धर्मशास्त्रसंमत आदर्श गणेशोत्सव होण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर आणि आयुक्त यांचा सकारात्मक प्रतिसाद

शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याचे आश्‍वासन

उपमहापौर सौ. शैलजा मोरे (उजवीकडून तिसर्‍या) निवेदन स्वीकारतांना

पिंपरी, १ ऑगस्ट (वार्ता.) – गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा व्हावा, उत्सवामध्ये शिरलेले अपप्रकार बंद व्हावेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतीवर्षी मोहीम राबवली जाते. यंदाच्या वर्षीही आदर्श गणेशोत्सव मोहिमेच्या अंतर्गत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर श्री. नितीन काळजे, आयुक्त श्री. श्रवण हर्डीकर, उपमहापौर सौ. शैलजा मोरे, नगरसेवक श्री. एकनाथ पवार यांची २६ जुलैला भेट घेण्यात आली. या वेळी सर्वांनी कृत्रिम हौदातील गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या वेळी धर्मभावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी उपाययोजना करण्याचे, तसेच गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा होण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. निवेदन देण्यासाठी अधिवक्ता मंगेश पवार, हिंदु स्वाभिमान प्रतिष्ठानचे श्री. उत्तम दंडिमे, पर्यावरणाचे अभ्यासक श्री. विकास भिसे, अखिल पिंपरी-चिंचवड शिवजयंती महोत्सव समितीचे श्री. उमेश पवार, शंकर महाराजांचे अनुनायी डॉ. अविनाश वैद्य, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांच्यासह हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते.

महापौर श्री. नितीन काळजे (क्रमांक १) निवेदन स्वीकारतांना

१. बहुतांश वेळी कथित पर्यावरणवाद्यांकडून जलप्रदूषणाचा बागुलबुवा निर्माण करत भाविकांची दिशाभूल करत त्यांना कृत्रिम हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची सक्ती केली जाते. पुढे पालिका-प्रशासन यांच्याकडूनही हौदात विसर्जित झालेल्या गणेशमूर्तींची धर्मभावना दुखावतील, अशा पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे यंदाच्या वर्षी कृत्रिम हौद उभारलेच जाऊ नयेत आणि गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यास प्रोत्साहन दिले जावे. त्यासाठी नदीला अतिरिक्त पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक यांनी केली आहे.

२. यासंदर्भात महापौर श्री. नितीन काळजे म्हणाले, कृत्रिम हौद बांधले जाऊ नयेत, या संदर्भात निवेदन दिले, तर त्यासंदर्भात मी बोलून घेईन. हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी गणेशोत्सवाच्या विषयी पालिका स्तरावर नेमण्यात येणार्‍या समितीमध्ये धर्मप्रेमी आणि भाविक यांना समाविष्ट करण्याची सूचना केल्यावर त्यांनी लगेचच त्यांच्या स्वीय साहाय्यकांना या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

३. उपमहापौर सौ. शैलजा मोरे यांनीही सर्व सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. त्या वेळी तेथे नगरसेविका सौ. झामाबाई बारणे, सौ. अनुराधा गोरखे, सौ. कमल घोलप, सौ. शर्मिला बाबर या उपस्थित होत्या. त्यांनी शाडूच्या मातीचीच गणेशमूर्ती घेऊन त्याचे वहात्या पाण्यातच विसर्जन करणार असल्याचे सांगितले. कृत्रिम हौदाच्या संकल्पनेचे तोटे सांगतांना हौदातील गणेशमूर्ती कचर्‍याच्या गाडीतून नेल्या गेल्या होत्या, ही वस्तूस्थितीही नगरसेविकांनी महापौरांना सांगितली.

४. भाजपचे नगरसेवक श्री. एकनाथ पवार यांनीही महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांच्या होणार्‍या बैठकीत समितीच्या कार्यकर्त्यांना बोलावण्याचे आश्‍वासन देऊन तेथे प्रबोधनाची सर्व सूत्रे सांगण्यास सांगितले. महापौर आणि आयुक्त यांच्या भेटीसाठी त्यांनी भाजपचे नगरसेवक श्री. नामदेव ढाके यांनाही जोडून दिले. आयुक्त आणि महापौर यांना निवेदन देतांना श्री. ढाकेही शिष्टमंडळामध्ये सहभागी होते.

शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीचा प्रसार करू ! – श्री. श्रवण हर्डीकर

आयुक्त श्री. श्रवण हर्डीकर (उजवीकडे) यांना निवेदन देतांना कार्यकर्ते

महानगरपालिकेचे आयुक्त श्री. श्रवण हर्डीकर म्हणाले, गणेशमूर्ती शाडू मातीचीच असावी आणि तिचे वहात्या पाण्यातच विसर्जन व्हायला हवे. शाडू मातीच्या मूर्ती अधिकाधिक प्रमाणात वितरित व्हाव्यात, यासाठी एक कक्ष उपलब्ध करून देऊ. आपण मूर्ती लहान घेऊ आणि भक्ती मोठी करू. शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती घरोघरी बनवल्या जाव्यात. पालिका प्रशासनाच्या वतीने हौदात विसर्जित केल्या जाणार्‍या पीओपीच्या गणेशमूर्तींचा अवमान होणार नाही आणि कुणाच्याही धर्मभावना दुखावल्या जाणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल. पर्यावरणही जपले जाईल आणि धर्मभावनाही जपल्या जातील. हौदातील गणेशमूर्तींचे विधिवत् पूजन करून विसर्जन केले जाईल. याविषयी काही संकल्पना असल्यास सुचवाव्यात. हौदातील गणेशमूर्तींचे कुठे विसर्जन करायचे, तेही सुचवा. सर्वांच्या सहकार्याने आपण चांगला गणेशोत्सव साजरा करू. पालिकेच्या वतीने तुम्हाला आवश्यक ते सहकार्य केले जाईल.


Multi Language |Offline reading | PDF