कर्मयोगी बाळ गंगाधर टिळक लोकमान्यपदी पोहोचले ।

श्री. राज कर्वे

सनातनचे साधक श्री. राज कर्वे यांचा आज तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यांना लोकमान्य टिळक यांच्याविषयी सुचलेले लिखाण आणि काव्य येथे देत आहोत.

श्री. राज कर्वे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिले लोकप्रिय व्यक्तीमत्त्व आणि हिंदु राष्ट्रवादाचे पिता म्हणून संबोधले जाणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लोकांच्या मनाचा ठाव घेऊन त्यांना इंग्रजांच्या विरोधात लढा देण्यासाठी संघटित केले. त्यांनी शिक्षण हा राष्ट्राचा कणा आहे, हे लक्षात घेऊन समाजाला राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान जागवणारे शिक्षण दिले. ते खरे (धर्माधिष्ठित) सुधारक होते; मात्र त्यांना इंग्रजांच्या हातून आपल्या समाजात सुधारणा करणे मान्य नव्हते. त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर आधारित गीतारहस्य हा सुंदर ग्रंथ लिहिला. हा कर्मयोगी महापुरुष १ ऑगस्ट १९२० या दिवशी अनंतात विलीन झाला. त्यांच्या राष्ट्रकार्याविषयी मला सुचलेली कविता आज त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त येथे देत आहे.

तेजस्वी इतिहास आहे भारतवर्षातील प्रत्येक प्रांताला ।

नावाप्रमाणेच महान इतिहास लाभला महाराष्ट्राला ।

धन्य आहे त्याची भूमी जिच्यात रत्ने निपजली ।

ज्यांचे पैलू पाडताच किरणे आकाशी फाकली ॥ १ ॥

ऐका अशाच एका रत्नचूडामणीची अमरकथा ।

भारताचे पारतंत्र्य हीच ज्याची मनोव्यथा ।

या रत्नाने जन्म घेतला रत्नागिरी नगरीत (टीप १)

राष्ट्र-धर्मरक्षणाची ज्योत पेटवली पुण्यनगरीत (टीप २) ॥ २ ॥

त्याने इंग्रजी शिक्षणपद्धतीतील निरर्थकता जाणली ।

दक्खन शिक्षण संस्था स्थापून भारतीय शिक्षण दिले ।

त्यांनी इंग्रजी सत्तेच्या क्रूरतेला कडाडून विरोध केला ।

इंग्रजांच्या हिंदु धर्मातील हस्तक्षेपाला स्पष्ट नकार दिला  ॥ ३ ॥

गोर्‍यांनी प्लेगच्या नावाखाली स्त्रियांना दिल्या भयंकर यातना ।

केसरीने सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?, केली गर्जना ॥

जाज्वल्य अग्रलेखांमुळे अनेकदा भोगला अन्यायी कारावास ।

चिरंजिवाच्या मृत्यूनंतरही अस्थिरता नव्हती त्यांच्या मनास ॥ ४ ॥

अनेक क्रांतीकारकांपेक्षा एक निराळे वैशिष्ट्य त्यांच्यात होते ।

साधनेमुळे निर्माण होणारे आध्यात्मिक बल त्यांच्यात होते ।

गीतेतील तत्त्वे प्रत्यक्षात आणून त्यांनी गीतारहस्य ग्रंथ लिहिला ।

असे हे कर्मयोगी बाळ गंगाधर टिळक लोकमान्यपदी पोहोचले ॥ ५ ॥

टीप १ – शासनाने टिळक जन्मस्थान म्हणून वास्तू जतन केली आहे.

टीप २ – पुणे प्रांताला पूर्वी पुण्यनगरी असेही म्हणत.

– श्री. राज धनंजय कर्वे (वय २० वर्षे), फोंडा, गोवा. (२६.७.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF