पावसाळ्यात सात्त्विकता आणि दैवीतत्त्व प्रक्षेपित करणारी झाडे लावा !

औषधी आणि दैवी घटकांचे प्रक्षेपण करणार्‍या वनस्पतींची लागवड करा !

झाडांमध्ये दैवीतत्त्व आणि औषधी गुणधर्म असल्याने अशी झाडे आपण लावल्यामुळे वातावरणात त्यांच्यातील दैवी आणि औषधी घटकांचे प्रक्षेपण होते. याचा लाभ सर्वांनाच होतो. निर्जीव किंवा सजीव घटक त्यांच्यातील त्रिगुणांच्या, त्यांच्यातील सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेचे प्रक्षेपण सतत करतात. त्याप्रमाणेच वनस्पतीमध्ये असलेल्या मूलभूत औषधी आणि दैवी घटकांचे प्रक्षेपण वातावरणात होते. त्यामुळे त्याचा लाभ त्या वातावरणात स्थित असलेल्या जिवाला होतो. हे लाभ पुढीलप्रमाणे आहेत.

सौ. रंजना गडेकर

१. वनस्पतीपासून मानवाला होणारे लाभ

अ. त्याच्यातील औषधी घटकांचा लाभ शारीरिक कष्ट निवारणासाठी होतो.

आ. वनस्पतीतील दैवी तत्त्वांमुळे जिवाचा आध्यात्मिक कारणामुळे निर्माण झालेला शारीरिक आणि मानसिक त्रास अल्प होण्यास साहाय्य होतेे.

इ. निसर्गाच्या सान्निध्यात उपाय होऊन आपल्यावरील काळ्या शक्तीचे उच्चाटन होणे : निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने जिवाचे मन आणि बुद्धी यांवर अनिष्ट शक्तींमुळे आलेले काळ्या शक्तीचे आवरणही अल्प होण्यास साहाय्य होते. त्यामुळे एक प्रकारे विचार आणि विकार नष्ट होण्यास साहाय्य होते, तसेच वनस्पतींकडून दैवी स्पंदने प्रक्षेपित होणार असल्याने आपल्या मनाला प्रसन्न वाटत असते.

ई. सात्त्विक वृक्ष-वेलींमुळे वातावरणातील तमोगुणाचे उच्चाटन होऊन सत्त्वगुणाची वृद्धी होण्यास साहाय्य होते.

२. सुशोभिकरणासाठी लावलेल्या पाश्‍चात्त्य झाडांतून तमोगुणाचे प्रक्षेपण होते, तर भारतात उगवणार्‍या सात्त्विक झाडांमधून सत्त्वगुणाचे प्रक्षेपण होते.

३. वनस्पतीतील दैवीतत्त्वे आणि औषधी गुणधर्म श्‍वासावाटे ग्रहण करता येणे

ज्याप्रमाणे अन्नातून आपल्याला पोषक घटक मिळतात, त्याचप्रमाणे वृक्षवेलींमधूनही प्रक्षेपित होणारी दैवीतत्त्वे आणि त्यांच्यातील औषधी गुणधर्मासहित झाडाच्या सभोवतालच्या वातावरणातही ती प्रक्षेपित होत असतात. अशी झाडे आपल्या सभोवतालच्या परिसरात असतील, तर ती शक्ती वातावरणात मिसळल्याने आपल्याला श्‍वासावाटे ग्रहण करता येतेे.

४. व्यक्तीतील सत्त्व, रज आणि तम गुणांची लक्षणे

४ अ. सत्त्वगुण : सत्त्वगुणी वातावरणामुळे जिवातील तमोगुणाचे रजोगुणात आणि रजोगुणाचे सत्त्वगुणात परिवर्तन होते.

४ आ. रजोगुण : रजोगुणामुळे जिवामध्ये चंचलता, अस्वस्थता, अस्थिरता आणि द्विधा मनस्थिती दिसून येते.

