चित्रपटांच्या माध्यमातून समाजाचे अध:पतन

पूर्वी चित्रपट निर्माण व्हायचे ते केवळ मनोरंजन म्हणून नव्हे, तर समाजप्रबोधनासाठी ! सध्या मात्र चित्रपटाच्या संदर्भात समाजप्रबोधन हे सूत्र फारच दूर गेले आहे. समाजाचे वास्तव भान हरवत चाललेले निर्माता-दिग्दर्शक, स्वार्थासाठी वाटेल ते करण्यास सिद्ध झालेले नायक आणि नायिका, यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनात वाटचाल करणारा प्रेक्षकवर्ग विशेषत: युवावर्ग असे चित्र आज आहे. या सर्वांचेच झपाट्याने नैतिक अध:पतन होत असल्याचे आपल्या लक्षात येते. नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ चित्रपट अशाच धाटणीतील चित्रपट होता. हा पाहून युवतींनी सर्वच मर्यादांचे उल्लंघन केल्याचे लक्षात येते. आंतरजातीय विवाहासाठी युवकांना प्रवृत्त करणे, मुलींना लाज-लज्जा सोडून समाजात एकत्र वावरण्यासाठी प्रेरणा देणे, हेच या चित्रपटांतून झाले. शिवराळ भाषा वापरून समाजात ती दृढ करण्यासाठी आटापिटा करणे, हाच प्रयत्न यातून झाल्याचे निदर्शनास आले. मंजुळे यांच्याच पावलावर पाऊल ठेवत निर्माता सायरा आणि सिकंदर सय्यद या मुसलमान दाम्पत्याने हिंदु युवकांना ‘उंडगा’ बनवण्याचे ठरवले आहे. होय ! ४ ऑगस्ट या दिवशी सय्यद दाम्पत्य महाराष्ट्रातील ११० हून अधिक चित्रपटगृहामध्ये ‘उंडगा’ चित्रपट प्रदर्शित करत आहे.  शिव्यांची लाखोली वाहणारा हा चित्रपट प्रबोधन करणारा कधी तरी ठरू शकेल का ? पूर्वी चित्रपटांमध्ये शिव्या दिल्या जात होत्या; मात्र आता चित्रपटांची नावेच शिव्यांच्या स्वरूपात दिली जात आहेत. ही गोष्ट मराठी चित्रपट निर्मितीचा दर्जा खालावत असल्याचेच द्योतक आहे. असल्या चित्रपटांच्या माध्यमातून हिंदु युवकांना बीभत्स बनवले जात आहे. त्यांच्या मनातून देव, देश अन् धर्म यांच्याविषयीच्या भावना बोथट केल्या जात आहेत. राष्ट्रनिर्मितीच्या शिलेदारांना म्हणजेच युवकांना चित्रपटांतून शिव्या शिकवणे याला प्रबोधन कसे म्हणायचे ? या गोष्टींचा जागृत चित्रपट रसिकांनी निषेध केला पाहिजे. चित्रपट परिनिरीक्षण मंडळानेही (सेन्सॉर बोर्डानेही) याविषयी त्यांची भूमिका चोख बजावणे आवश्यक आहे; मात्र मनोरंजनाच्या नावाखाली वाटेल ते समाजापुढे ठेवण्यासाठी चित्रपट निर्मात्यांना पाठीशी घालणार्‍या चित्रपट परिनिरीक्षण मंडळालाही ‘कलाद्रोही’ म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

उन्नत समाजनिर्मितीसाठी साधना आवश्यक असते. हिंदु धर्मात १४ विद्या आणि ६४ कला सांगितल्या आहेत. या कला ईश्‍वरप्राप्तीसाठीच आहेत; मात्र कालौघात मनोरंजनासाठी या कलांचा वापर होऊ लागला. आता तर या कलांनी असे हीन स्वरूप धारण केले आहे. साधनेचा अंग म्हणून कलेचा अवलंब केल्यास कोणतीही कृती ही सुंदरच होईल, हे निश्‍चित ! निर्माता आणि दिग्दर्शक यांना साधना म्हणून चित्रपट निर्मिती बुद्धी ईश्‍वराने त्यांना देवो, अशी प्रार्थना !

– श्री. राहुल कोल्हापुरे, सातारा

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now