पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या चौकशीचा अहवाल १५ दिवसांत प्रसिद्ध करणार ! – गृहराज्यमंत्री रणजीत पाटील

श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये शासकीय वेतनावरील पुजारी नेमण्यासाठी कायदा करणार !

  • वेतन देऊन पुजारी नेमण्याचा निर्णय म्हणजे धर्मशास्त्रामध्ये ढवळाढवळ करणे. धार्मिक क्षेत्रातील निर्णय धर्माचार्यांना विचारूनच घ्यायला हवेत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पगारी पुजारी नेेमण्यात आल्यामुळे तेथे झालेली दुर्दशा शासनाला लक्षात येत नाही का ?
  • पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या घोटाळ्याविषयी शासन स्वतःहून कोणते उत्तर का देत नाही ? शासनाला लक्षवेधी सूचनेद्वारे त्या घोटाळ्याची विचारणा का करावी लागते ?
  • देवीच्या भक्तांनी मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणून मंदिरे भक्तांच्या स्वाधीन करण्यासाठी संघटित होऊन शासनाला उद्युक्त केले पाहिजे !

मुंबई, १० ऑगस्ट (वार्ता.) – कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये वारसाहक्काने पुजारी देवीची पूजा करतात. हक्कदार पुजार्‍यांकडून पूजेचा हक्क काढून घेण्यासाठी राज्य शासनाने एका परिपत्रकाद्वारे राज्याच्या मुख्य सहसचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर तेथे शासकीय वेतन देऊन पुजारी नियुक्त करण्यासाठी कायदा करू. त्यामध्ये शैक्षणिक अर्हता अनिवार्य करू, तसेच कोणताही वारसा हक्क न करता शिर्डी आणि पंढरपूर येथील शासकीय मंदिरांप्रमाणे स्वतंत्र कायदा करून शासकीय पुजारी नेमू. त्याचप्रमाणे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चालू असलेली चौकशी अंतिम टप्प्यात असून त्याचा अहवाल १५ दिवसांत मिळाल्यावर तो प्रसिद्ध केला जाईल.

सर्व आमदारांची पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीविषयीची सूत्रे आणि पुजार्‍यांविषयीची त्यांची सूत्रे माहिती करून घेण्यासाठीही येत्या १५ दिवसांत एक बैठक घेण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिली. विधानसभेमध्ये शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, प्रकाश अबिटकर, चंद्रदीप नरके यांनी १० ऑगस्टला मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते.

१. राजेश क्षीरसागर यांनी लक्षवेधी सूचना मांडतांना ‘शासनाने जे लेखी उत्तर दिले आहे, त्यात श्री अंबाबाईदेवीला श्री महालक्ष्मीदेवी म्हणून आमच्या जखमेवर मीठ चोळले आहे’, असे सांगितले. याचसमवेत त्यांनी ‘देवीला पारंपरिक वेश सोडून घागरा-चोळी वेश परिधान केल्याने भाविक आणि श्रीपूजक यांच्यात निर्माण झालेला संघर्ष, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये होत असलेला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार, श्रीपूजक अजित ठाणेकर यांच्याकडून केली जाणारी लूट, त्यांचे देवीच्या गाभार्‍यातील अयोग्य वर्तन, ठाणेकर यांच्याकडील पूजेचा हक्क काढून घेणे’, आदी सूत्रे उपस्थित केली.

२. अबिटकर म्हणाले, ‘‘राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचा अहवाल केव्हा येणार ? गेल्या अडीच वर्षांत त्यांनी काय चौकशी केली, ते शासनाने स्पष्ट करायला हवे.’’ चंद्रदीप नरके म्हणाले, ‘‘बहुजन वर्गातील हुशार पुजार्‍यांची नेमणूक शासन कधी करणार ? पगारी पुजारी नेमणुकीचा शासन आदेश तात्काळ काढून संमती द्यावी.’’

३. गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले, ‘‘अन्वेषण विभागाने केलेल्या चौकशीमध्ये अनेक भूमी आणि व्यवहार उघड झाले आहेत. काही गोष्टींचे पुनर्लेखापरीक्षण करावे लागेल.’’

पुजारी हटाव संघर्ष समितीला आलेल्या धमकीपत्राची चौकशी करणार ! – रणजीत पाटील

ही चर्चा चालू असतांना काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी पुजारी हटाव संघर्ष समितीला आलेल्या धमकीपत्राचे वाचन केले. त्यामध्ये त्यांनी ‘समितीच्या ३ सदस्यांचा पानसरे आणि दाभोलकर करू’, अशी धमकी दिल्याचेही सांगितले. त्या अनुषंगाने राणे यांनी ‘या पत्राची चौकशी करणार का ? त्यावर कोणती कारवाई करणार कि त्यांची हत्या होण्याची शासन वाट बघते आहे का ?’ अशी विचारणा केली. त्यावर पाटील म्हणाले की, त्या पत्रावर तात्काळ कारवाई करून चौकशी करू. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.


Multi Language |Offline reading | PDF