देशप्रेम, पोलीस आणि नक्षलवाद !

महाराष्ट्रातील काही पोलीस उपनिरीक्षकांनी  गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागात त्यांची नेमणूक करावी, अशी मागणी केली असल्याचे वृत्त आहे. पोलिसांची सध्याची प्रतिमा पहाता अशी मागणी कोणी पोलीस अधिकारी करील, हे वाचणार्‍यांसाठी आश्‍चर्यजनकच असेल. त्याचप्रमाणे पोलीस खात्यानेही एखाद्या पोलिसाला शिक्षा द्यायची असल्यास त्याचे नक्षलवादी भागात स्थानांतर (बदली) करण्याची प्रथा पाडली होती. या सर्व पार्श्‍वभूमीवर ज्या मोजक्या युवा तरुण पोलीस उपनिरीक्षकांनी नक्षलवादी भागात नेमणूक मागितली आहे, ती अभिनंदनीय आणि त्यांच्यातील धैर्य, देशप्रेम, त्याग यांचे दर्शन घडवणारी आहे. पोलीसदलात असे देशप्रेमी पोलीस आहेत आणि ते नक्षलवाद नष्ट व्हावा, यासाठी त्यांच्या प्राणांची बाजी लावण्यास सिद्ध आहेत, ही खूपच सकारात्मक आणि दिलासा देणारी गोष्ट आहे.

पूर्वी पोलीसदलात किंवा सैन्यात भरती होणे, हे देशप्रेमाचे लक्षण समजले जायचे; परंतु कालांतराने पोलीसदलात भ्रष्टाचार फोफावल्यामुळे ते श्रीमंत होण्यासाठीचे कुरण मानले जाऊ लागले. त्यामुळे देशप्रेमी नाही, तर भ्रष्टाचारी तरुण पोलीसदलात भरती होऊ लागले. पोलीसदलात भरती प्रक्रियेतच भ्रष्टाचार असल्याने भरती होतांना मोजावे लागलेले लक्षावधी रुपये वसूल करणे, हे भरती झालेल्या तरुण पोलिसांचे प्रथम कर्तव्य ठरू लागले. त्यामुळे अशा पोलिसांच्यात देशप्रेम वगैरे असणे अशक्यच ! सर्वच पोलीस भ्रष्टाचारी आहेत, असेही नाही. नक्षलवादी भागात स्वतःहून नेमणूक मागणारे तरुण देशप्रेमी पोलीस हे पोलीसदलात जे काही ३० टक्के चांगल्या वृत्तीचे पोलीस आहेत, त्यांपैकी आहेत. या तरुण अधिकार्‍यांच्या मागणीमुळे इतर पोलिसांनाही हुरुप आला आहे, ही आणखी एक जमेची बाजू !

शिक्षा म्हणून अधिकार्‍यांना नक्षलवादी भागांत पाठवणे हानीकारक !

एकतर वाईट वर्तन करणारे, भ्रष्टाचार करतांना सापडलेले अशांना किंवा राजकारण्यांची हांजी हांजी न करणार्‍या कर्तव्यनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना नक्षलवादी भागात शिक्षा म्हणून पाठवण्याची पोलीसदलात प्रथा आहे. वाईट वर्तणुकीची शिक्षा म्हणून नक्षलवादी भागात पाठवलेला पोलीस अधिकारी तेथे चुकीचे वर्तन करणार नाही का ? आदीवासींवर सुरक्षादलाच्या सैनिकाने किंवा पोलिसांनी अत्याचार केल्याची जी काही वृत्ते येतात, त्यात हेच नीतीमत्ताहीन अधिकारी असतात. या अधिकार्‍यांच्या वाईट वर्तणुकीमुळे आदीवासी भागातील ग्रामस्थांना पोलिसांचा आधार न वाटता ते मग नक्षलवाद्यांना साहाय्य करतात आणि नक्षलवादी चळवळ आणखी फोफावते. यामुळे शासनाची हानीच होते. तसेच स्वार्थापोटी कर्तव्यनिष्ठ अधिकार्‍याला शिक्षा म्हणून या भागात पाठवणे हे त्याचे आणि अवघ्या पोलीसदलाचे खच्चीकरण करण्यासारखे आहे. त्यामुळे शिक्षा म्हणून अधिकार्‍यांना नक्षलवादी भागांत पाठवण्याची पोलीसदलाची कृतीच चुकीची आहे. विद्यमान शासनाने ही हानीकारक अपप्रथा त्वरित बंद पाडावी, ही अपेक्षा !

