असेही कौशल्य ! 

श्रद्धास्थानांतील प्रतिकांचे भंजन केल्याच्या प्रकरणी काही दिवसांपूर्वी फ्रान्सिस्को परेरा नावाच्या व्यक्तीला गोवा पोलिसांकडून अटक करण्यात आली. व्यवसायाने कार ड्रायव्हर असलेला परेरा तोडफोडीचे प्रकार रात्रीच्या वेळी करत असे. हे दुष्कृत्य करून तो येत असतांना रस्त्यात गस्तीवरील कोणी पोलीस व्यक्ती भेटली, तरी त्या पोलीस व्यक्तीला त्याच्या व्यवसायामुळे तसा काही संशय घेण्यासारखी स्थिती नव्हती, असे पोलीस आता सांगत आहेत. एकूणच परेरा याने मागील अनेक वर्षांत हे तोडफोडीचे कृत्य केलेले आहे, असा समज समाजात दृृढ झाला आहे. अशी ही माहिती समोर असतांना नऊ वर्षांपूर्वी मूर्तीभंजनाच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केलेला गोव्यातील बाळ्ळी येथील २२ वर्षीय तरुण कविश गोसावी डोळ्यांसमोर येतो. त्याच्यावर मूर्तीभंजनाचे जे आरोप ठेवण्यात आले होते, ते सर्व भंजनाचे प्रकार आपण केल्याचे परेरा आज सांगत आहे. म्हणजे नऊ वर्षांपूर्वी जी मूर्तीभंजनाची मालिका चालू होती, त्यात परेराचा सहभाग होता, असे आज म्हणता येते. पोलिसांनी त्याला आज अटक केली असून गोव्यात मागील दहा-बारा वर्षांपासून जो मूर्तीभंजनाचा प्रकार चालू आहे, त्यामागे परेराचाच हात आहे, असे गोमंतकियांना वाटू लागले आहे. याच पार्श्‍वभूमीवर कविश गोसावी याची आई प्रश्‍न विचारत आहे की, माझ्या मुलाच्या ऐन उमेदीच्या वयात आलेल्या वनवासाला उत्तरदायी कोण ? त्याची वाया गेलेली आयुष्यातील वर्षे कोण आणून देणार ? बाळ्ळी येथील हे गोसावी कुटुंब देवळाचे पुजारी आहे. कविश आणि त्याची आई यांच्याकडून आज जे ऐकायला येते, त्यावरून निरपराध्याला एखाद्या  प्रकरणात अडकवण्यासाठी काही अयोग्य आणि चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जातो. पोलिसांना काही धागेदोरे सापडले, तरी त्यातील सत्यता पडताळून पहाण्याचे कष्ट घेतले जात नाहीत. देवळात पूजा करणार्‍या कविशला प्रत्यक्ष मूर्तीची तोडफोड करण्याची बुद्धी होणारच कशी ? परंतु त्याने ते दुष्कृत्य केले, असे पोलिसांना वाटले. पोलिसांना असे वाटण्यामागे त्यांनी केलेल्या चुकीच्या पद्धतीचा अवलंब कारणीभूत आहे. एका कैद्याने सांगितले आणि पोलिसांनी त्यावर विश्‍वास ठेवला, असे झाले. कविशला त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला. तीन महिन्यांचा कारावास, नार्को चाचणी, थर्ड डिग्रीचा दणका यांमुळे कविशला अतीव मनस्ताप झाला. सगळे अवसान गळून पडल्यामुळे त्याची मानसिक स्थिती बिघडली. त्याच्यावर अत्याचाराचे आरोप लागल्याने नोकरी मिळेनासी झाली, चरितार्थासाठी काय करायचे अशी विवंचना पडली, समाजात स्थिर होण्याची संधी त्याला मिळेना वगैरे. त्याची ही स्थिती पाहूनच त्याची आई आज प्रश्‍न विचारत आहे की, निरपराध अशा माझ्या मुलाची झालेली आयुष्यातील हानी भरून कशी काढणार ?

निरपराध्यांचे भोग !

आरोप सिद्ध होण्यासाठी सबळ पुरावा उपलब्ध असावा लागतो, ही गोष्ट ठाऊक असूनही त्याकडे दुर्लक्ष का होते ? पुरावा असणे म्हणजे काय आणि तो नसणे म्हणजे काय ? हे तर पोलिसांना ठाऊक असतेच. तरीही निरपराधी पोलिसांच्या कह्यात जातात, त्यांचा छळ होतो, शारीरिक आणि मानसिक त्रास भोगून झाल्यावर एक दिवस न्यायालयाचा निर्णय येतो की, सबळ पुराव्यांच्या अभावी आरोपीची सुटका करण्यात येत आहे. अशा प्रसंगी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ठपका ठेवण्यात येतो. शेकडा ९० टक्के खटले तर अशाच कारणांनी निकालात काढले जातात. पोलिसांना ही गोष्ट ज्ञात असूनही अशाच प्रकारची प्रकरणे कशी न्यायालयात जातात ? पोलिसांना त्यांची कामगिरी उल्लेखनीय व्हावी, असे कधी वाटत नाही का ? आपल्या कामगिरीत संशयास्पद असे काही असू नये, गुन्ह्याच्या मुळाशी आपण गेले पाहिजे, निरपराधी व्यक्तीला त्रास होईल असे करणे हे पाप आहे, असे साधे विचार मनात येत नाहीत का ? कमल गोसावी ही माता आज टाहो फोडत आहे. मूर्तीभंजनाच्या गुन्ह्यातील खरा आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे आणि तिच्या मुलावर बसलेला गुन्हेगारीचा छाप खोटा ठरला आहे. त्या तरुणाने नाहक छळ सोसला. शिवाय लोकांचा त्याच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन मलीन झाला. समाजात तो बहिष्कृत ठरला. तरुण मुलाचे उद्ध्वस्त झालेले जीवन तिला पहावत नाही. वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होणारी वृत्ते पहाता अशा शेकडो माता देशात आहेत, ज्या न्यायासाठी लढत आहेत. येथेच पोलिसांच्या विचार क्षमतेची खरी कसोटी आहे. आपल्या कार्यपद्धतीमध्ये होत असलेली चूक सुधारण्याची हीच वेळ आहे, असे पोलिसांनी लक्षात घ्यायला हवे. एखाद्याला आरोपी ठरवतांना सबळ पुरावे आहेत का ? ज्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवतो, त्या व्यक्तीची विश्‍वासार्हता काय ? इत्यादी गोष्टी सतर्कतेने पहायला हव्यात. निष्पाप व्यक्तीला त्रास होईल, असे आपल्या हातून काही घडत नाही ना, याची खात्री केली पाहिजे. हे सर्व लक्षात येण्यासाठी धर्माचरणच आवश्यक आहे. समष्टीमध्ये सेवा करतांना इतरांचाच विचार अधिक असल्याने धर्माचरणातून मार्ग सापडतो. पोलिसांच्या सेवेचे स्वरूप हे समष्टी प्रकारचे असते. समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कार्यरत असतात. ही सेवा करतांना निरपराध्यांची हानी होत नाही ना, याची काळजी पोलिसांनी घ्यायला हवी. कविश गोसावी हा जसा संशयाचा बळी ठरला, तसा प्रसंग दुसर्‍या कोणावर येऊ नये, हे पहाणे आता पोलिसांचे कौशल्यच आहे.


Multi Language |Offline reading | PDF