४ इ. तमोगुण : मनावर तमोगुणाचे प्राबल्य अधिक असेल, तर व्यक्तीच्या मनात हिंसक विचार, निराशा, निरुत्साह, नकारात्मकता इत्यादी लक्षणे दिसून येतात.

५. आपल्या परिसरात सात्त्विक झाडाचे एक तरी रोप लावा !

निसर्गामुळे आणि कधी कधी दैवी वृक्षांमुळे दैवी वातावरणाची निर्मिती होण्यास साहाय्य होते. निसर्गातूनच आपल्यावर उपाय होत असल्याने जिवाला असणारा अनिष्ट शक्तींचा त्रास अल्प होण्यास साहाय्य होते. त्यामुळे आपल्या परिसरात सात्त्विक झाडाचे एक तरी रोप लावणे आवश्यक आहे, उदा. तुळस, कडुनिंब, पारिजातक, पळस, अश्‍वत्थ, औदुंबर, बेल, दुर्वा इत्यादी.

६. सात्त्विक झाडांची नावे आणि त्यातून प्रक्षेपित होणारे देवतेचे तत्त्व

७. सुगंधी आणि सात्त्विक फुले

फुलांमधील सुगंधामुळे वातावरण आल्हाददायक होते. सात्त्विक फुले, त्यांचा रंग आणि आकार यांमुळे भावाची निर्मिती होते. फुले मनाची संवेदनशीलता जागृत करतात. फुलांना पाहून सर्वांनाच आनंद होतो आणि प्रसन्न वाटते. काही अपवादात्मक सदाफुलीसारख्या सात्त्विक सुगंध न येणार्‍या फुलझाडांना कडवट वास येतो; परंतु ती सात्त्विक असून औषधीही आहेत. चाफा, सोनचाफा, मोगरा, जुई, चमेली, जास्वंद, भुईचाफा, झेंडू, मंजुळा इत्यादी फुलझाडे सात्त्विक आहेत.

– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

८. सात्त्विक वनस्पती : तुळस

८ अ. धार्मिक कार्यात उपयोग केला जाणे : प्रत्येक हिंदूच्या घरासमोर तुळशीवृंदावन असायचे. तिच्यासमोर सकाळी आणि संध्याकाळी दिवा दाखवून तिला ओवाळले जायचे. सात्त्विकतेमुळे तिचा धार्मिक कार्यातही उपयोग केला जातो. तुळशीवरून वाहाणारा वारा जेथे जातो, तेथे पवित्र भावना निर्माण होते आणि सात्त्विकता वाढते. मनाचा ओघ साधनेकडे वळतो. या सात्त्विक गुणांमुळेच तुळशीला आध्यात्मिक जगात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.

८ आ. मनाचे पावित्र्य, शुद्धी आणि भक्ती हे भाव वाढीस लागणे : तुळशीचा परिणाम केवळ शारीरिक दुखण्यांवरच होत नाही, तर मनातील भाव, भावना आणि विचार यांवरही तिचा कल्याणप्रद प्रभाव पडतो. शारीरिक लाभासमवेत मनाचे पावित्र्य, शुद्धी आणि भक्ती या भावनाही वाढतात.

८ इ. वातावरण शुद्ध रहाणे : तुळस अंगणात असली, तर सभोवतालचे वातावरण शुद्ध रहाते. तुळशीच्या रोपातून एक विशिष्ट प्रकारचा वायू निघतो. तो वायू सभोवतालची दूषित हवा शुद्ध करतो. तुळशीत एक विशिष्ट प्रकारचा तेलकट पदार्थ असतो. त्यामुळे हवा शुद्ध होते. तुळशीचे रोप आणि त्याचा गंध यांमुळे वातावरण शुद्ध होते अन् शुद्ध जलवायू परिष्कृत (आणखी शुद्ध) होत असतो.

८ ई. आरोग्यास हानीकारक किटाणू, जंतू, डास, माश्या इत्यादींची वाढ न होणे : तुळशीमुळे डास किंवा कीटक येत नाहीत. तुळशीच्या रोपांमुळे हानीकारक किटाणू, जंतू, मच्छर, माश्या इत्यादींची वाढ थांबते आणि वातावरण आरोग्यदायी होण्यास मोठा हातभार लागतो. तिच्या सुगंधाजवळ सापही रहात नाहीत.

८ उ. प्राणवायूचा पुरवठा होणे : तुळशीच्या रोपाजवळ व्यायाम केल्यास प्राणवायूचा पुरवठा अधिक होऊन श्‍वसनक्रिया सुलभ होते. अंगणात किंवा घरासमोर तुळस लावल्याने स्वास्थ्य चांगले रहाते आणि विषारी जीव-जंतू घरात येत नाहीत.

८ ऊ. मलेरिया या रोगावर रामबाण उपाय : तुळस ही हिवतापाची (मलेरियाची) मोठी शत्रू आहे. तुळशीमध्ये मलेरियाच्या डासांना दूर पळवून लावण्याचा गुणधर्म आहे. तुळशीची पाने खाल्ल्याने मलेरियाची दूषित तत्त्वे नाश पावतात. तुळस आणि मिरी यांचा काढा करून पिणे, हा मलेरियावर सर्वांत सोपा आणि परिणामकारक उपाय मानला जातो.

८ ए. तुळस दुर्गंध नष्ट करते; म्हणून चरक ऋषी तिला पूतिगंधहा असेही म्हणतात.

८ ऐ. तुळशीचे उपयोग : तुळशीचे उपयोग रोग होण्यापूर्वी आणि रोग झाल्यावर अशा दोन प्रकारे होतात.

८ ऐ १. तुळस रक्त शुद्ध करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि सर्व प्रकारे शरिराला लाभदायक असते ! : पहाटे लवकर उठून स्नानादी कर्मे उरकून स्वच्छ आसनावर तुळशीजवळ अशा प्रकारे बसा की, तिची पाने, मंजिर्‍या आणि खोड यांतून झरणारा सुवास तुमच्या श्‍वासांत भरून तुमच्या चेतनेला आल्हाददायक करील. त्यामुळे तुम्हाला दीर्घ श्‍वास घेता येईल. प्राणायाम करून झाल्यावर शक्य होईल, तेवढा वेळ तुळशीचा सुगंध श्‍वासावाटे नाकात ओढून घ्या. हा सुगंधी रासायनिक वायू शरिरात जितका खोलवर वा सर्वत्र पसरेल, तितका पसरू द्या. तुमच्या रक्ताच्या कणाकणात तुळशीचा सुगंध मिसळू द्या. हा दिव्य सुगंध रक्त शुद्ध करील. शुद्ध रक्त शरिराला तेजस्वी करील आणि नवजीवन देईल. आरोग्य आणि तेज वाढवण्यासाठी हा सुवास फार उपयुक्त आहे. त्याच्यात रक्तशुद्धीकारक आणि विकारनाशक शक्ती पुष्कळ प्रमाणात आहे. यामुळे तुमचे शरीर कांतीमान, तोंडवळा तेजस्वी आणि प्रफुल्लित राहील. तुळस रक्त शुद्ध करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि सर्व प्रकारे शरिराला लाभदायक असते.

८ ऐ २. तुळशीमुळे विकार आणि वायुविकार न होणे : घरातील हवा शुद्ध राखण्यासाठी तुळशीची रोपे कुंड्यांत लावली पाहिजेत. एखाद-दोन कुंड्या दिवसा घरातील प्रत्येक खोलीत ठेवाव्यात. असे केल्याने प्रकृती चांगली रहाते. अनेक विकार आणि वायुविकार होत नाहीत. त्या कुंड्या संध्याकाळी बाहेर अथवा ओट्यावर ठेवून रात्रभर तिथेच राहू द्याव्यात. सकाळी १० – ११ वाजल्यानंतर परत घरात आणून ठेवाव्यात. सकाळचे २ – ३ तासांचे ऊन तुळशीला पुरते.

८ ऐ ३. विषबाधा झाल्यास तुळशीचा रस गुणकारी असणे : कोणत्याही प्रकारची विषबाधा झाल्यास त्यावर तुळशीचा रस उपयुक्त आहे. शक्य होईल तेवढा रस प्यावा. विषनिवृत्ती होण्यास तो साहाय्य करतो. धोतरा, कुचला आणि अफू यांसारखे कोणतेही विष खाण्यात आले असल्यास तुळशीची पाने वाटून गाईच्या तुपासमवेत रोग्यास द्यावीत. तुपाचे प्रमाण त्या वेळची रुग्णाची अवस्था बघून प्रतिदिन १०० ग्रॅम ते ५०० ग्रॅम इतके ठेवावे. एकदा घेतल्यावर आराम न वाटल्यास वारंवार तुळशीचा रस आणि तूप देत रहावे.

८ ओ. जनहो, महागडी सॅनेटोरियम (हवापालट करण्याचे ठिकाण) बांधण्यापेक्षा तुळशीची मोठ्या प्रमाणात लागवड करा आणि अल्प व्ययात आरोग्य परत मिळवा ! : आधुनिक काळात उंच ठिकाणी डोंगरावर महागडी सॅनेटोरियम बांधण्यात येतात आणि क्षयासारखा मोठा रोग असलेल्या रुग्णांंना तेथे रहाण्याचा समुपदेश देतात. मोकळ्या जागेत तुळशीचे सॅनेटोरियम करण्यात आले, तर कोणत्याही आर्थिक स्तरावरील माणूस त्याचा लाभ घेऊ शकेल. थोड्याशाच भूमीत तुळशीची पुष्कळ रोपे लावावीत. त्यात मध्येे मध्येे बांबूच्या झोपड्या बांधाव्यात. या झोपड्यांची भूमी आणि भिंती तुळशीच्या रोपांखालच्या मातीने लिंपलेली असावीत. अशा ठिकाणी राहून रुग्ण तुळशीमुळे निर्माण झालेल्या आरोग्यदायक हवेने श्‍वसन करू शकेल. तसेच तुळशीतून बाहेर उडणार्‍या सुगंधी तेलाचा लाभ रुग्णाला होईल. तुळशीवरून वाहाणारे वारे त्याच्या फुफ्फुसांना शक्ती आणि आरोग्य देतील अन् नैसर्गिक रक्ताभिसरणाच्या क्रियेला साहाय्य करतील. परिणामी शरिराच्या सर्व पेशी निरोगी होऊन शरिरात नवे चैतन्य आणि शक्ती यांचा संचार होईल. अशा तुळस सॅनेटोरियममध्ये राहून आणि तुळसमिश्रित औषधांचे सेवन करून रुग्ण अल्प व्ययात आरोग्य परत मिळवू शकतो.

८ औ. अनेक रोगांवर उपयुक्त ठरलेल्या तुळशीला अमृत म्हटले आहे ! : जी व्यक्ती प्रतिदिन तुळशीची पाच पाने खाईल, ती अनेक रोगांपासून सुरक्षित राहील, उदा. उचकी, खोकला, कफ, ताप, पटकी (कॉलरा), दमा, श्‍वसनाचे विकार, वात, संधिवात, सांधेदुखी, दातदुखी, तसेच तोंड, गळा, नाक, घसा, डोळे यांचे रोग, सूज, खरूज, कोड, त्वचारोग, भगंदर (गुदाच्या ठिकाणी उत्पन्न होणारा नलिकाकार व्रण), अजीर्ण, आग, केसतोड (केसाच्या मुळाशी येणारे गळू), उष्माघात, पोट, पचनसंस्था, आतडी आणि गुद यांचे रोग, स्नायुपीडा, क्षयरोग, मूतखडा, स्वप्नदोष, मूर्च्छा, विषबाधा इत्यादी. तुळस कृमीनाशक आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आहे. कर्करोगासारख्या (कॅन्सरसारख्या) रोगातही तुळस उपयुक्त ठरू शकेल, अशी शक्ती तिच्यात आहे. तसेच स्त्री आणि बालक यांचे सर्वसामान्य रोग यांवर तुलसीचिकित्सेत आपण पारंगत झालो, तर या सर्वच रोगांची आपल्याला स्वतःच परीक्षा करता येईल; म्हणूनच तुळशीला अमृत म्हटले आहे.

तुळशीसारखी एक अपूर्व गुणकारी अशी वनस्पती परमात्म्याने आपल्या स्वास्थ्यासाठी निर्माण केली आहे. हे परमेश्‍वराचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. आपल्या अंगणात आणि मागच्या परस दारात, खिडकीत किंवा सतत सूर्यप्रकाश मिळत राहील, अशा जागी तुळशीचे रोप लावले, तर निश्‍चितपणे आपल्याला निरोगी आणि दीर्घायुष्याचा लाभ मिळेल.

(संदर्भ : तुळस, लेखक : यश राय)

यावरून तुळस किती बहुगुणी आहे आणि तिची लगवड करणे किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येईल.

९. बहु उपयोगी कडुनिंब

कडुनिंबही आयुर्वेदिकदृष्ट्या गुणकारी वृक्ष आहे. त्याची पाने किंवा रस पाण्यात घालून अंघोळ केल्यास त्वचारोग बरा होतो. दात घासण्यास त्याचा वापर केल्यास दातांना कीड लागत नाही. तसेच त्याच्या सेवनाने रक्तशुद्धी होते. असा आपल्या आयुर्वेदिक उपचारांमध्ये त्याचा उल्लेख आहे. तसेच कडुनिंबामुळे अनिष्ट शक्तींपासून रक्षण होण्यासही साहाय्य मिळते.

१०. पूर्वजांनी निसर्गदेवतेची सेवा केल्यामुळे त्यांचे जीवनही निरोगी, आनंदी आणि दिर्घायुषी असणे

आता ईश्‍वरनिर्मित निसर्गात असलेल्या वृक्षतोड करून त्याची जागा काँक्रीटच्या इमारतींनी घेतली आहे. आपल्या पूर्वजांनी निसर्गदेवतेची सेवा करून त्यांची कृपा संपादन केली होती. त्यामुळे त्यांचे जीवनही निरोगी, आनंदी आणि दिर्घायुषी होते.

११. औषधी वनस्पतीची लागवड करून देशातील सर्वांनाच सात्त्विक वातावरणाचा लाभ होईल आणि निसर्गदेवतेची कृपाही संपादन करता येईल !

नैसर्गिक वनस्पतींचा आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीने लाभ होण्यासाठी या पावसाळ्यात अधिकाधिक तुळशीची रोपे, औषधी वनस्पती आणि इतर सात्त्विक झाडे लावा. आपल्या घराच्या मोकळ्या परिसरात तुळशीचे वाफे सिद्ध करा. तसेच इतरांनाही त्यांचे महत्त्व सांगून अशी औषधी आणि दैवीतत्त्वे असलेली झाडे समष्टी स्तरावर आपल्या परिसरात, छोट्या सदनिकेत, शाळा, रुग्णालये, कार्यालय इत्यादी ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केल्यास आपले गाव, जिल्हा, राज्य आणि आपल्या देशातील सर्वांनाच या वातावरणाचा भौतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होईल अन् निसर्गदेवतेची कृपाही होईल. त्यामुळे सर्वत्रचे वातावरण शुद्ध होण्यास साहाय्य होईल. या सात्त्विकतेमुळे त्या ठिकाणी देवतांचे अस्तित्व येऊन पृथ्वीवरील जिवांना त्यांचे साहाय्य लाभेल.

(आयुर्वेदिक आणि सात्त्विक वनस्पतींची लागवड करण्यासंदर्भात माहिती आणि मार्गदर्शन सनातनचा ग्रंथ सात्त्विक वनस्पतींची लागवड करा यात उपलब्ध आहे.)

– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा


Multi Language |Offline reading | PDF