उघडल्यास (म्हणजेच ० अंशाचा कोन) त्या वस्तूत इन्फ्रारेड ऊर्जा मुळीच नाही, हे कळते. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास भुजांनी केलेला हा कोन त्या वस्तूपासून किती दूरपर्यंत टिकून रहातो ?, हे मोजतात. मोजलेले हे अंतर, म्हणजेच त्या वस्तूतील इन्फ्रारेड ऊर्जेची प्रभावळ होय. स्कॅनरच्या भुजा १८० अंशापेक्षा अल्प अंशाच्या कोनात उघडल्यास त्याचा अर्थ त्या वस्तूभोवती इन्फ्रारेड ऊर्जेची प्रभावळ नाही, असा होतो. अशाच प्रकारे अनुक्रमे अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आणि त्या वस्तूतील विशिष्ट स्पंदनांची प्रभावळ मोजतात.

४. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता

अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.

आ. उपकरण हाताळणार्‍या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.

५. यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) उपकरणाद्वारे १.८.२०१७ या दिवशी केलेली निरीक्षणे

टीप : स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ त्या घटकाभोवती प्रभावळ नाही, असा होतो.

६. निरीक्षणांचे विवेचन

६ अ. सारणीतील नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीतून इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट या दोन्ही प्रकारची नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात आढळणे : कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीतून इन्फ्रारेड ही नकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होते का ?, हे पहाण्यासाठी केलेल्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा १८० अंशात उघडल्या गेल्या, म्हणजे मूर्तीत इन्फ्रारेड ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे आहे आणि तिची स्पंदने मूर्तीपासून १ मीटर दूरपर्यंत जाणवत आहेत. याच मूर्तीतून अल्ट्राव्हायोलेट ही नकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होते का ?, हे पहाण्यासाठी केलेल्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा १८० अंशात उघडल्या गेल्या, म्हणजे मूर्तीत अल्ट्राव्हायोलेट ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे आहे आणि तिची स्पंदने मूर्तीपासून ०.९८ मीटर दूरपर्यंत जाणवत आहेत. सर्वसाधारण शाडू मातीची गणेशमूर्ती, सनातन-निर्मित रंगीत गणेशमूर्ती आणि सनातन-निर्मित धूम्रवर्णाची गणेशमूर्ती यांत दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळल्या नाहीत. याविषयी अध्यात्मशास्त्रीय स्पष्टीकरण सूत्र ७ मध्ये दिले आहे.

६ आ. सारणीतील सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – सनातन-निर्मित धूम्रवर्णाची गणेशमूर्तीतून सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होणे : कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीचे सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात निरीक्षण करतांना स्कॅनरच्या भुजा उघडल्या नाहीत, म्हणजे या मूर्तीत सकारात्मक ऊर्जा मुळीच नाही. त्यानंतर शाडू मातीच्या सर्वसाधारण गणेशमूर्तीचे निरीक्षण करतांना स्कॅनरच्या भुजा १३० अंशात उघडल्या, म्हणजे मूर्तीत सकारात्मक ऊर्जा काही प्रमाणात आहे. सनातन-निर्मित रंगीत गणेशमूर्तीचे निरीक्षण करतांना स्कॅनरच्या भुजा १८० अंशात उघडल्या, म्हणजे मूर्तीत सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे आहे आणि तिची स्पंदने मूर्तीपासून १.४५ मीटर दूरपर्यंत जाणवत आहेत. शेवटी सनातन-निर्मित धूम्रवर्णाची गणेशमूर्तीचे निरीक्षण करतांना स्कॅनरच्या भुजा १८० अंशात उघडल्या, म्हणजे मूर्तीत सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे आहे आणि तिची स्पंदने मूर्तीपासून २.०७ मीटर दूरपर्यंत जाणवत आहेत. याविषयी अध्यात्मशास्त्रीय स्पष्टीकरण सूत्र ७ मध्ये दिले आहे.

६ इ. सारणीतील वस्तूच्या प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – सनातन-निर्मित धूम्रवर्णाची गणेशमूर्तीची प्रभावळ सर्वाधिक असणे : सर्वसाधारण व्यक्तीची प्रभावळ साधारण १ मीटर असते. कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीची प्रभावळ ०.८९ मीटर आहे, शाडू मातीच्या सर्वसाधारण गणेशमूर्तीची प्रभावळ १.२२ मीटर, म्हणजे तुलनेने अधिक आहे. सनातन-निर्मित रंगीत गणेशमूर्तीची प्रभावळ त्याहूनही अधिक, म्हणजे २.३५ मीटर आहे, तर सनातन-निर्मित धूम्रवर्णाची गणेशमूर्तीची प्रभावळ सर्वाधिक, म्हणजे ३.४७ मीटर आहे. याविषयी अध्यात्मशास्त्रीय स्पष्टीकरण सूत्र ७ मध्ये दिले आहे.

७. चाचणीतील निरीक्षणांमागील अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

७ अ. कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती : ही मूर्ती कागदाचा लगदा या असात्त्विक आणि अशास्त्रीय घटकापासून बनवलेली आहे. देवतेची मूर्ती अध्यात्मशास्त्रानुसार बनवली नसली, तर काय दुष्परिणाम होऊ शकतो, याचे हे एक उदाहरण आहे. यावरून प्लास्टिक, बाटल्या आदी असात्त्विक घटकांंपासून बनवलेली किंवा विडंबनात्मक मूर्ती यांतून किती मोठ्या प्रमाणात नकारात्मक स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होत असतील, याची कल्पना येऊ शकते. त्यामुळे अशी मूर्ती उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक ठरणार आहे.

७ आ. शाडू मातीची सर्वसाधारण गणेशमूर्ती : ही मूर्ती शाडू मातीपासून बनली असल्याने आणि गणपतीच्या सर्वसाधारण आकृतीबंधानुसार असल्याने त्यातून थोडी सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत आहेत.

७ इ. सनातन-निर्मित रंगीत गणेशमूर्ती : ही मूर्ती शास्त्रानुसार, म्हणजे ऋषिमुनींनी सांगितलेल्या मूर्तीविज्ञानानुसार असल्यामुळे यातून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत आहेत आणि त्यामुळे ती उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या अधिक प्रमाणात लाभदायक ठरते. अशा मूर्तीची पूजा आणि उपासना करणे उपासकाच्या दृष्टीने लाभदायक आहे !

७ ई. सनातन-निर्मित धूम्रवर्णाची गणेशमूर्ती : ही मूर्तीसुद्धा साधक-मूर्तीकारांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीभावाने बनवली आहे. ही मूर्ती आध्यात्मिकदृष्ट्या उच्च प्रतीची स्पंदने प्रक्षेपित करते. त्यामुळे उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या अधिक प्रमाणात लाभदायक ठरण्यासह उच्च प्रतीच्या आध्यात्मिक अनुभूती देण्याची क्षमतासुद्धा या मूर्तीत आहे.

७ उ. सनातन-निर्मित दोन मूर्तींपैकी रंगीत गणेशमूर्ती पूजनासाठी वापरणे अधिक योग्य ! : सनातन-निर्मित रंगीत गणेशमूर्ती सगुण स्तरावरील सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करते, तर धूम्रवर्णाची गणेशमूर्ती आध्यात्मिकदृष्ट्या उच्च प्रतीची निर्गुण स्तरावरील सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करते. या दोन्हीही मूर्ती उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असल्या, तरीही धूम्रवर्णाच्या गणेशमूर्तीतून प्रक्षेपित होणारी निर्गुण स्पंदने सर्वसाधारण व्यक्तीला पेलवणारी नसल्याने पूजनासाठी रंगीत गणेशमूर्ती वापरणे अधिक योग्य ठरते.

८. सनातन-निर्मित श्री गणपतीच्या मूर्तीमध्ये गणपतितत्त्व पुष्कळ अधिक प्रमाणात असण्यामागील अध्यात्मशास्त्रीय कारणे

८ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प अन् त्यांचे लाभलेले मार्गदर्शन ! : संतांच्या उच्च आध्यात्मिक स्तरामुळे त्यांच्यात संकल्पशक्ती असते. एखादी गोष्ट घडो, एवढाच विचार त्यांच्या मनात आला, तरीही ती गोष्ट घडते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात समाजाला श्री गणपतीची सात्त्विक मूर्ती उपलब्ध व्हायला हवी, असा विचार येणे, हा संकल्पच आहे. त्यामुळे देवतांची मूर्ती बनवणारे साधक-कलाकार पुढे आले आणि त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार परिश्रमपूर्वक अन् सूक्ष्म-स्तरावरील अभ्यास करून मूर्ती बनवली.

