पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ पदावर रहाण्यास अपात्र ! – सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

भ्रष्टाचाराच्या प्रकरणी शासनकर्त्यांना शिक्षा ठोठावणारा पाक भारताच्या पुढे आहे, हे लक्षात घ्या ! असे कधी भारतात घडत नाही !

पनामा पेपर्स प्रकरण

इस्लामाबाद – पनामा पेपर्स प्रकरणी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ पदावर रहाण्यास अपात्र आहेत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधिशांच्या खंडपिठाने दिला. ‘त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागणार आहे’, असे न्यायालयाने म्हटले. शरीफ यांच्या विरोधात खटला प्रविष्ट करण्यात यावा, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. या निकालानंतर नवाज शरीफ यांनी पदाचे त्यागपत्र दिले आहे. पाकच्या पंतप्रधानपदी तिसर्‍यांदा निवडून आलेल्या शरीफ यांना तिन्ही वेळेस कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.

शरीफ यांच्यावर लंडनमध्ये बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप होता. हे प्रकरण पनामा पेपर्समधून उघडकीस आले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने चौकशीसाठी संयुक्त समिती स्थापन केली होती. १० जुलैला या समितीने अहवाल सादर केला होता. त्यात शरीफ यांनी खोटी कागदपत्रे सादर करणे, संपत्तीचा स्रोत लपवणे, उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवणे, असा ठपका ठेवण्यात आला होता. या समितीने शरीफ यांच्यासह त्यांची मुले हसन, हुसेन आणि मुलगी मरियम नवाज यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंद करावा, अशी शिफारस केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने वरील निकाल दिला. न्यायालयाने शरीफ यांची मुलगी मरियम, हसन, हुसैन आणि अर्थमंत्री इसाक दार यांच्या विरोधातील प्रकरणांची चौकशी ‘नॅशनल अकाउंटबिलिटी ब्युरो’कडे (‘एन्एबी’कडे) सोपवण्यात आली आहे. ‘एन्एबी’ ही पाकमधील सर्वांत मोठी भ्रष्टाचारविरोधी संस्था आहे. न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी चालू केल्यानंतर ३० दिवसांत निकाल देण्याचा आदेश ‘एन्एबी’ला दिला आहे.

पुढील निवडणुका होईपर्यंत पंतप्रधानपद कुणाकडे सोपवण्यात येईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाकमध्ये पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. पनामा पेपर्स प्रकरणी निकाल घोषित होणार असल्याने खबरदारी म्हणून २७ जुलैच्या रात्रीपासूनच इस्लामाबाद आणि रावळपिंडी येथे सतर्कतेचा आदेश देण्यात आला होता.


Multi Language |Offline reading | PDF