गणेशमूर्ती विसर्जन कोठे करायचे याविषयी सातारावासियांच्या मनाची संभ्रमावस्था : पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा नमुना

सातारा, २८ जुलै (वार्ता.) – अखिल महाराष्ट्राचे अराध्य दैवत श्रीगणेश यांचे आगमन होण्यास अवघा एक मासाचा कालावधी शिल्लक राहिला आहे; मात्र तरीही सातारा नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे श्री गणेशमूर्ती शाडू मातीची कि प्लॅस्टर ऑफ पॅरिसची तसेच श्री गणेशमूर्तीचे विसर्जन तलावात कि कृत्रिम तलावात यांमध्ये कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याने शाहूनगरवासीय सध्या संभ्रमावस्थेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सातारा येथील काही सामाजिक संस्था पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जिवाच्या आकांताने प्रयत्न करतांना दिसत आहेत. प्रतीवर्षीच गणेशोत्सव आला की पर्यावरणप्रेमींना पर्यावरणाचे प्रदूषण होत असल्याचा दृष्टांत होतो आणि ते कांगावा करणे आरंभ करतात. यातूनच प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडू मातीची मूर्ती बनवणे, नैसर्गिक स्रोतांमध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याऐवजी कृत्रिम तलाव, कृत्रिम कुंड सिद्ध करणे या संकल्पनांचा उदय झाला. जरी अनेकविध कारणांमुळे जलस्रोतांचे प्रदूषण होत असले, तरी श्री गणेशमूर्ती विसर्जन हे मुख्य कारण पुढे करून पर्यावरणवादी पर्यावरण प्रदूषणाचा डांगोरा पिटत आहेत. शहरातील काही कागदाच्या लगद्यापासून सिद्ध करण्यात आलेल्या श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करावी, असे आवाहन करत आहे.

हिंदु धर्मातील रुढी, प्रथा, परंपरा यांच्याशी एकरूप झालेले गणेशभक्त मात्र या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतांना दिसत आहेत. मागील वर्षीही भाविकांनी तथाकथित सामाजिक संस्था, सातारा नगरपालिका यांच्या नादी न लागता परंपरेनुसार संगम माहुली येथे कृष्णा नदीच्या वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन मोठ्या दिमाखात केले. काही ठिकाणी भाविकांनी मंगळवार तळे, मोती तळे येथे पारंपरिक पद्धतीने गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रयत्न केले; मात्र या वेळी भोळ्या-भाबड्या गणेशभक्तांवर पोलिसांनी आणि पालिका प्रशासनाने कायद्याचा बडगा उगारून कारवाई करण्याचा प्रयत्न केला. अजूनही पालिका प्रशासन श्री गणेशमूर्ती शाडू मातीची कि प्लॅस्टर ऑफ पॅरिसची आणि श्री गणेशमूर्तीचे विसर्जन तलावात कि कृत्रिम तलावात, हे आधांतरीच ठेवून समाजामध्ये संभ्रमावस्था निर्माण करत आहे. तत्परतेने सातारा नगरपालिकेने श्री गणेशोत्सवाविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा सूजाण नागरिक व्यक्त करत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF