आज धर्म-अधर्मच्या दृष्टीने ध्रुवीकरणाची आवश्यकता ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

श्रीमद् श्रीउपेन्द्रमोहनजी यांचा १४५ वा जन्म महोत्सव

मार्गदर्शन करतांना सदगुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

कोलकाता, २ ऑगस्ट (वार्ता.) –  महाभारतात युद्धाच्या वेळी अर्जुनाच्या समोर त्याचे नातेवाइक होते. त्यांच्याबरोबर युद्ध करणार नाही, असे त्याने सांगितले. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला गीताज्ञान देऊन शास्त्र सांगितले. कुटुंब, आपला-परका, भावना यांच्या पुढे जाऊन आपल्याला केवळ धर्म आणि अधर्म यांचाच विचार केला पाहिजे. कोण धर्माच्या आणि कोण अधर्माच्या बाजूने आहे, हे पहायला हवे. आजच्या परिस्थितीमध्ये धर्म-अधर्म यांच्या दृष्टीने ध्रुवीकरणाची आवश्यकता आहे. आपल्याला व्यक्ती, जात, भाषा, प्रांत विसरून धर्मासाठी संघटित व्हावे लागेल, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथे केले. ते शास्त्र धर्म प्रचार सभेद्वारे कोलकाताच्या चौरंगी येथील आश्रमामध्ये श्रीमद् श्रीउपेन्द्रमोहनजी यांचा १४५ वा जन्म महोत्सव साजरा करण्यात आला त्या वेळी बोलत होते. २४ ते ३१ जुलै या कालावधीत हा महोत्सव साजरा करण्यात आला. यात प्रत्येक दिवस विविध विषयांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांना प्रतिदिन अनुमाने २०० जिज्ञासू उपस्थित होते.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे पुढे म्हणाले, जर सूर्य धर्म आहे, तर त्याची किरणे शास्त्र आहेत. धर्माच्या मार्गावर जे यम-नियम आदी आम्हाला धर्म प्राप्त करून देतात, ते धर्मशास्त्र होय ! त्या किरणांच्या माध्यमातून आपण परमेश्‍वर अर्थात् सूर्यापर्यंत जाऊ शकतो आणि ते म्हणजे शास्त्रधर्म ! हेच कार्य शास्त्र धर्म प्रचार सभा करत आहे. गीतेमध्ये सांगितले आहे की, स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः । म्हणजे स्वधर्माचे पालन करत असतांना मरण आले, तरी श्रेयस्कर ! (कोणत्याही कारणामुळे परधर्माचे आचरण करू नये;) कारण परधर्म भीतीदायक आहे. आई-वडिलांची सेवा करणे धर्म आहे; परंतु गीतेमध्ये त्यापुढे म्हटले आहे की, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज । म्हणजे सर्व कर्तव्यकर्मे सोडून मला एकट्याला (भगवान श्रीकृष्णाला) शरण ये ! जेव्हा राष्ट्र आणि धर्म यांच्यावर संकट येते, तेव्हा सर्व व्यक्तिगत धर्मांच्या पुढे जाऊन राष्ट्रधर्माचे पालन केेले पाहिजे. कारण राष्ट्र वाचला तरच आपण आणि आपले कुटुंब वाचेल.

सद्गुरु (डॉ.) पिंगळे पुढे म्हणाले की, भगवान परशुराम हे अग्रतश्‍चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः । इदं ब्राह्ममिदं क्षात्रं शापादपि शरादपि ॥ म्हणजे मुखात चार वेद आहेत आणि पाठीवर बाणांसह धनुष्य आहे, म्हणजे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही आहेत. असा भगवान परशुराम शाप देऊन किंवा बाणांनी दुर्जनांचा नाश करील. असे होते. भगवान परशुराम प्रथम नम्रतेने शास्त्र समजावून, न समजून घेतल्यास शाप देऊन, नाही तर शस्त्रांद्वारे प्रतिकार करत होते.

हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल यांनी वर्तमानात कोणत्या साधनेची आवश्यकता आहे, याविषयी सांगितले.

सनातनचे साधक निःस्वार्थ भावाने देशभरात ईश्‍वरीय कार्य करतात ! – श्री. जय नारायण सेन

शास्त्र धर्माचे महत्त्व या विषयावरील कार्यक्रमात श्री. जय नारायण सेन म्हणाले, देवाचे कार्य करतांना त्यागाची आवश्यकता आहे. आपल्या सुख-सुविधेचा विचार केल्याने ते होणार नाही. सनातनचे सर्व साधक ईश्‍वरीय कार्यासाठी निःस्वार्थ भावाने देशभरात मोठे कार्य करत आहेत. सनातन संस्था आणि शास्त्र धर्म प्रचार सभा यांच्यात आंतरिक संबंध आहे.

गुरुकार्याचे व्यापकत्व !

शास्त्र धर्म प्रचार सभेचे डॉ. कौशिक चन्द्र मल्लिक म्हणाले, गुरूंसाठी  समर्पित होऊन कार्य करण्यालाही महत्त्व आहे. यावर्षी सनातन संस्थेने १०१ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला. यातील काही ठिकाणी शास्त्र धर्म प्रसार सभेकडून आम्ही सहभागी झालो होतो. हे गुरुकार्याचे व्यापकत्व आहे.


Multi Language |Offline reading | PDF