स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर !

१५ ऑगस्ट हा दिवस जवळ आला आहे. इंग्रजाळलेल्या तेव्हाच्या नेत्यांनी याच दिवशी भारत स्वतंत्र झाला, असे सांगून या दिवशी स्वातंत्र्यदिन पाळण्याचा प्रघात घातला. देश स्वतंत्र झाल्याची तिथी आहे श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी ! त्यामुळे या वर्षी ही तिथी २० ऑगस्ट या दिवशी असल्यामुळे भारतीय कालगणनेनुसार यावर्षी २० ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करायचा आहे. भारतीय कालगणनेच्या पार्श्‍वभूमीवर एवढे विश्‍लेषण पुरेसे आहे; कारण ज्याच्या हातात शिकार तो पारधी या म्हणीप्रमाणे राज्यसत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांचेच म्हणणे आधारभूत मानले जात असल्यामुळे १५ ऑगस्ट या दिवसाचे महत्त्व न्यून होत नाही आणि तोच आपला स्वातंत्र्यदिन मानला जात आहेे. तसे पहाता देशाविषयीचे प्रेम नेहमीच आणि क्षणाक्षणाला व्यक्त व्हायला हवे. आज देशात तशी स्थिती आहे का ? सध्या देशाला देशप्रेमी शासन लाभल्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे देशद्रोही कारवाया करणारे नतद्रष्ट त्यांच्या कारवाया वाढवत आहेत. प्रत्यक्ष केंद्रशासनाशी संघर्ष करण्याचा त्यांचा मनोदय दिसतो. स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रीय सण असल्यामुळे देशाविषयीचे प्रेम व्यक्त करण्याच्या हेतूने या दिवशी आपले भारतीय नागरिक तिरंगा हातात धरणे, तो उभारणे किंवा फडकावणे, वाहनांवर बांधणे असे करून तो सर्वत्र पाहिला जाईल, असे प्रयत्न करतात. येथपर्यंत ही गोष्ट देशाभिमान म्हणून ठीक आहे, पण पुढे काय ? गरज सरो अन् वैद्य मरो या उक्तीप्रमाणे हे कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज जिकडे-तिकडे फेकून दिले जातात. लोकांची मानसिकता एवढी खालच्या थराला का जाते, ते त्यांनाच ठाऊक; पण काही क्षणांपूर्वी आदराने आणि सन्मानपूर्वक हाताळले गेलेले राष्ट्रध्वज पायदळी तुडवले जातात, हे वास्तव आहे. हिंदु जनजागृती समिती प्रत्येक वर्षी राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ राबवून नागरिकांना जागृत करत असते. यावर्षीही ही चळवळ चालू आहे. समितीच्या चळवळीतील हे सातत्य वाखाणण्याजोगे आहेच; पण मागील १५ वर्षांपासून समितीला ही चळवळ नित्यनियमाने राबवावी लागते, हे अनाकलनीय आहे. राष्ट्रध्वजाचा मान राखा, असे प्रत्येक वर्षी सांगावे लागते, याचा अर्थ भारतीय नागरिकांना देशाविषयी आदर वाटत नाही का ? देशाच्या मानचिन्हाचा आदर करावासा वाटत नाही का ? स्वातंत्र्याची किंमत लक्षात येण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी प्राणांची होळी केली, त्या क्रांतीकारकांचे आणि स्वातंत्र्यसैनिकांचे जीवन आठवले पाहिजे. त्यांनी त्याग केला म्हणून भारतियांना आज हे दिवस दिसत आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त व्हायलाच पाहिजे. स्वातंत्र्यदिन काय किंवा प्रजासत्ताकदिन काय, राष्ट्रध्वजाचा सन्मान ओघाने येतोच. वैयक्तिक स्तरावर तो केला जात असल्याचे दिसले पाहिजे. या राष्ट्रीय सणांच्या वेळी एखाद्या देशाचा नेता उपस्थित असतो. त्याच्यासमोर देशप्रेम प्रदर्शित करण्याचा प्रयत्न म्हणजे नागरिकांनी हातात राष्ट्रध्वज धरणे होय ! देशाच्या या मानचिन्हाचा आदर करण्यात हयगय नको.

देशातील वास्तव !

राष्ट्रध्वजाचा मान राखण्याचे जनतेला आवाहन करावे, अशा आशयाचे निवेदन  जिल्हाधिकारी किंवा तत्सम अधिकारी यांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते देत आहेत. जनतेमध्ये देशप्रेमाविषयी जागृती करण्याचे काम स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही करावे लागते, ही दुर्दैवी गोष्ट आहे. अर्थात या कृतीला आज अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. देशाविषयी आत्मीयता आणि प्रेम वाटणे आजच्या घडीला आवश्यक झाले आहे. देशाने आजपर्यंत चार युद्धे अनुभवली आहेत. शेजारचा चीन देश युद्धाच्याच भाषेत बोलत आहे. विश्‍वासघातकी देश म्हणून चीन कुप्रसिद्ध आहे. भारतियांनी त्याला तसेच ओळखले आहे. भारताचा दुसरा शत्रूदेश पाकिस्तान याला चीनने हाताशी धरले असून भारताला घेरण्याचा त्यांचा डाव आहे. देशाला युद्धसदृश परिस्थिती सध्या भेडसावत असून देशवासियांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पाक आणि चीन या दोन्ही देशांना भारताने धडा शिकवावा, असे भारतीय जनतेला नेहमीच वाटत असते. विस्तारवादी चीन आणि हिंदुद्वेषी पाकिस्तान भारताला नेहमीच सतावत असतात. भारतीय प्रदेशावर चीन त्याचा अधिकार सांगतो, तर इकडे पाकिस्तान भारतात अराजक कसे माजून राहील हे पहात असतो. आतंकवाद्यांना भारतीय सीमेत घुसवून भारतात अराजक निर्माण करण्याचे त्याचे तंत्र आहे. भारतीय जनतेने या दोन्ही देशांची मानसिकता ओळखली असून भारताला केवळ सतावण्याचे त्यांचे धोरण हेरले आहे. त्यामुळेच त्यांना योग्य धडा शिकवला जावा, असे त्यांना वाटते. एकूणच देशासमोर युद्धाचे मोठे आव्हान असून देशातील प्रत्येक नागरिकाने देशाच्या पाठीशी उभे रहाणे आवश्यक आहे. ही गोष्ट केवळ देशप्रेमापायी शक्य आहे. राष्ट्रध्वजाचा मान राखा, ही चळवळ त्या दृष्टीने दुग्धशर्करायोग म्हणायला हवी. समितीच्या कार्यकर्त्यांची शाळा-महाविद्यालये येथील प्रवचने तर विद्यार्थ्यांच्या अंतःकरणाचा ठाव घेत आहेत. विद्यार्थ्यांकडून मिळत असलेला प्रतिसाद बहुमोल स्वरूपाचा आहे. विद्यार्थी त्यांच्या कुटुंबियांमध्ये देशावरील संकटांविषयी जागृती करत आहेत. युद्धासारख्या वेळी देशवासियांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणे अत्यंत आवश्यक असते. देशावरील संकट हे माझ्यावरील संकट आहे, असे प्रत्येक नागरिकाला वाटले पाहिजे. युद्धकाळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवण्याची मोठी भीती असते; पण नागरिकांनी येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची सिद्धता म्हणजेच त्यागाची सिद्धता ठेवली, तर ती गोष्ट देशाच्या शासनाला आधार असतेे. हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रध्वजाचा मान राखा या चळवळीचे असे अप्रत्यक्ष चांगले परिणाम आहेत. सगळ्या भारतीय नागरिकांनी तिला सकारात्मक प्रतिसाद देणे, आज अगत्याचे आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now