कन्हैयाकुमारची पोपटपंची !

सेव्ह इंडिया चेंज इंडिया असा नारा देत कन्हैयाकुमार  याने कन्याकुमारी ते हुसैनीवाला (पंजाब) असा देशव्यापी मोर्चा काढला आहे. या मोर्च्याच्या निमित्ताने राष्ट्रद्रोही आणि हिंदुद्वेष्ट्या विचारांच्या मुशीतून घडलेला आणि त्यात नखशिखांत बुडालेला कन्हैयाकुमार परत एकदा हिंदुत्वनिष्ठ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदींवर गरळओक करत देशभर फिरत आहे. अर्थातच राष्ट्रद्रोही मानसिकतेचे साम्यवादी बुद्धीजीवी आणि राजकीय पक्ष यांना हाताशी धरून तो गर्दी जमवण्याचा प्रयत्न करत आहे आणि माध्यमे त्याला प्रसिद्धी देत आहेत. केवळ वैचारिक मतभेद असते, तर त्यात नोंद घेण्यासारखे काही नव्हते; परंतु कन्हैयाला इतका पराकोटीचा हिंदुद्वेष आहे की, बोलता बोलता तो अत्यंत खालच्या स्तराला जातो, राष्ट्रद्रोही विधाने करतो आणि लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे म्हातारी मेल्याचे दुःख नाही; पण काळ सोकावतो अशी स्थिती झाली आहे. त्यासाठी त्याच्या विधानांचा वैचारिक प्रतिवाद करणे, आवश्यक होऊन जाते.

बेताल वक्तव्ये

कन्हैया देश काँग्रेसमुक्त कि भाजप काँग्रेसयुक्त ?, नोटाबंदीमुळे १५ लाख लोकांचा रोजगार बुडाला, मोदींनी आश्‍वासने पूर्ण केली नाहीत अशी काही सूत्र मांडतो, इथपर्यंत ठीक असते; पण जेव्हा तो मोदी यांना जेएन्यु विद्यापिठात प्रवेश घेण्याचे आणि तेथील निवडणूक लढवण्याचे आव्हान करतो, तेव्हा मात्र त्याचे ताळतंत्र सुटलेले असते. मोदी ज्या हिंदुत्वाच्या पाठशाळेत शिकले आहेत, त्याची सर त्यांच्या निम्म्या वयाच्या, अननुभवी आणि हिंदुद्वेषाने पछाडलेल्या कन्हैयाला काय येणार ? ६ ऑगस्ट या दिवशी कन्हैयाकुमार याचा मोर्चा संभाजीनगरमध्ये पोहोचला. त्या वेळी त्याने कार्यक्रमात पंतप्रधानांवर यथेच्छ गरळओक केली. छोट्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांचे नेतृत्व आणि देशाचे नेतृत्व यांत कन्हैयाला काहीच भेद दिसत नाही का? जेव्हा तो मोदींनी सूट पालटण्याविषयी बोलतो तेव्हा साम्यवादाचा कट्टर पुरस्कर्ता कन्हैया स्वतःही महागडे जॅकेट घालून फिरत असतो, हे प्रसिद्धीमाध्यमांना दिसत नाही का ? तो जेव्हा जातीचे राजकारण नष्ट झाले पाहिजे, असे म्हणतो, त्या वेळी त्याविषयी कुणाला दुमत नसते; पण त्याच वेळी तो आरक्षणाची मागणी करतो, तेव्हा आरक्षणाने देशाची केवळ हानीच होणार आहे आणि तेच खरे जातीचे राजकारण आहे, हे त्याला प्रसिद्धी देणार्‍यांच्या आणि त्याच्याभोवती गोळा झालेल्या तरुणांच्या लक्षात कसे येत नाही ? संभाजीनगर येथे तो म्हणाला, वर्ष २०२२ मध्ये संघ १०० व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्या वेळी हिंदु राष्ट्र करण्याची भाषा होत आहे. त्यामुळे कनिष्ठ जातींच्या लोकांवर आक्रमणे केली जातात. रा.स्व. संघातून अद्याप जात गेलेली नाही. वरील विधानातून उच्चवर्णीय हिंदु राष्ट्राची मागणी करत आहेत, असे चित्र निर्माण केले जात आहे. एवढी वर्षे बंगालमध्ये साम्यवाद्यांचे शासन होते. आज बंगालची स्थिती किती भयंकर आहे, यावर ग्रंथ निघू शकेल. तेथे सर्वत्र हिंदूंवर मोठ्या प्रमाणात आक्रमणे होऊन हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कन्हैया याच साम्यवादी पक्षांच्या विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याला हिंदु राष्ट्राविषयी काही बोलण्याचा अधिकार उरतो का ? देशात गरिबी, लोकसंख्या, आतंकवाद, भ्रष्टाचार असे अनेक प्रश्‍न असतांना, मुसलमान आणि दलित यांच्यावर आक्रमणे होत असतांना देशात धर्माधिष्ठित राज्यनिर्मितीची प्रक्रिया चालू आहे, असे विधान त्याने केले. हे सारे प्रश्‍न धर्माधिष्ठित राज्यात सुटतील, हे समजण्याची जेएन्युत शिकलेल्या कन्हैयाची पात्रता नाही, त्याला कोण काय करणार ? देशाचा इतिहास पालटाल, तर आम्ही तुम्हाला पालटू, अशी चेतावणीही त्याने दिली. देशाचा इतिहास काँग्रेस आणि नेहरू यांनी पालटला आहे. तो आता खर्‍या स्वरूपात आणण्याचा प्रयत्न होत आहे. खरा इतिहास समजण्यासाठी कन्हैया हवे तर प्राचीन आणि अर्वाचीन चिनी इतिहासकारांच्या नोंदी तपासू शकतो. सारी अभ्यासहीन आणि बुद्धीभ्रम करणारी वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळवायची एवढाच हेतू कन्हैयाच्या वक्तव्यातून दिसतो. भगवा ध्वज आणि तुकाराम महाराज यांच्याविषयीही त्याने तर्कहीन वक्तव्य केले आणि स्वतःचे हसे करून घेतले. तुकाराम महाराज आणि योगी आदित्यनाथ यांचा भगवा वेगळा आहे. योगी आदित्यनाथांच्या भगव्याला डाग लागले आहेत, हे त्याचे वक्तव्यच मुळात जातीयवादी आहे. या सर्वांवर कडी म्हणजे संभाजीनगरच्या भाषणात तो म्हणाला, काश्मीरमध्ये होणारी दगडफेक चुकीची आहे. त्याऐवजी अन्याय करणारे, जातीयवादी आणि धर्मवादी यांच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. पानसरे, दाभोलकर यांच्या हत्यांचे मारेकरी सापडले जात नाहीत, हे महाराष्ट्र शासनाचे अपयश आहे. याचा अर्थ काय होतो ? काश्मीरप्रमाणे येथेही धर्मांधांनी धर्मनिष्ठ हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात उभे रहावे आणि त्यांच्यावर आक्रमण करावे, असे त्याला म्हणायचे आहे का ? कन्हैयाने देशद्रोह्यांना देशभक्तांच्या विरोधात उभे रहाण्यासाठी दिलेले हे उघड उघड आवाहनच नव्हे का ?

सरकार कारवाई करील का ?

कन्हैयाकुमार याच्या सभा या हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात केवळ आक्षेपार्ह विधाने करणार्‍या नाहीत, त्या तरुणांचा बुद्धीभेद करून त्यांची दिशाभूल करणार्‍या आहेत. इतकेच नव्हे, तर विरोधकांची माथी भडकवून त्यांना हिंदूंवर आक्रमण करण्यास प्रवृत्त करणार्‍या आहेत. त्याची चिथावणीखोर वक्तव्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरही देशाची चुकीची प्रतिमा निर्माण करतात. हे सारे लक्षात घेऊन शासनाने त्याच्या या लाँग मार्चला किती बंधने घालायची आणि किती प्रमाणात अनुमती द्यायची, याविषयी निर्णय घ्यावा. अन्यथा हिंदुत्वनिष्ठांना देशात असहिष्णुता वाढत आहे, असे वाटल्यास त्यात चूक ते काय ?


Multi Language |Offline reading | PDF