नक्षलवादी विचारसरणी उखडून टाका !

गेल्या ३७ वर्षांपासून गडचिरोलीत नक्षलवादी चळवळ सक्रीय आहे. नक्षलवादामुळे या जिल्ह्याचा, तसेच आदिवासींचा विकास खुंटला. गडचिरोली असो किंवा झारखंडमधील नक्षलवाद असो, या सर्व चळवळींच्या मागे माओवादी आणि साम्यवादी शक्ती आहेत, हे उघड आहे. मंगळवारी नागपूरमधून माओवादी चळवळीशी संबंधीत तुषारकांती भट्टाचार्य या नेत्याला गुजरात पोलिसांनी अटक केली. भट्टाचार्य याचा भाऊ कोलकात्यामध्ये नक्षलवादी कारवायांमधील सहभागाप्रकरणी कारागृहात आहे. सूरतमध्ये तुषारकांती भट्टाचार्यवर पोलिसांनी देशविरोधी कारवाया, नक्षलवादी संघटनांशी संबंध या कलमांखाली गुन्हा प्रविष्ट केला आहे. यापूर्वी त्याच्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला होता. असे असूनही तुषारकांती भट्टाचार्यची पत्नी नागपूर विद्यापिठात प्राध्यापिका आहे, हे विशेष ! अशा लोकांना विद्यापिठेही कशी सामावून घेतात ? हा प्रश्‍नच आहे. एका नक्षलवाद्याची पत्नी विद्यार्थ्यांना काय शिकवत असणार ? अशाने भावी पिढी नक्षलवादी विचारसरणीची होणार नाही का ? शासनाला हे का लक्षात येत नाही ? भट्टाचार्यची पत्नी नक्षलवादी कारवायांत सहभागी आहे कि नाही, यावर आता भाष्य करणे योग्य नसले, तरी उर्वरित कुटुंबीय नक्षलवादी कारवायांत सहभागी आहे, हे पुरेसे नाही का ? बहुतांश विद्यापिठांत नक्षलवादी कार्यकर्त्यांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळेच त्या ठिकाणी कन्हैयाकुमारसारख्या देशद्रोह्याचा आरोप असलेल्याचे कार्यक्रम होतात. काही मासांपूर्वी अटक झालेला माओवादी सार्ईबाबा हा नेताही देहली विद्यापिठात प्राध्यापक होता. खरेतर अशा सर्व विद्यापिठांमध्ये कोंबिंग ऑपरेशन राबवून त्यातून नक्षलवादी विचारसरणीचे साम्यवादी आणि माओवादी यांच्यावर कारवाई केली पाहिजे. शासन अशी मोहीम राबवणार आहे का ?

शासनाच्या इच्छाशक्तीची जोड हवी !

एकंदरितच केवळ जंगलात लपून बसलेल्या शस्त्रसज्ज नक्षलवाद्यांना अटक करून किंवा चकमकीत मारून नक्षलवादी चळवळ संपुष्टात येणार नाही, तर नक्षलवाद्यांचे माथे शासनाच्या विरोधात भडकवणारी डोकी जी साम्यवाद्यांच्या रूपात शहरांत वसत आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नक्षलवादी चळवळीमुळे आपला विकास खुंटला, ही गोष्ट आदीवासींच्या लक्षात आली असून गेल्या सप्ताहात नक्षलवाद्यांनी आवाहन केलेल्या शहीद सप्ताहाला त्यांनी विरोध केल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यातच आता पोलीसही नक्षलवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी सिद्ध होत आहेत. या सर्व गोष्टींना शासनाच्या इच्छाशक्तीची जोड मिळाल्यास नक्षलवाद संपुष्टात येण्यास साहाय्य होईल.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now