८ आ. सनातन-निर्मित श्री गणपतीची मूर्ती हे धर्मशास्त्रात दिलेल्या गणपतीच्या रूपाच्या वर्णनानुसार, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काळानुसार केलेल्या मार्गदर्शनानुसार असणे : शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती नेहमी एकत्रित असते, असा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्यामुळे देवतेचे रूप आले की, त्याची शक्ती तेथे असतेच. प्रत्येक देवतेच्या रूपाचे वर्णन द्रष्ट्या ऋषिमुनींनी धर्मशास्त्रात लिहून ठेवलेले आहे. त्यामुळे मूर्तीकाराने स्वतःच्या कल्पनेने बनवलेल्या मूर्तीपेक्षा धर्मशास्त्रात दिलेल्या वर्णनानुसार असलेल्या मूर्तीत त्या त्या देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात असते. धर्मशास्त्रात एकाच देवतेची अनेक नावे आणि त्यानुरूप असणार्‍या रूपांचा उल्लेख आढळतो. अशा वेळी उपासकांनी काळानुसार देवतेच्या कोणत्या रूपाची उपासना करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी आहे, ते केवळ अध्यात्मातील जाणकार, म्हणजे संतच सांगू शकतात. सनातन-निर्मित श्री गणपतीची मूर्ती हे धर्मशास्त्रात दिलेल्या गणपतीच्या रूपाचे वर्णन आणि काळानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन यांनुसार बनवलेली आहे.

८ इ. साधक-कलाकारांनी व्यावसायिक हेतूने प्रेरित होऊन नव्हे, तर ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, या भावाने श्री गणपतीची मूर्ती बनवणे : चित्रकला, संगीत, नृत्य आदी सर्व कलांची निर्मिती ईश्‍वरापासून झाली आहे. त्यामुळे ईश्‍वराची (सर्वोच्च आणि सातत्याने मिळणार्‍या आनंदाची) अनुभूती घेता येणे, हे या सर्व कलांचे अंतिम साध्य आहे. थोडक्यात सांगायचे, तर कलेसाठी कला नव्हे, तर ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, याची जाणीव परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनामुळे साधक-कलाकारांना सतत होती. श्री गणपतीची मूर्ती बनवण्यामागे त्यांचा अन्य कोणताही व्यावसायिक हेतू नव्हता.

८ ई. साधक-कलाकारांमध्ये सूक्ष्म स्पंदने जाणण्याची क्षमता असणे : स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. श्री गणपतीची मूर्ती बनवतांना त्या मूर्तीमध्ये त्या देवतेचे तत्त्व येत आहे का ?, हे कळण्यासाठी मूर्तीकारामध्ये सूक्ष्मातील स्पंदने जाणण्याची क्षमता असावी लागते. ही क्षमता योग्य साधनेने विकसित होते. साधक-कलाकारांमध्ये ती क्षमता असल्याने ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार अधिकाधिक गणेशतत्त्व असणारी श्री गणपतीची मूर्ती बनवू शकले.

९. आपल्या अद्वितीय संशोधनातून समाजाला आध्यात्मिक स्तरावर लाभदायक असणारी चित्रे, मूर्ती, ग्रंथ आदी उपलब्ध करून देणारे ऋषितुल्य परात्पर गुरु डॉ. आठवले !

योगशास्त्र, नाट्यशास्त्र, व्याकरण, ज्योतिष, मूर्तीशास्त्र आदी सर्वच प्राचीन शास्त्रांचे रचनाकार ऋषीमुनी हे संशोधकच होते. त्यांनी मानवाच्या उन्नतीसाठी अनेक शास्त्रांची निर्मिती केली. त्यांनी सर्वोच्च ज्ञान मिळवून मानवाला प्रत्येक विषयातील अंतिम सत्य काय आहे, ते आधीच सांगून ठेवले आहे. त्यांनी केलेले कार्य अद्वितीय आहे. प्राचीन ऋषीमुनींचीच परंपरा पुढे चालवणारे अध्यात्मातील अद्वितीय कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले करत आहेत. त्यांनी जुलै २०१७ पर्यंत अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचे ज्ञान देणारे ३०३ ग्रंथ प्रकाशित केले आहेत, तर ३,६९७ ग्रंथ प्रकाशित होऊ शकतील, एवढे ज्ञान त्यांच्या संग्रही आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधक-कलाकारांनी देवतांची तत्त्वे अधिक प्रमाणात असणारी चित्रे आणि मूर्ती यांची निर्मिती केली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली १४ विद्या आणि ६४ कला यांचे शिक्षण आध्यात्मिक परिभाषेतून देणारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय आकार घेत आहे !

१०. कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीमुळे होणारे पर्यावरणाचे प्रदूषण

१० अ. १० किलो कागदी मूर्तीमुळे १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित होणे आणि त्यात विषारी धातू आढळून येणे : मुंबईतील प्रसिद्ध शासकीय रसायन तंत्रज्ञान संस्था (Institute of Chemical Technology, Mumbai) यांनी कागदी लगद्यापासून बनवलेल्या ४ मूर्ती घेऊन या विषयाचे संशोधन केले. त्यांनी सांगितले, १० किलो कागदी मूर्तीमुळे १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित होते. त्या पाण्यात झिंक, क्रोमियम, कॅड्मियम, टायटॅनिअम ऑक्साईड, असे विषारी धातू आढळून आले.

१० आ. कागद विरघळवलेल्या पाण्यात प्राणवायूची (ऑक्सिजनची) मात्रा शून्यावर आल्याचे प्रयोगातून सिद्ध होणे : सांगली येथील ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. सुब्बाराव यांच्या एन्व्हायरन्मेंटल प्रोटेक्शन रिसर्च फाऊंडेशन या संस्थेनेे साधा कागद डिस्टिल्ड वॉटरमध्ये टाकून संशोधन केले. कागद विरघळवलेल्या या पाण्यात ऑक्सिजनची मात्रा शून्यावर आल्याचे त्यांच्या प्रयोगात स्पष्ट झाले. हेे अत्यंत घातक आहे.

१० इ. कागदी लगदा जलाशयात जाणे तेथील माशांसाठी धोकादायक असणे : एका अभ्यासात आढळले, कागदाचा लगदा पाण्यात गेल्यावर त्याचे बारीक कण होतात. मासे त्यांच्या कल्ल्यांद्वारे श्‍वसन करत असतात. हे कागदी लगद्याचे बनलेले बारीक कण या कल्ल्यांमध्ये अडकून पडू शकतात. त्यामुळे त्यांच्या श्‍वसनप्रक्रियेवर परिणाम होतो.

१० ई. वृत्तपत्रांसाठी अथवा अन्य कागदांवर छपाईसाठी वापरली जाणारी शाई पर्यावरणपूरक असेलच, असे नाही. बहुतांशी ती घातक असते.

११. पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती, शाडू मातीची सर्वसाधारण गणेशमूर्ती आणि सनातन-निर्मित रंगीत गणेशमूर्ती यांचा वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी घेतलेल्या चाचणीचाही यू.टी.एस्. चाचणीसारखाच निष्कर्ष येणे

कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती, शाडू मातीची सर्वसाधारण गणेशमूर्ती, आणि सनातन-निर्मित रंगीत गणेशमूर्ती यांचा वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने २.८.२०१७ या दिवशी वैज्ञानिक चाचणी घेतली होती. त्या चाचणीतील संक्षिप्त निरीक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.

टीप –  हा रंग नकारात्मक कि सकारात्मक स्पंदने दर्शवतो, याविषयी माहिती उपलब्ध नसल्याने ही स्पंदने तटस्थ धरली आहेत.

वरील निरीक्षणांतून स्पष्ट होते, गणेशपूजकाला कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक तर नाहीच, उलट अत्यंत हानीकारक आहे. शाडू मातीची सर्वसाधारण गणेशमूर्ती आध्यात्मिकदृष्ट्या काही प्रमाणात लाभदायक आहे आणि सनातन-निर्मित रंगीत गणेशमूर्ती पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे.

१२. गणेश उपासकांना आवाहन !

कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक तर नाहीच, उलट हानीकारकच आहे, हे यू.टी.एस् उपकरण, तसेच पिप तंत्रज्ञान हे यांद्वारे केलेल्या चाचण्यांतून स्पष्ट झाले आहे. अशी मूर्ती पर्यावरणाच्या दृष्टीनेही किती घातक आहे, हेही विविध संशोधनांतून स्पष्ट झाले आहे. गणेशपूजकांनो, हे लक्षात घेऊन कागदी किंवा अन्य अशास्त्रीय घटकांपासून बनवलेली, तसेच अशास्त्रीय आकारांत बनवलेली गणेशमूर्ती कदापि वापरू नका. शक्य असल्यास शास्त्रानुसार बनवलेली गणेशमूर्ती वापरून गणेशपूजनाचा लाभ घ्या. अशी मूर्ती उपलब्ध नसल्यास शाडूच्या मातीची पारंपरिक गणेशमूर्ती पूजनाकरता वापरा.

– आधुनिक वैद्या सौ. नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (८.८.२०१७)

ई-मेल : [email protected]


Multi Language |Offline reading | PDF