(म्हणे) बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी खटला चालू असलेल्या नेत्यांचा पाठ्यपुस्तकात उल्लेख करणार का ?

• विधान परिषदेत विरोधकांचा शासनाला प्रश्‍न

• इयत्ता नववीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण छापल्याचा आरोप करत विरोधकांचा सभागृहात गोंधळ

अधिवेशन विशेष

तत्कालीन काँग्रेस शासनाच्या काळात एन्सीईआर्टीच्या पाठ्यपुस्तकात जागोजागी हिंदुद्वेषी, तसेच राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा अवमान करणारा अन् मोगलांचे मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण करणारा अतिशय खोटा इतिहास देण्यात आला आहे. त्याविषयी एकाही काँग्रेस नेत्याने कधी ब्रही काढला नाही !

मुंबई, २ ऑगस्ट (वार्ता.) – इयत्ता नववीच्या राज्यशास्त्र आणि इतिहासच्या पाठ्यपुस्तकातील भारत : १९६० नंतरच्या घडामोडी या दुसर्‍या प्रकरणामध्ये देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषित केलेली आणीबाणी अन् राजीव गांधी पंतप्रधान असतांना बोफोर्स तोफांच्या खरेदीत झालेला भ्रष्टाचार यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या उल्लेखावर आक्षेप घेत १ ऑगस्टला विधान परिषदेच्या सभागृहात विरोधकांनी गोंधळ घालत काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यावर न्यायालयात खटला चालू आहे, याचा उल्लेख पाठ्यपुस्तकात करणार का ? असा प्रश्‍न सभागृहात उपस्थित केला. या वेळी आक्षेपार्ह लिखाण पाठ्यपुस्तकातून वगळण्याची मागणी करत विरोधकांनी सभागृहात शासनाच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या. या प्रकरणी विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे प्रथम १५ मिनिटे आणि नंतर १० मिनिटे, असे २ वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.

(म्हणे) गांधी यांच्याप्रमाणे देशासाठी आहुती देणारा एकतरी नेता तुमच्याकडे आहे का ? – विरोधकांचा सत्ताधार्‍यांना प्रश्‍न

गांधी घराण्याने देशासाठी ३ पिढ्या दिल्या. देश घडवण्यामध्ये गांधी-नेहरू यांचे योगदान मोठे आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकतेसाठी प्राणांची आहुती दिली. गांधी यांच्याप्रमाणे देशासाठी आहुती देणारा एकतरी असा एकतरी नेता तुमच्याकडे आहे का ?, असा प्रश्‍न काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी सत्ताधार्‍यांना केला. (लाखो क्रांतीकारकांनी त्यांच्या प्राणांचे बलीदान दिले. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. उलट गांधींमुळे देशाची फाळणी झाली. फाळणीच्या वेळी धर्मांधांकडून १० लाखांहून अधिक हिंदूंच्या कत्तली झाल्या, याविषयी काँग्रेसवाले कधी बोलतात का ? – संपादक)

या वेळी विरोधकांनी मांडलेली सूत्रे

१. पाठ्यपुस्तकात इंदिरा गांधी यांचा इतिहास देण्यासाठी केवळ ३ परिच्छेद देणार्‍या शासनाला याची लाज वाटली पाहिजे.

२. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण छापून शासन भावी पिढीसमोर चुकीचा इतिहास ठेवून ब्रेन वॉश करत आहे.

३. बोफोर्स प्रकरणात कोणत्याही न्यायालयाने राजीव गांधी यांना दोषी ठरवलेले नाही.

४. नेहरू-गांधी यांच्यावर आरोप करण्याची फॅशन झाली आहे.

५. शासन स्वच्छता अभियानासाठी गांधीच्या चष्म्याचे चित्र वापरते; मात्र शासनाचे दृष्टीकोन नथुराम गोडसेचे असतात.

विरोधकांच्या वतीने सभागृह नियम २८९ अन्वये या विषयावर स्थगन प्रस्ताव सादर केला होता. याविषयी काँग्रेसचे आमदार संजय दत्त, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, आमदार भाई जगताप, आमदार कपिल पाटील यांच्यासह अन्य आमदारांनी सभागृहात मत व्यक्त केले.

अभ्यास मंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करणार नाही ! – शिक्षणमंत्री विनोद तावडे

१. हा घटनाक्रम कोणत्याही राजकीय हेतूने देण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासानंतरच्या पुढच्या कालखंडाची माहिती देण्यासाठी या पाठ्यपुस्तकात वर्ष २००० पर्यंतचा इतिहास देण्यात आला आहे.

२. याविषयी अभ्यासक्रम निश्‍चित करण्याचा अधिकार अभ्यास मंडळाला आहे. त्यामुळे मी हस्तक्षेप करणार नाही. यामध्ये कोणत्या नेत्यांची अपकीर्ती झाली आहे, असे वाटत असेल, तर याविषयी सभागृहाच्या भावना मी अभ्यास मंडळाला कळवीन.

३. राजीव गांधी यांनी भ्रष्टाचार केला, असा कोणताही उल्लेख पाठ्यपुस्तकात नाही.

पाठ्यपुस्तकात ज्या वस्तूनिष्ठ इतिहासावर विरोधकांनी आक्षेप घेतला, ते लिखाण पुढीलप्रमाणे…

वर्ष १९७४ मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी निवडणुकीच्या प्रचारात शासकीय यंत्रणेचा अपवापर केल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिला. या विरोधात देशव्यापी संप आणि निषेध झाला. याच काळात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली. देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली अन् शासनाने संविधानातील आणीबाणीविषयक तरतुदींच्या आधारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित करण्यात आले. आणीबाणीमुळे भारतीय प्रशासन व्यवस्थेत शिस्त आली, परंतु त्याचसह मानवी हक्कांचीही पायमल्ली झाली.

आक्षेप घेतलेला बोफोर्सचा उल्लेख

संरक्षण सामग्री आणि विशेषत: बोफोर्स कंपनीकडून लांब पल्ल्याच्या तोफा खरेदी संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांच्याबरीच टीका झाली. राजकीय भ्रष्टाचार हा या काळातील निवडणुकांचा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आणि या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now