कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्‍या श्री गणेशमूर्तींना शासनाने प्रोत्साहन देणे थांबवावे ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

कोल्हापूर आणि इचलकरंजी येथे निवासी उपजिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

कोल्हापूर, ४ ऑगस्ट (वार्ता.) – कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्‍या श्री गणेशमूर्तींना शासनाने प्रोत्साहन देणे थांबवावे, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर आणि इचलकरंजी येथे २ ऑगस्टला दिले. कोल्हापूर येथील निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना हे निवेदन पाठवण्यात येईल, असे सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख श्री. राजू यादव, उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे, शिवसैनिक श्री. राजू सांगावकर, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. नंदकुमार घोरपडे, शहराध्यक्ष श्री. मनोहर सोरप, महिला आघाडीच्या सौ. रश्मी आडसुळे, श्रीमती सुवर्णा पोवार, इस्कॉनचे श्री. दीपक सपाटे, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील पाटील, वन्दे मातरम् युथ ऑर्गनायझेशनचे श्री. अवधूत भाट्ये, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहराध्यक्ष श्री. शरद माळी, कार्यकर्ते श्री. आशिष लोखंडे, विश्‍व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष श्री. अशोक रामचंदानी, हिंदू एकता आंदोलनाचे श्री. शिवाजीराव ससे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट आदी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की,

१. गणेशोत्सवासाठी श्री गणेशमूर्ती कागदी लगद्यापासून बनवाव्यात. कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्तीपासून जलप्रदूषण होत नाही, असा कोणताही शास्त्रशुद्ध अभ्यास न करता अंनिसचे दिवंगत कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अपप्रचार केला.

२. त्यांच्या प्रभावाखाली शासनाच्या पर्यावरण विभागाने ३ मे २०११ या दिवशी कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन मिळावे, या मूर्ती सर्वत्र उपलब्ध होण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, श्री गणेश मूर्तींसाठी विशेष सवलत द्यावी, असा उल्लेख केला आहे.

३. ही सूचना पर्यावरण विभागाला घातक असल्याने यावर ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादाने यावर स्थगिती आणली आहे. त्यामुळे कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्‍या श्री गणेशमूर्तींना शासनाने प्रोत्साहन देणे थांबवावे, अशी मागणी केली आहे.

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – येथील प्रांताधिकार्‍यांना वरील निवेदनासमवेत गणेशोत्सवात कृत्रिम हौद, मूर्तीदान, अमोनियम बायकार्बोनेटच्या पाण्यात मूर्तीविसर्जन, आदी धर्मविरोधी आणि अशास्त्रीय संकल्पना राबवू नये, तसेच जलप्रदूषणाला कारणीभूत असलेल्या मुख्य घटकांवर लक्ष केंद्रीत करून उपाययोजना करावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठानचे सर्वश्री सुशांत घोरपडे, मंगेश मसकर, ओंकार नेजे, बजरंग दलाचे श्री. सुजीत कांबळे, विश्‍व हिंदू परिषदेचे शहरप्रमुख श्री. बंडा जाधव, शिवतीर्थ संघटनेचे श्री. आनंदा मकोटे, हिंदुत्वनिष्ठ श्री. विनोद ओझा, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, प्रीतम पोवार आदी उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF