राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची चीनच्या राष्ट्रपतींशी भेट

बीजिंग – ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या परिषदेसाठी चीनमध्ये गेलेले भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी २८ जुलै या दिवशी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली. ‘त्यांच्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली’, हे समजू शकले नाही. डोवाल यांनी २७ जुलैला चीनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांग जैची यांची भेट घेतली होती. बैठकीत डोवाल आणि जैची यांच्यासह भारत अन् चीन यांच्या समपदस्थ अधिकार्‍यांनी दोन्ही देशांमध्ये वाढलेल्या तणावाविषयी चर्चा केली. डोवाल आणि यांग जैची हे भारत अन् चीन यांच्यामधील सीमा प्रश्‍नाविषयी चर्चा करण्यासाठी नेमलेले विशेष प्रतिनिधीही आहेत. जैची यांनी डोवाल यांच्याशी चर्चा करतांना द्विपक्षीय संबंध, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक वादाची सूत्रे यांच्याविषयी चर्चा केली. ही उच्चस्तरीय बैठक आयोजित केल्यामुळे डोवाल यांनी चीनचे आभार मानले. तसेच, ‘बीजिंगमध्ये येण्यास आनंद होतो’, असे त्यांनी सांगितले.

येथील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार यांग यांनी भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यांच्या प्रतिनिधींशी स्वतंत्रपणे चर्चा केली.

आतंकवादाच्या विरोधात ब्रिक्स देशांनी एकत्रित यावे ! – डोवाल

चीन येथे पोहोचल्यावर डोवाल यांनी ‘ब्रिक्स देशांनी जागतिक आतंकवादाच्या विरोधातील लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी पुढे यावे’, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तसेच ‘प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या ज्या सामरिक सूत्रांवर आपली एकवाक्यता आहे, त्यासाठी ब्रिक्सने नेतृत्वाची भूमिका बजावण्याचीही आवश्यकता आहे’, असे डोवाल यांनी सांगितले. सिक्कीममधील डोकलामवरून भारत आणि चीन यांच्यामध्ये गेले दीड मास तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे डोवाल यांच्या या दौर्‍यात या वादावर तोडगा निघण्याची आशा व्यक्त होत आहे. डोकलाममध्ये चिनी सैनिकांना रस्ता बांधण्यास भारतीय सैनिकांनी विरोध केल्यानंतर हा वाद निर्माण झाला. चीनने मात्र भारताने त्याच्या प्रदेशात घुसखोरी केल्याचा कांगावा केला आहे.

चीनच्या सरकारी वर्तमानपत्राची गरळओक चालूच !

(म्हणे) ‘चीनही काश्मीरमध्ये हस्तक्षेप करील !’

बीजिंग – डोकलाम हा चीन आणि भूतान यांच्यातील सीमावाद आहे. यात तिसरा पक्ष म्हणून भारताला दखल देण्याचा काय अधिकार ? जर त्याला वाटते की, त्याला अधिकार आहे, तर याच धर्तीवर पाकने आवाहन केल्यास चीनचे सैन्य काश्मीरमध्ये घुसू शकते, असे चीनचे सरकारी वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. झांग यी यांनी लिहिलेल्या या लेखात म्हटले आहे की, भूतानने कोणतेही साहाय्य मागितले नसतांना भारताने येथे हस्तक्षेप केला आहे. (भूतानच्या संरक्षणाचे दायित्व भारताकडे आहे. त्यामुळे भूतान आणि काश्मीर यांची तुलना होऊच शकत नाही ! युद्धाची खुमखुमी आलेल्या चीनला आता धडा शिकवणे आवश्यक ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF