मोदी यांच्या दबावाने ‘टीव्ही ९’ वाहिनीने ‘सडेतोड’ कार्यक्रम बंद केल्याचा निखिल वागळे यांचा कांगावा उघड !

मुंबई – वृत्तवाहिन्यांवर निवेदक म्हणून समतोल भूमिका न घेता तार्किक युक्तीवादाऐवजी आकांडतांडव करणारे पत्रकार निखिल वागळे यांचा दांभिकपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. ‘टीव्ही ९’ वाहिनीवरील वागळे यांच्या ‘सडेतोड’ या रात्री होणार्‍या चर्चासत्रास प्रेक्षकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ५ ते ६ अशी करण्याविषयी वागळे यांना व्यवस्थापनाने सुचवले. त्यांना ते रुचले नाही आणि ‘कार्यक्रम करीन तर रात्री, नाही तर बंद करीन’, अशी आडमुठी भूमिका घेतली. प्रत्यक्षात मात्र ‘टीव्ही ९’ वाहिनी सोडतांना वागळे यांनी ट्विटरवरून ‘या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलणार्‍यांचा आवाज दाबला जातो’, असा कांगावा केला. तसेच ‘टीव्ही ९’ वाहिनीने ‘सडेतोड’ कार्यक्रम बंद करून मोठा अन्याय केल्याचे वातावरण निर्माण केले होते. त्यानंतर वागळे यांच्या पुरो(अधो)गामी कंपूतील काही पत्रकारांनीही या घटनेला पंतप्रधान मोदी आणि भाजप यांनाच उत्तरदायी ठरवत टीकेची झोड उठवली. प्रत्यक्षात मात्र सत्य परिस्थिती निराळीच असल्याचे उघड झाल्यामुळे पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणारे वागळे यांचा धादांत खोटारडेपणा उघड झाला आहे.

‘टीव्ही ९’ मराठी वाहिनीला गुणवत्तावाढीसाठी मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ पत्रकार आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्री. विनोद कापडी यांनी निखिल वागळे यांच्या ‘सडेतोड’ कार्यक्रमाचा ‘टीआर्पी’ अल्प असल्यामुळे त्या कार्यक्रमाची वेळ पालटण्याची सूचना व्यवस्थापनाला केली होती.

श्री. कापडी यांनीच हा सर्व घटनाक्रम फेसबूकवर विस्तृतपणे पोस्ट केला आहे. त्यामध्ये ते म्हणतात, ‘‘टीव्ही ९ मराठी वाहिनीवर चालू असलेल्या ‘सडेतोड’ कार्यक्रमाच्या सुमार ‘टीआर्पी’मुळे कार्यक्रमाची वेळ रात्री ९ ते १० अशी पालटून सायंकाळी ५ ते ६ अशी करण्याविषयी मीच वाहिनीला सुचवले होते. त्याप्रमाणे वाहिनीने वेळेतील पालटाविषयी वागळे यांना सांगितले. यावर या कार्यक्रमाचा दर्जा वाढवण्यासाठी वागळे यांनी एक मासाची मुदतही मागितली होती. त्याप्रमाणे वाहिनीने एक मासाची मुदत दिली. तरीही वागळे यांच्या ‘सडेतोड’ या कार्यक्रमाचा दर्जा सुधारला नाही, उलट दिवसेंदिवस घसरण चालूच राहिली. त्यामुळे १ मासाने वाहिनीने त्यांना ‘आता कार्यक्रमाची वेळ पालटणे अपरिहार्य आहे’, असे कळवले होते. तशा आशयाचे वागळे यांना पाठवलेले संगणकीय पत्रही उपलब्ध आहे. असे असतांना वागळे यांनी केलेल्या धादांत खोट्या कांगाव्यामुळे मी व्यथित झालो आहे.’’

स्वतःला सत्यवादी असल्याचे दर्शवून वागळे यांच्यासारखे तथाकथित निधर्मी पत्रकार खोटा कांगावा करून सहानुभूती मिळवण्याचा कसा प्रयत्न करतात, हे विनोद कापडी यांनी उघड केले आहे.

सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी दिलेल्या मूर्तीभंजनांच्या पुराव्यांना खोटे ठरवणारे, तसेच रझा आकादमीने आझाद मैदानात केलेल्या दंगलीविषयी सूत्र मांडत असतांना श्री. वर्तक यांना कार्यक्रमातून निघून जाण्यास सांगणारे निखिल वागळे !

गोव्यातील मूर्तीभंजनाचे पुरावे दिल्यास वाहिनीवर कार्यक्रम घेण्याचे वागळे यांनी एका चर्चासत्राच्या वेळी सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना आश्‍वासन दिले होते. त्याप्रमाणे सनातनने त्यांना तसे पुरावे उपलब्ध करून दिले, त्यावर काही मास त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. या पार्श्‍वभूमीवर एका चर्चासत्रात श्री. वर्तक यांनी विचारणा केली असता, वागळे यांनी सदर पुरावे खोटे आणि बेबनाव रचणारे असल्याचा धादांत खोटा आरोप केला. त्याचबरोबर अन्य एका चर्चासत्रात रझा आकादमीने आझाद मैदानात केलेल्या दंगलीविषयी श्री. वर्तक सूत्र मांडत असतांना हेकेखोरपणे त्यांना कार्यक्रमातून निघून जाण्यास सांगितले. अशा अनेक प्रसंगात अन्य हिंदुत्वनिष्ठांचाही हिंदुत्वाची सत्य बाजू मांडतांना त्यांनी उपहास केला. निवेदक म्हणून तटस्थ वागणे तर दूरच; पण किमान सौजन्यही वागळे यांनी दाखवले नाही.


Multi Language |Offline reading | PDF