५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पनवेल (जिल्हा रायगड) येथील चि. भार्गवी अजय खोत (वय १ वर्ष) !

वैशाख कृष्‍ण षष्‍ठी (११.५.२०२३) या दिवशी चि. भार्गवी अजय खोत हिचा प्रथम वाढदिवस आहे. त्‍या निमित्त तिच्‍या आईला तिच्‍या जन्‍मापूर्वी आणि आई-वडिलांना तिच्‍या जन्‍मानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

चि. भार्गवी अजय खोत

चि. भार्गवी अजय खोत हिला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. जन्‍मापूर्वी

१ अ. खोकला होणे, खोकला आल्‍यावर रक्‍तस्राव होणे आणि सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्‍यावर खोकला थांबून रक्‍तस्राव न्‍यून होणे : ‘मला गर्भधारणा झाल्‍याचे समजल्‍यावर १० दिवस पुष्‍कळ खोकला झाला होता. खोकला आल्‍यावर मला रक्‍तस्राव होत असे. त्‍यामुळे मी घाबरले होते. मी देवाला प्रार्थना केली, ‘हे देवा, तुम्‍हीच हे बाळ दिले आहे. तुम्‍ही त्‍याचे जन्‍मदाते आहात. तुम्‍हीच बाळाची काळजी घ्‍या.’ मी सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्‍यावर माझा खोकला थांबला आणि मला होत असलेल्‍या रक्‍तस्रावाचे प्रमाण न्‍यून झाले.

सौ. गिरिजा खोत

१ आ. रक्‍तस्राव होत असल्‍याने आधुनिक वैद्यांनी विश्रांती घ्‍यायला सांगणे आणि नामजपादी उपाय केल्‍यानंतर सोनोग्राफीचा अहवाल पाहून त्‍यांनी ‘काळजीचे कारण नाही’, असे सांगणे : मला पाचव्‍या मासात रक्‍तस्राव होत होता. तेव्‍हा आधुनिक वैद्यांनी मला रुणालयात भरती व्‍हायला सांगितले आणि ‘बेडरेस्‍ट’ (झोपून विश्रांती) घ्‍यायला सांगितली. तेव्‍हा मी देवाला प्रार्थना केली. माझे यजमान आणि सासू-सासरे यांनी मला धीर दिला. मी कार्यालयात न जाता घरी राहून विश्रांती घेतली. मी घरी राहून ‘नामजपादी उपाय करणे, स्‍तोत्रे म्‍हणणे, सात्त्विक उदबत्तीने आवरण काढणे आणि पोटावर हात ठेवून नामजप करणे’, असे करत होते. मी एक आठवड्यानंतर सोनोग्राफी (टीप) करण्‍यासाठी गेले. सोनोग्राफीचा अहवाल पाहून आधुनिक वैद्य म्‍हणाले, ‘‘काळजी करण्‍याचे कारण नाही. सर्व व्‍यवस्‍थित आहे.’’

टीप – सोनोग्राफी : विशिष्‍ट ध्‍वनीलहरींच्‍या साहाय्‍याने पोटातील अवयवांची चित्रे घेण्‍याची चाचणी.

१ इ. नामजपादी उपाय आणि भावजागृतीचे प्रयोग करणे : सातव्‍या मासापासून मी नामजपादी उपाय आणि भावजागृतीचे प्रयोग करत होते, उदा. मोरपिसाने आवरण काढणे, मानस दृष्‍ट काढणे. ‘हनुमान माझी आणि बाळाची मानस दृष्‍ट काढत आहे’, असा भावजागृतीचा प्रयोग मी करत असे.

१ ई. गर्भाच्‍या हालचालीमुळे पहाटे जाग येऊन सामूहिक नामजपात सहभागी होता येणे : जेव्‍हापासून मला पोटातील बाळाची हालचाल जाणवायला लागली, तेव्‍हापासून मला पहाटे ४ ते ५.३० वाजण्‍याच्‍या दरम्‍यान जाग यायची. बाळ मला पहाटे ५.३० वाजता सामूहिक नामजपात सहभागी होण्‍यासाठी उठवत होते. या आधी मी कधीच पहाटे नामजप करण्‍यासाठी उठले नव्‍हते आणि उठले, तरी मला झोप अनावर होत असे. ‘बाळ माझ्‍याकडून नामजप करून घेत आहे’, असे मला जाणवत असेे.

१ उ. भक्‍तीसत्‍संग ऐकतांना मला पोटातील बाळाची हालचाल जाणवत असे. जणूकाही ‘तेही प्रतिसाद देत आहेत’, असे मला जाणवत असे.

१ ऊ. पोटातील बाळाला देवाला प्रार्थना करायला सांगितल्‍यावर ‘ते हात जोडत आहे’, असे जाणवणे : मी सात्त्विक उदबत्तीने आवरण काढतांना पोटातील बाळाला सांगायचे, ‘बाळा, तू देवाला प्रार्थना कर, ‘हे देवा, तूच माझ्‍याकडून आवरण काढून घे. माझ्‍याभोवती संरक्षककवच निर्माण कर.’ त्‍या वेळी मला पोटात हालचाल जाणवायची. तेव्‍हा ‘बाळ हात जोडत आहे’, असे मला जाणवायचेे.

१ ए. धार्मिक आणि आध्‍यात्मिक ग्रंथ वाचणे : गरोदरपणात मी गुरुचरित्र, बोधकथा, श्रीमद़्‍भगवद़्‍गीता आणि ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांनी उलगडलेली वैशिष्‍ट्ये’ हे ग्रंथ वाचत होते. ‘सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांचे साधनापूर्व जीवन आणि साधनाप्रवास’ हा ग्रंथ सतत वाचावा’, असे मला वाटत होते. तो ग्रंथ मी मन लावून वाचला.

२. जन्‍मानंतर  

अ. पू. (सौ.) अश्‍विनी पवार (सनातनच्‍या ६९ व्‍या संत, वय ३३ वर्षे) यांनी बालिकेला पाळण्‍यात ठेवतांना म्‍हटले, ‘‘परम पूज्‍यांची भार्गवी !’’ तेव्‍हा माझी भावजागृती झाली.

आ. तिचे पालनपोषण करतांना ‘भार्गवी प.पू. गुरुदेवांचीच आहे. आम्‍ही केवळ निमित्तमात्र आहोत’, असे मला वाटते.’

– सौ. गिरिजा अजय खोत (चि. भार्गवीची आई), खांदा कॉलनी, पनवेल, जिल्‍हा रायगड.

३. जन्‍म ते ३ मास 

३ अ. भार्गवीला घेऊन चारचाकी गाडीने प्रवास करतांना वाटेत चारचाकी गाडीतील पाईप निघणे आणि त्‍या स्‍थितीतही गाडीने ५ कि.मी. अंतर पार करणे : ‘भार्गवी १५ दिवसांची असतांना आम्‍ही तिला घेऊन चारचाकी गाडीतून तिच्‍या आजोळी दापोली (जिल्‍हा रत्नागिरी) येथे जात होतो. काही अंतर गेल्‍यावर आम्‍ही अल्‍पाहार करण्‍यासाठी थांबलो. तेव्‍हा वाहनचालकाने गाडी उघडून पाहिली. त्‍या वेळी त्‍याच्‍या लक्षात आले, ‘गाडीतील एक पाईप निघाला आहे. गाडी बंद पडू शकते.’ तेव्‍हा आम्‍हाला प्रश्‍न पडला, ‘आता पुढे कसे जाणार ?’ त्‍या वेळी वाहनचालकाने तो पाईप ‘प्‍लास्‍टिक’ लावून तात्‍पुरता बसवला. आम्‍ही चारचाकी गाडीतून तसेच पुढे गेलो. आम्‍ही एका ‘गॅरेज’जवळ चारचाकी गाडी थांबवली. तेथील मेकॅनिक म्‍हणाला, ‘‘या स्‍थितीत चारचाकी गाडीने ५ कि.मी. अंतर पार करून कसे आलात ?’’ तेव्‍हा मला वाटले, ‘प.पू. गुरुदेवांनीच भार्गवीची काळजी घेतली.’ आमच्‍यासाठी ही मोठी अनुभूतीच होती.’ – श्री. अजय बळवंत खोत (चि. भार्गवीचे वडील), खांदा कॉलनी, पनवेल, जिल्‍हा रायगड.

३ आ. ‘भार्गवी पहाटे ५.३० वाजता सामूहिक नामजपाच्‍या वेळी नियमितपणे उठायची आणि नामजप झाल्‍यावर झोपायची.

३ इ. नामजपादी उपाय केल्‍यावर भार्गवीचे रडणे थांबणे : भार्गवी रात्री रडत असे. तेव्‍हा दापोली येथील एका साधकाने सांगितले, ‘‘तिच्‍याभोवती रिकामी खोकी ठेवा आणि तिच्‍या पोटाला कापूर अन् गोमूत्र लावा.’’ आम्‍ही त्‍याप्रमाणे केल्‍यावर, तसेच दत्ताचा नामजप केल्‍यावर तिचे रडणे थांबायचे. (‘व्‍यक्‍तीभोवती रिकामे खोके ठेवल्‍याने तिच्‍यावर आकाशतत्त्वाचे उपाय होतात.’ – संकलक)

३ ई. भजनांची आवड : प.पू. भक्‍तराज महाराज यांची भजने लावल्‍यावर ती शांतपणे ऐकत असे. तेव्‍हा ‘ती भावावस्‍थेत आहे’, असे मला वाटायचे. त्‍या वेळी तिच्‍या चेहर्‍यावरचे हावभाव पाहून आमची भावजागृती व्‍हायची.

४. वय ४ ते ७ मास 

अ. भार्गवीचे डोळे बोलके आहेत.

आ. प.पू. गुरुदेवांचे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे) छायाचित्र असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ तिच्‍यासमोर ठेवल्‍यावर ती त्‍यांच्‍याशी बोलण्‍याचा प्रयत्न करत असे. जणूकाही ‘ती त्‍यांना आधीपासूनच ओळखत आहे’, असे मला वाटत असेे.

इ. तिला श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची छायाचित्रे दाखवल्‍यावर ती त्‍यांच्‍या छायाचित्रांकडे झेप घेत असे.

ई. ती ‘सनातन पंचांगा’मधील दत्तगुरु आणि गणपति यांची चित्रे पाहून हसत असे.

उ. ती आनंदाने कापूर आणि अत्तर लावून घेते. तिला कापराचा सुगंध आवडतो.

५. वय ८ मास ते १ वर्ष

अ. तिला ‘कृष्‍णबाप्‍पा कुठे आहे ?’, असे विचारल्‍यास ती लगेचच घरी असणार्‍या कृष्‍णाच्‍या मोठ्या चित्राकडे बघते.

आ. कधी कधी ती भ्रमणभाषवरील परम पूज्‍यांच्‍या चित्रावर डोके टेकवते.

६. स्‍वभावदोष : हट्टीपणा आणि मनाप्रमाणे न झाल्‍यास राग येणे.

‘हे गुरुमाऊली, ‘तुमच्‍याच कृपाशीर्वादाने हा जीव आमच्‍या पोटी जन्‍माला आला’, त्‍याबद्दल आम्‍ही आपल्‍या चरणी कृतज्ञ आहोत. भार्गवी ही तुमचीच मुलगी आहे. तुम्‍हीच तिचे पालन करत आहात. ‘तिच्‍या माध्‍यमातून तुम्‍हीच आमच्‍याकडून साधना करून घ्‍या आणि भार्गवीला तुमच्‍या चरणांशी एकरूप करून घ्‍या’, अशी आपल्‍या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. गिरिजा अजय खोत (चि. भार्गवीची आई), खांदा कॉलनी, पनवेल, जिल्‍हा रायगड. (२४.३.२०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक