गाझीपूर (उत्तरप्रदेश) मध्ये चोरांच्या आक्रमणात महंतांचा मृत्यू

अष्टधातू, तसेच चांदी यांच्या मूर्ती घेऊन चोर पसार

उत्तरप्रदेशमध्ये मंदिरे असुरक्षित ! एक महंत राज्याची धुरा सांभाळत असतांना मंदिरांवरच दरोडे पडत असतील, तर जनतेने कोणाकडे पहायचे ?

गाझीपूर (उत्तरप्रदेश) – महंमदाबाद तालुक्यातील माढुपूर येथील मठातील मूर्ती चोरणार्‍या चोरांनी मठाचे महंत विजय राघव दास यांना लाठाकाठ्यांनी गंभीर मारहाण केली होती. या मारहाणीत घायाळ झालेले महंत दास यांनी वाराणसी ट्रॉमा सेंटरमध्ये ५ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शेवटचा श्‍वास घेतला. घटनेनंतर ५ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र मूर्ती, तसेच चोर यांचा सुगावा लावण्यास पोलीस असमर्थ ठरले आहेत.

या मठात रामजानकीच्या अष्टधातूच्या मूर्तींसह लक्ष्मण, हनुमान यांच्या चांदीच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली होती. अयोध्येशी संबंधित मठाचे महंत विजय राघव दास या मठाची देखभाल करायचे. घटनेच्या रात्री चोर मठातील मूर्ती चोरून नेत असतांना त्याला महंत दास यांनी विरोध केला. त्यामुळे चोरांनी दास यांना लाठीकाठ्यांनी मारहाण केली आणि  अष्टधातूच्या मूर्तींसह चांदीच्या मूर्ती घेऊन पसार झाले. या घटनेनंतर ग्रामस्थांनी  घायाळ दास यांना वाराणसी येथील ट्रामा सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल केले होते.


Multi Language |Offline reading | PDF