गोवा पोलीस दलात ९६६ कर्मचार्‍यांची आवश्यकता ! – मुख्यमंत्री पर्रीकर

नवीन भरती करण्यासमवेत आहेत, ते पोलीस कार्यक्षमतेने काम करत आहेत का, हेही पहाणे आवश्यक !

पणजी, ३ ऑगस्ट – गोवा पोलीस दलात पोलीस कर्मचार्‍यांची कमतरता आहे. पोलीस दलात ९६६ कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे, अशी माहिती गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिली आहे. काँग्रेसचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी विचारलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री पर्रीकर यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री पर्रीकर पुढे म्हणाले, आतंकवादविरोधी पथकाला अजून ६०, कोकण रेल्वे महामंडळाशी निगडित पोलीस ठाण्याला ६८, कळंगुट पोलीस ठाण्यला ७८, पणजी पोलीस ठाण्याला ७३, म्हापसा पोलीस ठाण्याला ६४, वास्को येथील हार्बर पोलीस ठाण्याला ८० पोलीस कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे. पोलिसांच्या कमतरतेमुळे शहरी आणि समुद्रकिनारपट्टीतील पोलीस ठाण्याच्या विशेषत: पणजी आणि कळंगुट पोलीस ठाण्यांवर कामावर परिणाम होत आहे. पोलीस कर्मचार्‍यांची कमतरता भरून काढण्यासाठी शासनाने योग्य पावले उचलली आहेत.


Multi Language |Offline reading | PDF