काँग्रेसमुक्त भारताची वाटचाल योग्य दिशेने !

लोकसभेच्या निवडणुकीत दारूण पराभव झाल्यापासून  काँग्रेसला मिळणारा घरचा अहेर काही थांबण्याचे नाव घेईना. या पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा सुंयक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील तत्कालीन पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनीही त्यांच्या पक्षाला नुकताच घरचा अहेर दिला. आमच्याकडून संस्थाने गेली; पण आम्ही अजूनही राजे असल्याप्रमाणेच वागतो. आम्हाला पूर्णपणे पालटण्याची आवश्यकता आहे, अशी बोचरी टीका रमेश यांनी केली. त्यांचा रोख पक्षाच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांच्यावर होता, हे वेगळे सांगायला नको. रमेश हे पक्षातील ज्येष्ठांपैकी एक असल्याने काँग्रेसला ही टीका जिव्हारी लागणे स्वाभाविक आहे. यापूर्वीही काँग्रेसमधील अनेक मोठ्या नेत्यांनी स्वपक्षावर असे तोंडसुख वेळोवेळी घेतले आहे. इतकेच नव्हे, तर काँग्रेसच्या मित्रपक्षांचे नेतेही अधूनमधून काँग्रेसला कानपिचक्या देत असतात. संयुक्त पुरोगामी आघाडीतील घटक पक्ष असलेल्या जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही जयराम रमेश यांची री ओढली. ते म्हणाले, जयराम रमेश यांच्यासारख्या नेत्याच्या विधानाकडे दुर्लक्ष करणे, हा काँग्रेसचा अदूरदर्शीपणा ठरेल. या सर्व गोष्टींवरून काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींच्या मनमानी कारभाराविषयी नेते आणि कार्यकर्ते यांच्यात किती खदखद आहे, हे स्पष्ट होते.

काँग्रेसची घसरण चालूच !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भारताला काँग्रेसमुक्त करण्याची घोषणा केली किंबहुना हेच त्या निवडणुकीचे प्रमुख सूत्र होते. काँग्रेसच्या राजवटीला कंटाळलेल्या जनतेने भाजपच्या झोळीत विजयी मते टाकत काँग्रेसला घरचा रस्ता दाखवला. परिणामी विक्रमी जागा मिळवून भाजप केंद्रात सत्तेत आला. काँग्रेसला सत्तेबाहेर रहाण्याची सवय नसल्याने त्यांची अवस्था पाण्याविना मासा, अशी झाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून काँग्रेसी एकामागोमाग एक उड्या मारत आहेत. लोकसभेच्या पुढील निवडणुकीला जेमतेम दीड-पावणेदोन वर्षे राहिली असतांनाही काँग्रेसचा धुव्वा उडणे चालूच आहे. जयराम रमेश यांचे वरील विधान पंतप्रधानांच्या काँग्रेसमुक्त भारताच्या घोषणेला एकप्रकारे पुष्टी देणारे आहे.

अहमद पटेलांच्या विजयातील संघर्ष चिंताजनक !

अहमद पटेल हे काँग्रेसमधील सर्वोच्च नेत्यांपैकी एक आहेत. ते सोनिया गांधींचे राजकीय सल्लागारही आहेत. म्हणूनच तसे पहायला गेले, तर सोनिया गांधींच्या पाठोपाठ तेच सर्वोच्च नेते आहेत. अहमद हे राज्यसभेवर सलग ५ वेळा निवडून आले; परंतु काल  सहाव्यांदा मिळालेल्या विजयासाठी मात्र त्यांना पर्यायाने काँग्रेसला प्रचंड संघर्ष करावा लागला. हातातोंडाशी आलेला विजय जातो कि रहातो, अशी परिस्थिती तब्बल १० घंटे होती. त्यात अहमद यांनी बाजी मारली खरी; परंतु त्यासाठी पक्षाला जो संघर्ष करावा लागला, त्याने काँग्रेसींना या विजयाचा निर्भेळ आनंद लुटू दिला नसणार, हे निश्‍चित ! राज्यसभेच्या याच निवडणुकीत स्वपक्षातील आमदार फुटून भाजपच्या गळाला लागू नयेत, यासाठी काँग्रेसने त्यांच्या आमदारांना थेट कर्नाटक राज्यात नेऊन डांबून ठेवले. या सर्व घडामोडींवरून काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांच्या विजयाची वाट यापुढे सोपी नाही, हे पक्षश्रेष्ठींना कळून चुकले असेल. अहमद पटेल यांच्यासारख्या शक्तीशाली नेत्याचा रडतखडत झालेला विजय म्हणूनच एकाअर्थी पराभवच म्हणावा लागेल. या सर्वांवरून काँग्रेसमुक्त भारताची वाटचाल योग्य दिशेने होत आहे, हे मात्र निश्‍चित !

कारवाई योग्यच; पण विलंब अक्षम्य !

सध्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने काश्मीरमधील फुटीरतावाद्यांच्या विरोधात धडक कारवाई चालू केली आहे. ती आवश्यकच होती. काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी तेथील फुटीरतावादी पाकिस्तानकडून पैसे घेत असल्याच्या प्रकरणी ही कारवाई चालू आहे. यात प्रतिदिन एकामागोमाग फुटीतावाद्यांना होणारी अटक पहाता पाकिस्तानने काश्मीरमध्ये किती घट्ट जाळे विणले आहे, हे लक्षात येते. आतंकवादासाठी पाककडून पैसा मिळत असल्याच्या प्रकरणी अन्वेषण यंत्रणेने ७ ऑगस्ट या दिवशी हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते सैय्यद अली शाह गिलानी यांचे २ पुत्र नईम आणि नसीम यांची चौकशी केली. त्यापूर्वी यंत्रणेने २४ जुलै या दिवशी बिट्टा कराटे, नईम खान, अल्ताफ अहमद शाह, अयाज अकबर, टी. सैफुल्लाह, मेराज कलवल आणि शहीद-उल्-इस्लाम या ७ फुटीरतावादी नेत्यांना अटक केली होती. यातील अल्ताफ हा गिलानी यांचा जावई आहे. यावरून गिलानी घराणे देशद्रोहात किती आकंठ बुडाले आहे, हे लक्षात येईल. फुटीरतावाद्यांना काश्मीरमध्ये हिंसाचार घडवून आणणे, सुरक्षा दलांवर दगडफेक करणे, विध्वंस घडवून आणणे, यांसाठी आतंकवादी हाफीज सईद, तसेच आयएस्आयकडून पैसे मिळतात. याची स्वीकृतीही अटकेतील फुटीरतावाद्यांनी दिली आहे. खरेतर फुटीरतावाद्यांनी काश्मीर पूर्णत: पोखरला आहे. पूर्वी फुटीरतावाद्यांकडून सैन्यावर दगडफेक झाल्याचे प्रकार अभावाने घडत. आता मात्र तेथील सर्वसामान्य लोकही दगडांचा शस्त्रासारखा वापर करून सैन्याला लक्ष्य करत आहेत. यावरून पूर्ण काश्मीरच फुटीरतावाद्यांनी भरले आहे, असे म्हणण्यास वाव आहे. मग प्रश्‍न असा पडतो की, एवढे होईपर्यंत तत्कालीन काँग्रेस सरकार काय करत होते ? त्यांनी त्या वेळीच कारवाई का केली नाही ? म्हणूनच एक राष्ट्र म्हणून विचार करता फुटीरतावाद्यांवरील ही कारवाई योग्य आणि स्वागतार्ह आहे; पण त्यास झालेला विलंब मात्र अक्षम्य आहे.


Multi Language |Offline reading | PDF