रद्दी

किचकट आणि अनावश्यक कार्यपद्धती, कालबाह्य नियम आणि अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्याचा अनुत्साह यांचे थेट परिणाम उपभोक्त्यावर होतात, तसेच ते वस्तूंवरही होतात. शासकीय कार्यालये, संस्था, महाविद्यालये, तसेच न्यायालये आदी ठिकाणी असणारे रद्दीचे ढीग हा या जुनाटपणा आणि निर्णयक्षमतेचा अभाव यांचाच दृश्य परिणाम आहे. रेकॉर्ड मेन्टेनिंगच्या नावाखाली वर्षानुवर्षांची कागदपत्रे बांधून माळ्यावर टाकणे, मुदतीनंतरही त्यांची विल्हेवाट न लावणे, अनावश्यक कार्यपद्धतींमुळे डुप्लिकेट डेटा निर्माण होणे यांमुळे या रद्दीच्या ढीगाचे डोंगर होऊ लागले आहेत. एस्टी महामंडळाचे उदाहरण घेतले, तर एकट्या महामंडळामध्ये रद्दीची विल्हेवाट न लावल्याने साधारण १ सहस्र टनाहून अधिक रद्दी पडून असल्याचे वृत्त आहे. याची किंमत १३ कोटींच्या घरात जाते. महामंडळाकडे एकूण ३० विभागीय कार्यालये आणि अनुमाने २५० आगार आहेत. त्यांतून जर टनावारी रद्दी निघत असेल, तर सर्व शासकीय कार्यालयांचा एकत्रित विचार केला, तर समोर येणारा आकडा भोवळ आणणाराच असेल.

खरे तर शासकीय कार्यालयांमध्ये रद्दीच्या विक्रीसाठी निविदा प्रक्रिया राबवली जाते. मग एस्टी महामंडळामध्ये सहस्र टनाहून अधिक रद्दी होईपर्यंत निविदा प्रक्रिया राबवली गेली नाही का ? सध्या शासनाचा स्मार्ट कारभारावर भर आहे; मात्र केवळ कारभाराचे यांत्रिकीकरण करून चालणार नाही, तर तो स्मार्टपणे करावाही लागेल. योग्य नियोजन केले नाही आणि योग्य कार्यपद्धती घातल्या नाहीत, तर उद्या कागदाच्या रद्दीऐवजी इ-रद्दी निर्माण होईल.

सुटसुटीत कार्यपद्धतीची बहुतांश ठिकाणी वानवा असल्याने, तसेच संस्थेच्या कारभारामध्ये सुसूत्रता नसल्याने अनेक वेळा एकच प्रकारची माहिती अनेक ठिकाणी द्यावी लागते. सरकारी कामांच्या संदर्भात, तर एकाच प्रकारची कागदपत्रे अनेक विभागांमध्ये खिरापतीप्रमाणे वाटावी लागतात, असा अनुभव येतो. शैक्षणिक संस्थांमध्येही विद्यार्थ्यांच्या अनेक वर्षांच्या उत्तरपत्रिका सांभाळून (?) ठेवल्या जातात. रेकॉर्ड ठेवण्याच्या नावाखाली रद्दी संकलन केले जात असले, तरी ती ठेवण्यामध्येही सुसूत्रता नसते. रद्दीचा विषय मार्गी न लावल्याने त्यावर जाळी-जळमटे धरलेली असतात. अशा ठिकाणाहून स्पंदनेही चांगली येत नाहीत.

दुसर्‍या महायुद्धानंतर उद्ध्वस्त झालेल्या जपानने कायझेन (सातत्याने सुधारणा) या व्यवस्थापकीय कार्यपद्धतीला आपलेसे करून गरुडभरारी घेतली. कायझेन म्हणजे कोणत्याही परिस्थितीत समाधानी न रहाता त्यामध्ये सातत्याने सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे. कायझेन हा कोणताही मोठा पालट नसून अनेक छोट्या छोट्या पालटांची ती शृंखला असते. आपणही रद्दी निर्माण होण्यासाठी कारणीभूत असलेल्या कार्यपद्धतींमधील त्रुटी दूर करण्यास प्राधान्य दिले, तर रद्दीचा डोंगर नक्कीच भुईसपाट होईल; मात्र त्यासाठी सर्वांत आधी स्वतःमधील अवगुणांच्या आणि स्वभावदोषांच्या रद्दीचा निचरा केला पाहिजे.

– प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे, पुणे


Multi Language |Offline reading | PDF