गोवा शासन शहरातील मद्यालये वाचवण्यासाठी राज्य महामार्ग कायद्यात पालट करणार

  • शासन मद्यालयांना पाठीशी घालून काय साध्य करू पहात आहे ?
  • मद्यालये वाचवण्यासाठी होतात, तेवढे प्रयत्न बंद पडणार्‍या शाळा वाचवण्यासाठी होतात का ?

पणजी, २ ऑगस्ट (वार्ता.) – गोवा शासन शहरातील मद्यालये वाचवण्यासाठी राज्य महामार्ग कायद्यात पालट करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत १ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी उशिरा अबकारी, वित्त आणि इतर खात्यांच्या अनुदानित मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना दिली. कायद्यात पालट केल्याने यापुढे महामार्ग शहराला प्रारंभ होतो, तेथे संपणार आहे आणि तो शहर संपल्यानंतर पुन्हा चालू होणार आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे बंद पडलेली शहरातील मद्यालये चालू होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने गतवर्षी राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग यांच्या बाजूंची ५०० मीटर अंतरातील मद्यालये बंद करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर न्यायालयाने या आदेशात पालट करून २० सहस्र लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांना दिलासा देतांना वरील अंतर घटवून ते २२० मीटर केले होते.

मुख्यमंत्री पर्रीकर पुढे म्हणाले, राज्य महामार्ग कायद्यात पालट केल्याने फोंडा, कुडचडे, सांगे, डिचोली आणि इतर शहरांतील मद्यालये वाचणार आहेत. शासनाने यापूर्वी ज्या शहरांसाठी बगलमार्ग आहेत, त्या शहरातील काही महामार्गांचा राज्य महामार्ग दर्जा काढला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मद्यालये बंद पडल्याने शासनाचा ७ कोटी रुपये महसूल बुडाला आहे.


Multi Language |Offline reading | PDF