५३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा पुणे येथील चि. वरद तुषार कुलकर्णी (वय २ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र (सनातन धर्म राज्‍य) चालवणारी पिढी ! चि. वरद कुलकर्णी ही या पिढीतील एक आहे !

फाल्‍गुन शुक्‍ल नवमी (२८.२.२०२३) या दिवशी चि. वरद तुषार कुलकर्णी याचा दुसरा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याच्‍या आजीला लक्षात आलेली त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

चि. वरद कुलकर्णी याला दुसर्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

चि. वरद कुलकर्णी

१. जन्‍मापूर्वी

१ अ. मुलीला स्‍वप्‍नात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे आणि नंतर एक मासाने तिला गर्भधारणा झाली असल्‍याचे समजणे : ‘माझी मुलगी सौ. श्‍वेता तुषार कुलकर्णी हिच्‍या विवाहाला ५ वर्षे झाल्‍यावर ती बाळाचा विचार करत होती; परंतु काही त्रासांमुळे तिला गर्भधारणा होत नव्‍हती. एकदा तिला सकाळी स्‍वप्‍नात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झालेे. तिला स्‍वप्‍नात दिसले, ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी पांढरे शुभ्र वस्‍त्र परिधान केले आहे. त्‍यांनी लाकडी पाळण्‍यातील बाळाला झोका दिला आणि बाळाची पापी घेतली.’ त्‍यानंतर एक मासाने भाद्रपद शुक्‍ल चतुर्थी (श्री गणेशचतुर्थी) या दिवशी तिला गर्भधारणा झाली असल्‍याचे समजले. तेव्‍हा ‘जणू गणपतीचे आगमन घरी होणार आहे’, असे मला मनातून वाटत होते.

सौ. मीनाक्षी कोल्‍हे

१ आ. मुलीचे गर्भारपण

१ आ १. सद़्‍गुरु नंदकुमार जाधव यांनी मुलीच्‍या आजारपणात आधार देणे : श्‍वेताला गर्भारपणाच्‍या काळात आध्‍यात्मिक त्रासामुळे पक्षाघाताचा झटका आला. त्‍यामुळे तिच्‍या तोंडावर परिणाम झाला. त्‍या काळात तिला प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले; परंतु प्रार्थना आणि कृतज्ञता व्‍यक्‍त करणे अन् गुरुदेवांची कृपा, यांमुळे तिला स्‍थिर रहाता आले. त्‍या काळात सद़्‌गुरु नंदकुमार जाधव यांनी आम्‍हाला पुष्‍कळ आधार दिला. ते मधून मधून आम्‍हाला भ्रमणभाष करून श्‍वेताची विचारपूस करत असत. तेव्‍हा माझ्‍या मनात ‘ईश्‍वर आणि गुरुदेव यांना सर्व जिवांची किती काळजी आहे !’, असा विचार येऊन माझी पुष्‍कळ भावजागृती होत असे.

२. जन्‍मानंतर

२ अ. जन्‍म ते ३ मास

२ अ १. श्री गणपतीचा आशीर्वाद म्‍हणून बाळाचे नाव वरद ठेवले.

२ अ २. चि. वरदकडे पाहून पुष्‍कळ आनंद मिळतो.

२ अ ३. भजने ऐकण्‍याची आवड : भ्रमणभाषवर ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप किंवा ‘नादातूनी या नाद निर्मितो, श्रीराम जय राम जय जय राम’, हे भजन लावल्‍यावर तो लगेच झोपतो. भ्रमणभाषवर ‘प.पू. भक्‍तराज महाराज यांची भजने लावल्‍यावर तो शांतपणे ऐकत असून हुंकार देत आहे’, असे मला जाणवायचे.

२ आ. वय ३ मास ते १ वर्ष

१. तो देवघरातील अष्‍टदेवतांच्‍या चित्रांकडे लक्षपूर्वक आणि एकटक पहात असे. तेव्‍हा ‘जणू तो देवाशी बोलत आहे’, असे मला जाणवत असे.

२. तो ‘ॐ’ म्‍हणण्‍याचा प्रयत्न करत असे.

२ इ. वय १ ते २ वर्षे

१. ‘आम्‍ही घरात साधनेविषयी किंवा अन्‍य काही बोलतांना त्‍याला सर्व समजते; पण तो बोलून प्रतिसाद देऊ शकत नाही. त्‍याच्‍याकडे पाहिल्‍यावर ‘तो अंतर्मनातून सर्व सांगत आहे’, असे मला वाटते.

२. तो देवघरातील प.पू. भक्‍तराज महाराज आणि त्‍यांचे शिष्‍य परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या छायाचित्रांकडे पाहून नमस्‍काराची मुद्रा करतो. तो परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे छायाचित्र पाहून ‘बाप्‍पा, बाप्‍पा’, असे म्‍हणतो.

‘हे गुरुदेवा, आपल्‍या कृपेमुळेच आम्‍हाला असे सात्त्विक बाळ मिळाले. आपणच त्‍याची आणि आमची साधना करून घेत आहात, त्‍याबद्दल आम्‍ही आपल्‍या चरणी कृतज्ञ आहोत. ‘आपली कृपा आम्‍हा सर्वांवर सदोदित असू दे’, अशी आपल्‍या पावन चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. मीनाक्षी सुरेश कोल्‍हे (चि. वरदची आजी (आईची आई)), नाशिक (१८.३.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक