३५ सहस्र कोटी रुपयांचा खाण घोटाळ्याचा आकडा चुकीचा असल्याचा शासनाचा दावा

पणजी, ३ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यातील वर्ष २००५ ते २०१२ या कालावधीत झालेल्या खाण घोटाळ्याचे अन्वेषण करणार्‍या शहा आयोगाने हा घोटाळा ३५ सहस्र कोटी रुपयांचा असल्याचे त्यांच्या अहवालात म्हटले होते; मात्र गोवा शासनाने या घोटाळ्याचा आकडा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी ३ ऑगस्ट या दिवशी गोवा विधानसभेत विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी विचारलेल्या एका लेखी प्रश्‍नाला उत्तर देतांना ही माहिती दिली. (७ वर्षांपूर्वी उघड झालेल्या घोटाळ्यातील रक्कमही अद्याप अंतिम झालेली नाही, तर घोटाळा करणार्‍या दोषींवर कारवाई कधी करणार ? एवढ्या मोठ्या रकमेचा भ्रष्टाचार उघड होऊनही अद्याप अन्वेषण पूर्ण न करणार्‍या प्रशासनाची कार्यक्षमता जाणा ! – संपादक)

मुख्यमंत्री पर्रीकर यांनी विधानसभेत सांगितले की, गोवा शासनाने खाण घोटाळा प्रकरणातील अन्वेषण अजूनही पूर्ण केलेले नाही. या घोटाळ्यातील गैरव्यवहारांसंदर्भात प्रत्येक प्रकरणाचे अन्वेषण केले जात आहे. कंट्रोलर ऑडिटर जनरल यांनी त्यांचा अहवाल तयार करतांना ८८ चालू असलेल्या खाणींचा विचार केलेला नाही. शहा आयोगाने शासनाला खाण घोटाळ्यामुळे किती हानी झाली याची पडताळणी करण्याचा आदेश दिला आहे. ही पडताळणी करतांना प्रत्येक खाण आणि अनधिकृत खाण व्यवसाय यांचा त्रिमितीय लेझर पद्धतीने उपकरणांचा वापर करणार आहे. (आता एवढ्या वर्षांनी सत्य माहिती मिळणार का ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF