नारळी पौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व !

७.८.२०१७ या दिवशी नारळी पौर्णिमा आहे. त्या निमित्तानेआपण नारळी पौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊया.

१. नारळी पौर्णिमेला समुद्राला फुले आणि श्रीफळ अर्पण करण्याचे महत्त्व

पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती अधिक प्रमाणात येते, तर अमावास्येला ओहोटी अधिक प्रमाणात येते. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला प्रार्थना करून फुले आणि श्रीफळ अर्पण करतात. पावसाळ्यात खवळलेला समुद्र शांत होऊन त्याने त्याची मर्यादा ओलांडू नये, अशी त्याला प्रार्थना केली जाते. समुद्र शांत झाल्यानंतरच मासेमार आणि जहाजांद्वारे समुद्री प्रवास अन् व्यापार करणारे लोक त्यांची निहित कर्मे पूर्ण करू शकतात.

२. पर्जन्याची वृष्टी केल्याविषयी वरुणदेव आणि समुद्रदेव यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे

सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन ढग तयार होतात आणि त्यामुळे पाऊस पडतो. नियमितपणे पाऊस पडण्यात सूर्यासह समुद्रदेवाचेही मोलाचे योगदान आहे. समुद्राच्या पूजनाने एक प्रकारे वरुणदेवाच्या विराट रूपाचे पूजन करून वरुणदेवाचा आशीर्वाद प्राप्त केला जातो. समुद्रदेवाचे पूजन केल्यामुळे समुद्रदेव आणि वरुणदेव यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.

३. निसर्गाचा समतोल राखल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे

पृथ्वीवरील निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नद्या आणि समुद्र यांचा मोलाचा वाटा आहे. समुद्राचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त होते.

४. नद्या आणि समुद्र यांच्या पूजनामुळे आपतत्त्वाच्या उपासनेचे लाभ होणे

नद्या किंवा समुद्र यांच्या पूजनामुळे वरुणदेवाची पूजा होऊन आपतत्त्वाच्या स्तरावरील साधना पूर्ण होते. आपतत्त्वाच्या उपासनेमुळे मनाची निर्मळता वाढण्यास साहाय्य मिळते. तसेच नद्या आणि समुद्र यांच्यातील औदार्य आणि व्यापकता हे गुण आपल्या अंगी वाढीस लागतात.

५. अहंकाराच्या बळावर नव्हे तर,विनम्रता आणि समर्पित भावाने महाशक्तीवर विजय प्राप्त करता येतो, हे नारळी पौर्णिमेच्या उदाहरणातून सिद्ध होणे

कुणालाही आश्‍चर्य वाटू शकते की, विशाल समुद्राला केवळ लहानसा नारळ अर्पण केल्यावर तो त्याचे विक्राळ रूप शांत कसे करतो. ही किमया हिंदु धर्माच्या श्रेष्ठतेत दडलेली आहे. नारळ हा श्रीफळ, म्हणजे शुभफळ असल्यामुळे त्याकडे ब्रह्मांडातील समस्त चांगली स्पंदने आकृष्ट होऊन ती वातावरणात प्रक्षेपित होतात. हा नारळ नुसता समुद्राला न देता, समुद्रदेवाला संपूर्ण शरण जाऊन समर्पित भावाने अर्पण केल्यामुळे समुद्रदेव प्रसन्न होतो. यावरून आपल्या हे लक्षात येते, देव भावाचा भुकेला आहे. त्यामुळे तो वस्तूने प्रसन्न होत नसून वस्तू अर्पण करण्यामागे कार्यरत असणार्‍या भावाने प्रसन्न होतो. भावामुळे भगवंत भक्ताला वश होतो. कलियुगातील विज्ञानवादी मानव वैज्ञानिक प्रगती करून निसर्गावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे निसर्ग मनुष्याच्या आधीन तर झालेलाच नाही, उलट तो मानवावर कृद्ध झालेला आहे. हिंदु संस्कृतीची शिकवण कुणावर वर्चस्व स्थापन करण्याची नसून महाशक्तीला शरण जाऊन तिचे वर्चस्व स्वीकारून तिचे पूजन करण्याची आहे. त्यामुळे निसर्गासारखी महाशक्ती निसर्गोपासक कर्महिंदूंवर प्रसन्न होऊन त्यांच्यासाठी अनुकूल बनते आणि त्यांच्या आधीन होते. अहंकाराच्या बळावर नव्हे तर, विनम्रता आणि समर्पित भावाने महाशक्तीवर विजय प्राप्त करता येतो, हे मनुष्याच्या लक्षात येईल, तेव्हा खर्‍या अर्थाने मनुष्याची प्रगती झाली, असे म्हणता येईल.

प्रार्थना !

समुद्रदेव रत्नाकर आहे. आम्हा साधकांमध्येही सद्गुणांच्या रत्नांची वृद्धी होवो आणि समुद्रदेवाने मनुष्यासह संपूर्ण प्राणीमात्रांवर अशीच कृपादृष्टी ठेवावी, ही समुद्रदेवाच्या चरणी प्रार्थना आहे.

– कु. मधुरा भोसले , (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.७.२०१७) 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now