आतापर्यंत बिनभाड्याचे घर अशी ओळख असलेली कारागृहे आता सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेली अलिशान घरे म्हणून (अप)कीर्तीस येत आहेत. साहाय्यकांचा गोतवळा आणि भरमसाट पैसा असला की कारागृहाचे नरकमय जीवनही ऐषाआरामात जगता येते, हे गेल्या काही दिवसांपासून उघड होत असलेल्या घटना सांगत आहेत. एकीकडे पैसे घेऊन मोठे गुंड, आरोपी राजकारणी यांची उत्तम बडदास्त ठेवण्यात येत आहे, तर दुसरीकडे बराकीच्या क्षमतेबाहेर असलेल्या संख्येमुळे कैद्यांचे होणारे हाल, कारागृहातील गुन्हेगारीत कैद्यांचा जाणारा नाहक बळी या गोष्टीही चर्चेत आहेत. मंजुळा शेट्ये हत्या प्रकरण, कर्नाटकातील परप्पन् अग्रहार कारागृहातील भ्रष्टाचाराची प्रकरणे यांतून कारागृहातील अंदाधुंद कारभार चव्हाट्यावर आला. मंजुळा शेट्ये हिच्या मृत्यूनंतर टप्याटप्प्याने उलगडलेल्या गोष्टी, झालेले आरोप, भ्रष्टाचार उघड केल्यामुळे आयपीएस् अधिकारी डी. रूपा यांची केलेली बदली या सर्वच गोष्टी गंभीर आणि कारागृह प्रशासनासह गृहखात्याच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणार्या आहेत.
कारागृह निर्मितीचा हेतू असफल !
गुन्हा केल्यानंतर व्यक्तीमध्ये परिवर्तन व्हावे आणि केलेल्या अपकृत्यांविषयी तिच्या मनात अपराधीपणाची जाणीव व्हावी, हा कारागृहनिर्मितीचा प्रमुख उद्देश आहे; मात्र सध्याची वस्तूस्थिती पाहिली, तर कारागृहातून मोठ्या गुन्ह्यांचे नियंत्रण होत आहे. कैदी अन्य कैद्यांच्या संगतीने अधिकच उद्दाम होत आहेत, तर निष्पापांचा बळी जात आहे. काही वेळा खटला चालू असलेले कैदी निष्पाप असूनही न्यायप्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्यांना विनाकारण कारागृहात खितपत पडून रहावे लागते. अशा वेळी तेथील भयानक वातावरणाचा त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होऊन मानसिक संतुलनहीबिघडते ! काही अधिकार्यांना तर कारागृहाच्या रूपातून भ्रष्टाचाराचे कुरणच मिळाले असून ते राजरोसपणे गुन्हेगारांना सहकार्य करत आहेत. कारागृहाची सुरक्षायंत्रणाही ढिसाळ असून आधारवाडी कारागृहातून २ कैद्यांनी पलायन केल्याची घटना याची साक्ष आहे. थोडक्यात कारागृहनिर्मितीचा हेतू असफल होत असून गुन्हेगारांचे आश्रयस्थान अशी त्याची (कु)ख्याती होत आहे.
गुन्हे होऊच नयेत, यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक !
अधिकार्यांपासून कैद्यांपर्यंत असलेली भ्रष्टाचाराची ही साखळी तोडणे आवश्यक आहे. त्याहून अधिक म्हणजे कारागृहनिर्मितीची वेळच येऊ नये, येथपर्यंत समाजातील नैतिकता पोहोचणे आवश्यक आहे. समाज धर्माचरणी आणि सात्त्विक असल्यास गुन्हे होणारच नाहीत. लोकहो, हा हेतू साध्य होण्यासाठी सत्त्वगुणी लोकांचे हिंदु राष्ट्र स्थापन करणेच अपरिहार्य असल्याचे जाणा !
– कु. प्राजक्ता धोतमल