प.पू. दास महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांना सौ. अश्‍विनी अतुल पवार संतपदी विराजमान होण्याविषयी जाणवलेली सूत्रे

पू. (सौ.) अश्‍विनी अतुल पवार

१. सौ. अश्‍विनी पवार रामनाथी आश्रमात असतांना त्यांचा सेवाभाव पाहून त्या शीघ्र आध्यात्मिक उन्नती करतील, अशी निश्‍चिती होणे

९.७.२०१७ या गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी सौ. अश्‍विनी पवार सद्गुरुपदी विराजमान झाल्याची शुभवार्ता ऐकून आम्हा उभयतांना अत्यानंद झाला. आम्ही पू. (सौ.) अश्‍विनीताई यांना त्यांच्या वयाच्या १३ व्या वर्षांपासून ओळखतो. त्या रामनाथी आश्रमात असतांना त्यांचा सेवाभाव पाहून त्या शीघ्र आध्यात्मिक उन्नती करतील, अशी आमची निश्‍चिती झाली होती.

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक

२. अश्‍विनीताई संत घोषित होण्याच्या १५ दिवस आधी त्यांची संतपदाकडे वाटचाल चालू आहे, असे जाणवणे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे पू. (सौ.) माईंना स्वप्नदृष्टांताद्वारे अश्‍विनीताई संत झाल्या आहेत, असे दिसणे

अश्‍विनीताई संत घोषित होण्याच्या १५ दिवस आधी त्यांची देवद आश्रमात भेट झाली होती. माझे मौनव्रत सफल झाल्यानंतर प.पू. पांडे महाराज यांची कृतज्ञतापूर्वक भेट घेण्यासाठी आम्ही उभयतां २३.६.२०१७ या दिवशी देवद आश्रमात गेलो होतो. आम्ही तेथे २ दिवस वास्तव्य केले. या काळात अश्‍विनीताई आमची व्यवस्था करत होत्या. त्या वेळी त्यांच्या तोंडवळ्यावरील निरागस भाव, नियोजनकौशल्य, सेवेची तळमळ, विनयशील बोलणे, प्रत्येक गोष्ट विचारून करणे आदी गुणांचे आम्हाला दर्शन झाले. त्याच वेळी अश्‍विनीताईंची संतपदाकडे वाटचाल चालू आहे, असे विचार माझ्या मनात तीव्रतेने आले. ९.७.२०१७ या गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे पू. (सौ.) माईंना स्वप्नदृष्टांताद्वारे अश्‍विनीताई संत झाल्या आहेत, असे दिसले होते. दुपारी स्वप्नदृष्टांत सत्यात उतरल्याचे लक्षात आले.

३. पू. (सौ.) अश्‍विनीताई संत होण्यात त्यांचे पती श्री. अतुल यांचा मोलाचा सहभाग असणे

पू. (सौ.) अश्‍विनीताईंचे पती श्री. अतुल यांचा त्यागही फार मोठा आहे. दोघेही तरुण आहेत. त्यांचे लग्न होऊन फार काळ लोटला नाही, तरीही वैवाहिक सुखाचा त्याग करून, ब्रह्मचर्याचे पालन करून त्यांनी संतांची मनापासून सेवा केली. लक्ष्मणाने १४ वर्षे वैवाहिक जीवनाचा त्याग करून श्रीरामाची सेवा केली, त्याचप्रमाणे श्री. अतुल गेली सव्वातीन वर्षे व्रतस्थ राहून योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांची सेवा करत आहेत. पत्नीला देवद आश्रमात सेवेला पाठवून ते योगतज्ञ दादाजींची मनापासून सेवा करत आहेत. हे फारच कौतुकास्पद आहे. त्यांच्या पत्नीने, म्हणजेच पू. (सौ.) अश्‍विनीताईंनी प.पू. पांडे महाराजांच्या सान्निध्यात सेवा करून लहान वयात संतपद गाठले. पुढे लवकरच त्या सद्गुरुपदी आरूढ होतील.

४. साधकांनी पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्यातील गुण आत्मसात करून आध्यात्मिक उन्नती करावी !

साधकांनी पू. (सौ.) अश्‍विनीताईंनी इतक्या लहान वयात संतपद कसे प्राप्त केले ?, याचा अभ्यास करावा. त्यांच्यातील गुणांचे अवलोकन करून स्वतःत ते आणण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्यातील सेवेची तळमळ आणि उच्च कोटीचा भाव यांमुळे त्यांच्यावर गुरुकृपेचा वर्षाव झाला. प.पू. पांडे महाराज, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, सद्गुरु राजेंद्र शिंदे, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सनातनचे अन्य संत यांचे मार्गदर्शन घेऊन पू. (सौ.) अश्‍विनीताई यांनी शीघ्र आध्यात्मिक उन्नती करवून घेतली. १२.७.२०१७ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी त्यांच्या गुणांचे वर्णन केले आहे. साधकांनी त्या सर्व गुणांचा साधकांनी अभ्यास करून आध्यात्मिक उन्नती करवून घ्यावी.

गुरुदेवांनी आम्हा सर्व साधकांची लवकरात लवकर प्रगती करवून घ्यावी, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून आम्ही लिखाणाला पूर्णविराम देतो.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

– आपले चरणदास, प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक, पानवळ, बांदा, सिंधुदुर्ग. (जुलै २०१७)

 


Multi Language |Offline reading | PDF